1)
शैलपुत्री..
माळ प्रथम नवरात्री
शैलपुत्री तव वंदिती
नंदी वरी आसनस्थ
त्रिशूळ कमल हाती
प्रथम जन्म आगळा
पिता दक्ष प्रजापती
असह्य पति उपमर्द
यज्ञ मोडी अधिपति
भस्म करी स्वशरीरा
महा माया महा सती
द्वितीय जन्म धारता
उभा त्रिनेत्र रे संगती
शंभो वरी तव प्रिती
दुजाजन्मी तोचपति
प्रथम पुजा तव रुपे
भक्त वत्सल पार्वती
शीतल चंद्रमा माथी
माता तू लावण्यवती
वांच्छित सुफलदात्री
भक्ता सदैव भावती
माते तव कृपा छत्री
आगळी ये अनुभूति
दुःख भंजन हो क्षति
न भूतो न भविष्यति
2)
ब्रह्मचारिणी माता ..
दुसरी माळ वाहिली
नवरात्री महोत्सवात
आई तुझ्या ममतेत
प्रेमात भिजली वात
दुर्गा माता रे भावली
ब्रह्मचारिणी रूपात
निर्जळी राही आई
किती कठोर तपात
डाव्याहाती कमंडलू
माळउजव्या हातात
श्रध्दाभाव हवाअसा
रममाण होता व्रतात
बेल पत्री खाई फक्त
अपर्णा राहते वनात
साक्षात वैराग्यमुर्ती
ठसली शंभो मनात
डोके तुझ्या पायावर
डोक्यावर तुझा हात
मुर्ती उमाई ठसलेली
राहो नित्य अंतरात
3)
चंद्रघंटा ..
चंद्र घंटा अवतारी
दुर्गा जागे नवराती
चंद्र कोर मुकूटात
उजळे लक्ष ज्योती
दहाभुजा महादेवी
आयुधे शोभे हाती
सिंहारूढ रुप तुझे
असूरास महाभिती
रूप तुझे साठवता
स्थिरावली मंदमति
रूप तुझे आठवता
वेगळी ये अनुभूति
साधक लीन होती
पाठ गाई सप्तशती
चंद्र समान शीतला
कृपाळु तू महासती
यज्ञ थोर महाचंडी
दुर्गुणांची दे आहुती
जयघोष आरतीचा
माथी लावा विभूति
4)
कुष्मांडीमा ..
जगन्माता कुष्मांडी
ओवलीचवथी माळ
तूचं निर्मीले ब्रह्मांड
नमनकरे तुज काळ
जन्म जरा अन् मृत्यू
सगळे तुझेचि खेळ
तुझेच गुलाम गं माते
रात्र दिस काळ वेळ
नर नारी निर्मी दोन्ही
गुंफत उचीत गं मेळ
स्त्रीला जनन् शक्ती
गं तीचं निर्मिते फळ
अबला न सबलाकेले
देऊन विशेष हे बळ
कळले ना आम्हांस
समजे महिला दुर्बळ
विनंती आई तुजला
मने करी गे निर्मळ
विसरावे भेदभाव हे
सुखी समृद्ध सकळ
5)
स्कंधमाता ..
रूप लोभस पाचवे
स्कंधमातासुहासिनी
बसे स्कंद काखेमधे
विराजली पद्मासनी
चतुर्भुजा मायमाझी
ठसली ती मनोमनी
विशुद्धचित्त तल्लीन
तप करी ऋषि मुनी
शुभ्र वस्त्रांकित देवी
निर्मळ सुख दायिनी
असूरा क्षणात राख
करी प्रज्वला दाहिनी
ललितापंचमी उत्सव
शुभ मुहूर्तास साधुनि
सुख देई जगतजननी
दुःख वज्रास भेदूनि
नवरात्र नर्तन किर्तन
भक्ती करावी जागूनि
तृप्त होतीलं कामना
अंबाई जोगवा मागूनि
6)
कात्यायनी
कात्यायन ऋषीपुत्री
तेज:पुंज कात्यायनी
साधकमन स्थिर करे
शोभेअशी सिंहासनी
धर्म अर्थ काम मोक्ष
सर्व सुफल दायिनी
पवित्र असता वर्तनी
होई सुख वरदायिनी
देवीचे असे रौद्र रूप
युध्ददेवी बोले कुणी
स्मेरमुखी शिवपत्नी
भयभीत जेजे दुर्गुणी
अभय वरद मुद्रा ती
तलवारकमल धारणी
महिषासूर वधा सिध्द
जन्म जाहला कारणी
चतुर्भुजा कमलनेत्री
तल्लीन व्हावे चरणी
सहावी माळ वाहता
संपन्न आनंदे धरणी
7
कालरात्री..
कालरात्री महाकाली
दिसते ती भयाकारी
भिती वाटे राक्षसाला
स्नेह तिचे भक्तावरी
घडी बसवे संसाराची
विस्कटले केस जरी
श्वासोच्छवासा मधून
ज्वाळा निघे भयंकरी
ब्रह्मांडासम अक्षतीन
आरूढ ती गर्दभावरी
शुभ फळे नित्य देई
नाव तिचे शुभंकारी
भुत राक्षसाचा काल
माता ही संकट हारी
शरीर जरी काळेभोर
मनतेजपुंज मनोहारी
यमनियम संयम पाळे
साधक मन शत धारी
आगळे वेगळे स्वरूप
काली चतुर्भुजा धारी
8
महागौरी ..
श्वेत वृषे समारूढा
महागौरी शुभ्र वर्णी
रूप तिचे मनोहारी
मंजुळ मधुर वाणी
शुभ्र वस्त्र अति प्रिय
भक्तआवडे सद्गुणी
कृपा करी महा माये
सदैव तव राहे ऋणी
आईची जया माया
उपाशी निजेलं कुणी
स्पटिका समान दिसे
गंगेचे ते पवित्र पाणी
शंख चंद्र कंद फल
फिके पडेलं हंसिनी
पाप क्षय कर माझा
भक्त वेडा हा योगिनी
कुमारिका अष्ट वर्षा
शिवशंभुची कामिनी
कृपाकरी गं सर्वांवरी
सुख समृद्धी दायिनी
9
सिध्ददात्री
माळ नववी विशेष
नवे रूप सिध्ददात्री
सर्व स्वरूप दाऊनि
सिध्दसफल नवरात्री
दुर्गे तुष्टलो भक्तीने
सुखी करे शैलपुत्री
सेवा व्रत मनोभावे
दान धर्म हो सत्पात्री
अष्टसिध्दी स्पर्शेजरी
सुखेमिळे मोक्षखात्री
शिव तपस्या सोपी
वहा आर्तते बेलपत्री
कमल निवासी माता
भक्तावरी स्नेह छत्री
अर्धनारी नटेश्वररूप
नर नारी रे एक गात्री
असे इच्छा वरदात्री
मिळोजाया सर्व क्षेत्री
सत्कर्म सदैव घडावे
मुखी नाम दिवसरात्री
10
मनी दसरा ..
मना मधला कचरा
केलात्याचा निचरा
मनामध्येचं साजरा
करुया यंदा दसरा
हसता नित्य चेहरा
डोळी सक्त पहारा
जीभेवर न कटुता
शब्द प्रत्येक हसरा
वैरभाव तो विसरा
षड्रीपु धरा कासरा
विचारसीमोल्लंघन
दुराचारा नाआसरा
अडवू शकेल कोण
मनी साजरा दसरा
कुटूंबात असे सारे
आनंद कुठे दुसरा
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com

