प्रतिनिधी : प्रविण देशमुख
नगर जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीच्या काळात पाऊस बेताचाच झाला .परंतु २ - ३ दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्याकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी नदीच्या पुराचे पाणी ऊस शेतात साचले असेल तर शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता सोबत सुचविलेल्या उपाय योजना आमलात आणल्यास ऊस उत्पादनात होणारे नुकसान आपण टाळू शकतो.
ऊस पिकात जास्त काळ पाणी साचून राहिल्यास होणारे नुकसान:
सध्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती असेल किंवा पुराचे पाणी साचून राहत असेल अशा ठिकाणी पाण्यामुळे जमिनीतील अन्न घटकांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जमिनीतील हवा व प्राणवायूचे प्रमाण देखील कमी होऊन ऊस पिकाच्या मुळाची कार्यक्षमता कमी होते परिणामी पिकाची वाढ मंदावते, ऊसाची पाने पाने पिवळी पडतात, ऊस लोळण्याचे प्रमाणात वाढ होते, ऊसामध्ये मर, मूळकुज, कांडीकुज, तांबेरा, पोक्का बोईंग, पानांवर ठिपके इ. रोग व लष्करी अळी, नाकतोडे, गोगलगाय, पांढरी माशी इ. किडींचा प्रादुर्भाव वाढतो. ऊस वाढीची अवस्था, पीक पाण्यात बुढाल्याचा व पाणी साचल्याचा कालावधी, रोग किडी प्रादुर्भाव याचे प्रमाणात उत्पादनात घट येते.
पुरबाधित ऊस पिकावर दिसणारी लक्षणे:
पुराच्या पाण्यात ६ ते ७ दिवसापेक्षा ऊसाचे पिक राहिल्यास मोठ्या ऊसाच्या पोंग्यात पाणी व माती गेल्याने वाढे / ऊस कुजतो त्याचप्रमाणे अंशतः पाण्यात बुडालेल्या ऊसाची पाने पिवळी पडतात व नंतर सुकून वाळून जातात. जास्त पाण्याच्या प्रवाहामुळे ऊस लोळण्याचे प्रमाण वाढते. ७ ते ८ दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी ऊस पाण्यात बुडाला असेल अशा नवीन लागवड केलेल्या आडसाली ऊसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
पुर बाधित ऊस वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना:
अंशतः व कमी कालावधीसाठी पाण्यात बुडालेल्या ऊसासाठी तातडीने करावयाच्या उपाय योजना:
ज्या ऊसाच्या शेतात पाणी साचलेले आहे त्या पाण्याचा निचरा करावा त्यासाठी गरजेनुसार उताराच्या बाजूने चर काढावेत तसेच पुराच्या पाण्यामुळे वाळलेले ऊस शेताबाहेर काढून टाकावेत.
ऊसाचे पिक लहान असल्यास शेतात वापसा येताच ऊस पिकाच्या मुळाभोवती एकरी २ लिटर ट्रायकोडर्मा २०० लिटर पाण्यात मिसळून त्याची आळवणी केल्यास ऊस पिकाची होणारी मर तसेच मूळ कूज रोखली जाते व ऊसाच्या मुळाची वाढ होण्यास मदत होते.
३. ऊस पिकावर ज्ञानेश्वर शक्ती (नत्र:स्फुरद:पालाश ८:८:८) अधिक ज्ञानेश्वर उर्जा (मायक्रोन्युट्रीएंट) प्रत्येकी १०० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून ऊस पिकावर फवारल्यास ऊस पिकाची काळोखी वाढून ऊसाच्या कोंबाची जाडी व फुटवा वाढण्यास मदत होते.
४. पाण्यामुळे जमिनीमध्ये ऊस पिकाची मुळे कुजू नये म्हणून १० ग्रॅम कार्बेन्डाझिम/१० लिटर पाण्यात मिसळून मुळीभोवती द्यावे.
५. ऊसाचे पिक १.५ ते २ महिन्याचे असेल तर १२:६१:००अधिक ज्ञानेश्वर उर्जा प्रत्येकी १०० मि.ली. १० लिटर
पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
६. ऊस पिक लहान असेल तर एकरी ४ गोण्या ज्ञानेश्वर समृद्ध खत दिल्यास ऊसाच्या मुळांची वाढ होण्यास मदत होईल.
७. पावसामुळे जमिनीतील जमिनीतील अन्न घटक कमी झाल्यामुळे ऊस पिकास वापसा आल्यानंतर एकरी २ गोण्या
१२:३२:१६ किंवा १०:२६:२६ अधिक १ गोणी युरिया द्यावा.
८. ऊस पिकावर लष्करी अळी, पांढरी माशी या किडी तसेच पोक्का बोइंग, तांबेरा इ चा प्रादुर्भाव होणेची शक्यता आहे
त्यानुसार त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी.
मोठ्या ऊस पिकात करावयाच्या उपाययोजना:
पुराच्या पाण्यामुळे जमिनीतील अन्न द्रव्यांचे प्रमाण कमी होते त्यामुळे ६ ते ७ महिने वय असलेल्या ऊस पिकास एकरी १ गोणी युरिया किंवा २ गोणी अमोनिम सल्फेट व ३० किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. किंवा
१०० लिटर पाण्यात २ किलो युरिया अधिक २ डी.ए.पी. मिसळून ऊस पिकावर फवारावे.
तांबेरा, पानावरील ठीपके , पोक्का बोइंग रोगांचे नियंत्रणासाठी डायथेन एम ४५ -२५ ग्रॅम १० लिटर पाण्यांत
मिसळून १० दिवसाच्या अंतराने कमीतकमी २ फवारण्या घ्याव्यात.
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रत्येकी १०० मि.ली. बिव्हेरिया व मेटारायजिम १० लिटर पाण्यात मिसळून ऊस पिकावर फवारावे किंवा ४ मि.ली. एमिडाकलोप्रिड १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
अशा प्रकारे पूर बाधित ऊस पिकाचे व्यवस्थापन करावे.
श्री. नारायण निबे,विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने मो-८८०५९८५२०५

