शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टयांचा संभ्रम दूर करावा -बाबासाहेब बोडखे
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : ९ / राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण नसलेल्या शाळांना सलग तर सर्वेक्षण पुर्ण केलेल्या शाळांना दिवाळीची सुट्टी 20 नोव्हेंबर पर्यंत मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविले आहे. सध्या राज्यात निर्माण झालेला दिवाळी सुट्टयांचा संभ्रम तातडीने दूर होणे अपेक्षित असून, यासाठी शिक्षक परिषद पाठपुरावा करीत असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण (एनएएस) साठी शाळांची निवड स्थानिक पातळीवर झाली आहे. राज्यातील सर्वच शाळांमध्ये सदर सर्व्हेक्षण होणार नसून, ज्या शाळांमध्ये सर्व्हेक्षण होणार नाही त्या शाळांची दिवाळी सुट्टी कायम ठेवण्यात यावी. शाळांना 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान ज्या शाळेत एनएएस परीक्षा नाही, त्या शाळेत मुलेही येतील असे वाटत नाही. ज्या शाळांनी दोन दिवसीय सर्व्हेक्षण पुर्ण केले. अशा शाळांना सर्व्हेक्षणानंतर दिवाळीची सुट्टी मिळणे अपेक्षित आहे. कोरोना काळात इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू आहेत. शाळेत कोरोनाचे संकट कायम असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सर्व्हेक्षण नसलेल्या शाळांना सलग तर सर्वेक्षण पुर्ण केलेल्या शाळांना दिवाळीची सुट्टी 20 नोव्हेंबर पर्यंत मिळण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
दिवाळी सुट्टयांचा निर्णय स्थानिक स्तरावर सोडल्याने काही जिल्ह्यात राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणानंतर दिवाळी सुट्टया पुढे कायम करण्यात आल्या आहेत. याबाबत नुकतेच भंडारा जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे राज्यात सुट्टी बाबत एक वाक्यता न राहून शिक्षक, पालक, विद्यार्थी वर्गात गोंधळ निर्माण होत आहे. शिक्षण विभागाने राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण नसलेल्या शाळांना सलग दिवाळीची सुट्टी द्यावी व ज्या शाळांमध्ये सर्व्हेक्षण आहे, अशा शाळांना सर्व्हेक्षणानंतर दिवाळी सुट्टया 20 नोव्हेंबर पर्यंत कायम ठेवाव्या. -बाबासाहेब बोडखे (शिक्षक परिषद नेते)

