shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जगजेत्या विंडीजचा लाजिरवाणा पराभव तर कांगारूंचा द. आफ्रिकेवर विजय मिळविताना पडला फेस..!!



                   सातवी टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा द. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने सुरू झाली. दुबई मध्ये झालेल्या या सामन्यात कांगारूंनी नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र तो त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरला. आफ्रिकन फलंदाजांनी जोरदार फटकेबाजीच्या नादात आपले बळी गमावले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या करामतीपेक्षा आफ्रिकन फलंदाजांच्या हाराकिरीचा यामध्ये मोठा वाटा होता. प्रत्येक वेळी जम बसतोय असे वाटत असताना आफ्रिकेचे फलंदाज बाद होत गेले. त्यांच्याकडून एडन मार्करम चाळीस व कागिसो रबाडा नाबाद एकोणावीस धावा यांच्या थोडया फार प्रतिकाराने द.आफ्रिका जेमतेम एकशेअठरा  धावाच फलकावर लावू शकली.

                  प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया आपल्या भक्कम फलंदाजीच्या जोरावर एकशे एकोणावीस धावांचे छोटेसे लक्ष सहज साध्य करेल असे वाटत होते. पण द. आफ्रिकेचे गोलंदाज मागे हटायला तयार नव्हते. त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या तोंडाला फेस आणताना एका एका धावेसाठी त्यांना मोताज केले. ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून विजय मिळविल्याची कागदोपत्री नोंद झाली असली तरी वस्तुस्थिती तशी नव्हती. विसाव्या षटकाच्या शेवटच्या पाचव्या चेंडूपर्यंत त्यांना झुंजावे लागले. शेवटी मार्कस स्टोईनस व मॅथ्यू वेडने एक अवघड बनलेला विजय मिळवून दोन गुण आपल्या खात्यात जमा केले. मात्र हा सामना द. आफ्रिकेच्या झुंजार प्रयत्नांसाठीच जास्त स्मरणात राहील. द. आफ्रिकेला विजेतेपदाच्या शर्यतीत टिकून राहायचे असल्यास पुढील प्रत्येक सामन्यात डोळ्यात तेल घालून कामगिरी करावी लागणार आहे.
                    शनिवारी दिवसातील दुसरा सामना मागच्या स्पर्धेतील अंतिम सामना खेळणारे दोन संघ गतविजेता वेस्ट इंडिज व उपविजेता इंग्लंड यांच्यात झाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने मिळताच विंडीजला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. परंतु आजच्या सामन्यात विंडीज फलंदाज बिलकुल फलंदाजी करण्याच्या मुडमध्ये दिसले नाही.
                    विंडीजचे एर्विन लुईस सहा, लेंडल सिमंस तीन, ख्रिस गेल तेरा, शिमरन हेटमायर नऊ,  ड्वेन ब्राव्हो पाच, निकोलस पुरन एक, कर्णधार किरॉन पोलॉर्ड सहा, आंद्रे रसेल शुन्य, ओबेड मॅकॉय शुन्य, रवी रामपॉल तीन व अकील हुसेन नाबाद सहा यांची सर्वांची गोळा बेरीज होती फक्त पंचावन्न धावा इतकीच !
                    इंग्लंडकडून आदिल रशिदनेे अवघ्या दोन धावात चार गडी बाद करून इंग्लंडकडून टि ट्वेंटी विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. रशिद शिवाय तिमल मिल्स व मोईन अलीने प्रत्येकी दोन तर ख्रिस वोक्स व ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी एक बळी घेऊन विंडीज फलंदाजीला खिळखिळे करून सोडले.
                 विंडीजचा डाव अवघ्या ५५ धावांत संपला. हि कोणत्याही कसोटी दर्जा प्राप्त संघाची टि ट्वेंटी विश्वचषकातील निच्चांकी धावसंख्या बनली. तर सन दोन हजार एकोणावीस मध्ये इंग्लंडविरूद्धच विंडीज पंचेचाळीस धावांवर सर्वबाद झाले होते. तो स्वतःचा रेकॉर्ड मात्र विंडीजने या सामन्यात जागेवर ठेवल्याने त्यांची थोडीफार इज्जत वाचली.
                   विजयासाठीचे छप्पन धावांचे लक्ष इंग्लंडने आठ षटके व दोन चेंडू मध्ये पूर्ण केले मात्र त्यासाठी त्यांना चार फलंदाज गमवावे लागले. या विजयाने इंग्लंड अ गटात गुणतालिकेत अव्वल स्थानी आले असून त्यांची धावगती आधिक तीनच्या वर आहे. या उच्च धावगतीचा लाभ त्यांना उपांत्य फेरीत पोहोचण्यास होणार आहे. कारण त्यांचा गट अतिशय कठीण आहे.
                    इंग्लंडकडून पॉवरप्ले मध्येच विंडीजचे मृत्यूपत्र लिहीणारी कामगिरी करणारा मोईन अली तर द आफ्रिकेविरूध्द ऑस्ट्रेलियाचा विजयी लेख लिहीणारा जोश हेझलुवुड सामनावीर ठरले. विशेष म्हणजे आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचेच हे दोन्ही सदस्य आहेत.
                     टि ट्वेंटी विश्वचषकात या सामन्यापूर्वी विंडीजने पाचपैकी पाच वेळा इंग्लंडवर विजय मिळविले होते. ती मालिका खंडीत झाली असून इंग्लंडने यंदा विजेतेपद मिळविण्याच्या दृष्टीने एक मजबूत पाऊल पुढे टाकले आहे. परंतु या पराभवाने विंडीजची तयारी व संघातील एकोपा यांच्यात काही तरी उणे असल्याचे दिसत असून तिसरे विजेतेपद मिळवायचे असेल तर विंडीजला सर्व कमजोर बाबींना तिलांजली द्यावीच लागेल.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close