एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचा इंदापूरमध्ये रास्तारोको
मागण्या मान्य न केल्यास आंदोलन व्यापक करण्याचा दिला इशारा
इंदापूर : प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांप्रमाणेच सेवा जेष्ठता निश्चित करून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी २८ ऑक्टोबर पासून एसटी कर्मचारी संघटनांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यास पाठिंबा दर्शवित बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती मोर्चा या संघटनेने आक्रमक पवित्रा घेत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.८) इंदापूर बसस्थानकासमोर रास्तारोको केला.
एसटी महामंडळाचे प्रशासनात विलीनीकरण करणे,एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची कर्जमाफी करणे, आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांच्या परिवारास त्वरित किमान ५० लाख रुपये देणे व मृत कर्मचारी यांच्या परिवारातील एका सदस्याला त्वरित नोकरी देणे, एसटीची जाचक नियमावली शिस्त व अवेदन प्रणाली रद्द करणे, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित करार पूर्ण करणे अशा विविध मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्यात यासाठी २५२ एसटी डेपो स्तरावर एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याचे राहुल मखरे यांनी सांगितले.
सदरील आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकार व एसटी राज्य प्रशासनाकडून घेतली जावी व त्वरित मागण्या मंजूर कराव्या अन्यथा पुढील आंदोलन व्यापक स्वरूपाचे केले जाईल असा इशारा ॲड.राहुल मखरे यांकडून देण्यात आला आहे.प्रसंगी वसीम शेख,संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भातील निवेदन देण्यात आले.
यावेळी भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, बीएमपी तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग,बीएमपी चे शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर, विद्यार्थी मोर्चा जिल्हा प्रभारी सुरज धाईंजे ,वसीम शेख,ॲड.किरण लोंढे,रोहित ढावरे,नागेश भोसले,संतोष मिसाळ,राहुल शिंगाडे,बलभीम राऊत, तौसिफ बागवान,इम्रान बागवान,भारत चंदनशिवे, सुदेश झेंडे,अक्षय मखरे, ॲड.सुरज मखरे,दया मखरे,अक्षय जाधव,बापू शिंदे,संतोष मखरे, किशोर धाईंजे, विशाल लोंढे व अन्य उपस्थित होते.

