shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबई अजूनही प्ले ऑफ मध्ये जाऊ शकेल ?

रविवार हा समस्त जगात सुट्टीचा दिवस असतो. नेमक्या याच दिवशी जर आयपीएल सारख्या लोकप्रिय लिगमध्ये दोन मेगा सामने असतील तर त्या इतका दुग्धशर्करा योग दुसरा कोणताच असू शकत नाही. असाच आनंद देणारे दोन सामने क्रिकेट रसिकांना बघायला मिळाले.

                   


    

पहिला सामना सध्या फुल फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज व केकेआर यांच्यात झाला. क्रिकेटमध्ये जेवढे चढ उतार, ताण तणाव, उत्कंठा व मनोरंजनाचे जेवढे प्रकार असतात ते सारे या सामन्यात घडले. केकेआरच्या नव्या दमाच्या व्यंकटेश अय्यरला सीएसकेने लगाम घालण्यात यश मिळविले. पण राहुल त्रिपाठीच्या खेळात सातत्य जाणवले. शेवटी दिनेश कार्तिकची बॅट चांगल्या पैकी चमकली. त्यामुळे सीएसके पुढे १७२ धावांचे लक्ष मिळाले. ड्यू फ्लेसिस व ऋृतूराज गायकवाडने जोरदार सलामी दिली. परंतु रैना, रायडू, धोनी विशेष चमत्कार करू न शकल्याने सामना संतुलित होता. तरीही रविंद्र जडेजाने त्याच्यात जीव ओतल्याने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत आली. या सामन्यात शेवटचे दोन षटके जास्तच आकर्षक ठरली. बारा चेंडूत २६ धावा लागत असताना जडेजाने कृष्णाच्या १९ व्या षटकात २२ धावा चोपल्या. तर शेवटच्या षटकात ४ धावांची गरज असताना नारायणने जडेजाचाच काटा काढताना चार धावा अवघड करून टाकल्या होत्या. मात्र शेवटच्या चेंडूवर दिपक चहारने विजयी धाव घेत एक रोमहर्षक सामना सीएसकेच्या गळ्यात घातला.  या विजयानंतर सीएसके गुणतालिकेत अव्वल स्थानावर आली असून त्यांची प्लेऑफ पक्की झाली आहे.

                              

रविवारचा दुसरा सामना अशा दोन संघात होता की, युएईत आल्या पासून दोन्ही संघांच्या मनाप्रमाणे काहीच घडताना दिसत नव्हते.  ते संघ म्हणजे विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व गतविजेत्या विक्रमी कर्णधार रोहीत शर्माचा मुंबई इंडियन्स. या सामन्यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात हे संघ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभूत झाले होते. आरसीबीचे युएईत सलग सात पराभवांचे सप्तक पूर्ण झाले होते. मुंबईची चौथ्या क्रमांकावरून सातव्या स्थानी घसरण झाली होती. या सप्तपदीच्या चक्रात दोन्ही कर्णधारांत सुरू असलेली अंतर्गत धुमश्चक्री चव्हाट्यावर आली असता या दोन संघातला सामना अभूतपूर्व असा महत्वाचा बनला.

                             

या दोनही संघाचे मुख्य दुःखणे म्हणजे त्यांची फलंदाजी हेच प्रमुख कारण होते. अशात नाणेफेक जिंकून कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व शुन्यावरच त्याचा सलामीचा साथीदार देवदत्त पडिक्कल परतला. मात्र कोहलीने स्वतः दमदार खेळी करत अर्ध शतक ठोकले त्याचबरोबर प्रथम श्रीकर भरत व नंतर ग्लेन मॅक्सवेलसह महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. तेंव्हा आरसीबी दोनशेची मजल मारेल असे वाटत होते. मात्र त्याच वेळी बुमराहाने लगोलग अर्धशतकवीर मॅक्सवेल व एबी डिव्हीलर्स यांना बाद करत हॅट्रीकची संधी उपलब्ध केली. त्यामुळे त्यांची धावगती अक्षरशः खाली आली व फलकावर डावाच्या शेवटी १६५ धावा लागल्या.

                            

हार्दिक पांड्याचा संघात समावेश झाल्यामुळे मुंबईच्या फलंदाजीला बळकटी आली असे वाटले. परंतु रोहीत शर्मा व क्विंटन डिकॉकने अर्धशतकी सलामी दिली. डिकॉकने २४ तर रोहीतने ४३ धावा काढून विजयाकडे अचूक पाऊल टाकले. परंतु फॉर्मात नसलेल्या ईशान किशनचा एक जोरदार फटका नॉय स्ट्रायकर रोहीत शर्माच्या हाताच्या पंजाच्या मागील बाजूवर लागला. त्याने ग्लोव्हज घातले असले तर त्या चेंडूचा प्रहार इतका जोरदार होता की, रोहीत खरोखर कळवळला होता. मात्र त्या आघाताने रोहीत बाद झाला, आणि त्यानंतर अवघ्या ३२ धावात सर्व मुंबईकर गाशा गुंडाळून परतले.

                          

ईशान किशन, सुर्यकुमार यादव,   कृणाल पांड्या, हार्दिक पांडया, किरॉन पोलॉर्ड, राहुल चहर असे रथी महारथी आल्या पावली परतले. कोणीही संघाच्या विजयासाठी प्रतिकार केला नाही उलट त्यांच्या बाद होण्यात गोलंदाजांच्या कर्तबगारीपेक्षा हाराकिरीच अधिक होती.

                            

हर्षल पटेल या वर्षाच्या पहिल्या सामन्यात मुंबई विरूद्ध पहिल्यांदा आरसीबीकडून खेळला होता. त्यात त्याने पाच बळी घेत अचानक आरसीबीला विजयी केले. तर या सामन्यात हार्दिक, पोलार्ड व चहार या तिघांना सलग तिन चेंडूवर बाद करून हॅट्रीक घेतली. आरसीबीचा तो आजवरचा तिसरा हॅट्रीकवीर ठरला. सध्या पर्पल कॅप त्याच्या शिरावरच आहे.

                            

या एका विजयामुळे आरसीबी संघात नवीन चैतन्य आले. आता ते १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आले असून त्यांची प्ले ऑफ फेरी जिवंत झाली तर मुंबईचा हा पराभव फार भयानक नसला तरी मुंबईला काहीचा डिवचून गेल्या सारखा वाटतो. मुंबईने आता नेहमीप्रमाणे सकारात्मक खेळ व विचार ठेवला तर अजून त्यांचे ४ सामने शिल्लक आहेत. ते सर्व जिंकून ते प्ले ऑफ गाठू शकतात.

                          

मुंबई संघात भारत, न्यूझिलंड, व दक्षिण आफ्रिका यांचे आगामी टि २० विश्वचषक स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारे खेळाडू असून त्यांचे खराब प्रदर्शन असेच राहीले तर येत्या दहा ऑक्टोबर पर्यंत आयसीसीने प्रत्येक देशाला संघात बदल करण्याची संधी दिली आहे. याची संक्रांत भारताच्या सुर्यकुमार यादव व ईशान किशनवर येऊ शकते.

                          

मात्र या सामन्यानंतर एक गोष्ट सतत मनात तरळते. ती म्हणजे हो, हॅट्रीक झाली, मुंबईची पराभवाची, आरसीबीची विजयाची तर हर्षलची विकेटची !


लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

close