३६ लाखांची रक्कम तातडीने वसूल करून गुन्हे नोंदविण्याच्या मागणीवर मुंदडा ठाम!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
तीन वर्षापूर्वी अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्त्याच्या रद्द झालेल्या कामाचे बिल प्रशासक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने देऊन ३६ लाख ३९ हजार रुपयांचा भ्रष्टाचार केला.
त्यामुळे संबंधितांकडून ही रक्कम वसूल करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी आज गुरुवार (दि.२७) पासून अमरण उपोषणाचा इशारा दिला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मुंदडा यांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले मात्र ते असफल ठरले. त्यामुळे नंदकिशोर मुंदडा हे कालपासून आमरण उपोषणाला बसले अाहेत.
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (MACP), पुणे, या योजने अंतर्गत सन २०१६ ला ०१ कोटी ०८ लक्ष रुपयांची काम मंजूर झाले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार मुंदडा यांनी २०१७ साली केली होती. तक्रारीवरून संबंधित अधिकारी व विभागाने चौकशी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यामुळे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, पुणे यांनी ही तांत्रिक मनकाप्रमाणे व आदर्श गुणवत्ता धोरणानुसार सदर काम न झाल्यामुळे बाजार समितीची निवड सदर योजनेमधून रद्द केलेली आहे व प्रकल्पातून अनुदान देय होणार नाही असे कळविले होते. मात्र, हे काम रद्द झालेले असतानाही चार वर्षानंतर सल्लागार अभियंत्याने व गुत्तेदाराने संगनमत करून कामाचे मुल्यांकन केले.
गुत्तेदार हा प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षाचा नातेवाईक असल्यामुळे सदर मूल्यांकनाच्या आधारे नियमाला डावलून बाजार समितीच्या खात्यातून ३६ लाख ३९ हजार ०३९ रुपयांचे बिल देण्यात आले आहे. मुळात हे बिल देण्याचा अधिकारच प्रशासक मंडळाला नाही. सदरील बिल देण्यासाठी संपूर्ण प्रक्रियाच संशयास्पद आहे. त्यामुळे अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय प्रशासकीय मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, सल्लागार अभियंता (बाजार समिती), विशेष लेखा परीक्षक वर्ग-१, बीड. व संबंधित कंत्राटदार यांची सखोल चौकशी करावी. निकृष्ठ व रद्द झालेल्या कामाचे दिलेले बिल त्वरित वसूल करून सर्व संबंधितावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असलाच्या इशारा मुंदडा यांनी दिला होता.
दरम्यानच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंदडा यांची भेट घेऊन चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आणि उपोषण रद्द करण्याची विनंती केली. परंतु, अभियंत्यानेच काम निकृष्ट झाल्याचा अहवाल दिलेला असल्याने आणखी कसली चौकशी करता असे म्हणत मुंदडा यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली. त्यामुळे कालपासून नंदकिशोर मुंदडा हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यादृष्टीने बाजार समितीच्या प्रांगणात तयारी देखील करण्यात आली आहे. मुंदडा यांच्या उपोषणामुळे विद्यमान प्रशासक मंडळासमोर कमालीच्या अडचणी उभ्या राहण्याची चिन्हे आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी हे एैन दिवाळीच्या तोंडावर आमरण उपोषणाला बसल्या मुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून विविध मार्गाने नंदकिशोर मुंदडा यांनी आमरण उपोषण मागे घ्यावे म्हणून प्रयत्न करत आहे.

