शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०४ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर : कोरोना एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'मिशन वात्सल्य' अभियानास गती देऊन जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी योजनेचे काम चांगल्या पद्धतीने करावे, असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा समन्वयक अशोक कुटे यांच्या पुढाकारातून व हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया मध्ये राजेंद्र भोसले व इतर विभाग प्रमुखांसोबत पुनर्वसन समितीची महत्वपूर्ण बैठक झाली.
बैठकीत समन्वयक अशोक कुटे, श्रीरामपूरचे तालुका समन्वयक व मिशन वात्सल्य समितीचे अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, राहुरीचे आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, नगरचे प्रकाश इथापे, पारनेरचे शरद दारकुंडे यांच्यासह समितीचे वेगवेगळ्या तालुक्यातील समन्वयक उसस्थित होते. त्यांनी कोरोना एकल महिलांना रोजगार, गृहउदयोग, थकीत कर्ज प्रकरणे, ५० हजारांची मदत असे विविध प्रश्न मांडले.
भोसले यांनी याचवेळी दररोजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना मिशन वात्सल्यची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याबाबत योग्य सूचना देत सर्व तालुक्यांचा आढावाही घेतला.जिल्हाधिकाऱ्यांनी एकल महिलांच्या व्यवसायाबाबत लवकरच निर्णय घेवू. बँकेचे थकीत हप्तेबाबत तगादा लावणारे संबंधीत व्यक्ती, खाजगी सावकार , फायनान्सचे संबंधीत यांची यादी पुनर्वसन समितीने दिल्यास कारवाई करण्याची ग्वाही दिली. मागितली आहे. राहुरी तालुका समन्वयक व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार देवळाली प्रवरा खाजगी कोविड सेंटरची चौकशी करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. कोरोनामुळे अतिरिक्त बिलाबद्दल ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांनी तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे ऑडिटसाठी तक्रार अर्ज देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. ५० हजार रूपयांच्या मदतीबाबत अजुन पुढील काही आदेश आले नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीमध्ये जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा महिला बालविकास अधिकारी बलवंत वारुडकर, जिल्हा प्रकल्प अधिकारी मनोज ससे, मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी काही प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले.
◽
बऱ्याच कुटुंबांवर कोरोनाच्या अतिरिक्त बिलाचे कर्ज व जुने कर्ज आहेत. त्यामुळे बँका, पतसंस्था, खाजगी सावकार, फायनान्सचे प्रतिनिधी त्यांच्या घरी वारंवार थकीत कर्जाच्या हप्त्यांची मागणी करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घातल्यामुळे काही प्रमाणात या कर्ज हप्त्याच्या वसुलीला आळा बसेल, असे मत अशोक कुटे यांनी व्यक्त केले.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

