आरती म्हणजे औक्षण . शब्द कल्पद्रुम नावाचा ग्रंथ आहे त्यात हे औक्षण किती करायचे या संदर्भात एक श्लोक आहे . मूर्तीच्या पायाशी चार वेळा , नाभी भोवती दोन वेळा , मुखाभोवती एक वेळ आणि सर्वांगावरून सात वेळा . बस संपली आरती . आरती म्हणण्याची प्रथा कधी सुरु झाली हा थोडा संशोधनाचा विषय . महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींच्या काही आरती सदृश रचना आहेत अस म्हणतात पण हि महानुभावपंथी म्हणजे तत्कालीन नास्तिक समाज होता. त्यामुळे या रचना देवस्तुतीच्या नसाव्यात . ज्ञानेश्वरांनी काही अशा रचना केल्या होत्या. पण त्या भगवतगीतेच कौतुक करणाऱ्या . माझ्या मते हा प्रकार रामदास स्वामी या लोकोत्तर संताने चालू केला असावा . जशी त्यांनी मारुतींची स्थापना केली , व्यायामशाळा चालू केल्या त्याच पद्धतीने समाज एकत्र यावा, मोंगलांची त्यांच्या मनातील भीती कमी व्हावी म्हणून हा प्रपंच मांडला होता का ? राम जाणे. एवढी छान पूजा केली आहे तेव्हा देवाला येई हो विठठले म्हणून संगित आवतण आर्ततेने द्यायचं . यात खूप आरत्या त्या देवाच रूप , काम सांगणाऱ्या आहेत आणि शेवटी देवा तू ये अशी आळवणी आणि या आळवणीला देव प्रतिसाद देतो तो प्रसाद अशी समजूत.
अथर्ववेदाच एक परिशिष्ट वाचायला मिळाल त्यात एक गोष्ट वाचली . राक्षसांच्या पुरोहिताने काहीतरी मंत्रप्रयोग करून इंद्राची झोप उडेल म्हणजे निद्रानाश होईल असे काहीतरी केले . इंद्र त्रस्त झाला व त्याने बृहस्पतीना यासाठी उपाय विचारला तेव्हा बृहस्पती म्हणाले कि मी तुला एक उपाय सांगतो त्याला अरार्त्रिक म्हणतात , एक तबक घेऊन त्यात वेगवेगळी फुले ठेव व एक त्यात दीप लावून सुवासिनीकडून औक्षण करून घे व हे करताना एक मंत्र म्हण . यामुळे तुला या त्रासातून मुक्ती मिळेल . या अरार्त्रिक मधूनआरती या विषयाचा जन्म झाला . देवाला झोपविण्यासाठी पहिली आली ती शेजारती , मग त्याला परत उठविण्यासाठी आली ती काकडारती , पूजे नंतर ५ वाती किवा दिव्याने ओवाळून करायची ती पंचारती , एकचदिवा असेल तर एकारती , धूप जाळला असेल तर धुपारती , कापूर असेल तर कापूरारती .
समर्थांनी जवळ जवळ ८० ते ८२ आरत्या लिहिलेल्या आहेत , सर्व अत्यंत प्रासादिक , गेली ४०० वर्ष याची मोहिनी जनमानसा वरून उतरलेली नाही , एखाद्या महान व्यक्तीच्या काव्याला , शब्दाना मंत्राच पावित्र्य येत ते अस , याला म्हणतात चिरंजीविता. शो
यात एक गम्मत अशी कि रामदास हे काही आजच्या सारखे संधीसाधू , दलबदलू नाहीत , गणपती बप्पा असो , मारुतीराया असो , कुठलीही देवी असो आरती मध्ये तिचे गुण गान करतील पण प्रत्येक आरती मध्ये शेवटी त्या देवाला साहेब तुमच मी कौतुक केल असल तरी मी दास रामाचा हि आठवण ते करून देतातच.
सर्व सुंदर आहेत त्यातील देवतांची वर्णन हि खूप सुंदर पण या आरतीपेक्षा एकनाथांनी लिहिलेली दत्ताची आरती एक वेगळी आणि सुंदर आहे . या आरतीचे स्वरूप इतर आरत्यांच्यापेक्षा वेगळे अशा करिता कि कुठल्याही आरतीत त्या देवाचे रूपवर्णन , त्याचे पराक्रम आणि नंतरच्या कडव्यामधून साधारण फलश्रुती असा प्रकार असतो पण दत्ताच्या आरतीत सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना , अभाग्यासी कैची कळेल हि मात अशा ओळी आहेत. म्हणजे थोडक्यात मला तो कळलाच नाही असा पहिल्या दोन कडव्यात स्वानुभव आहे व उरलेली दोन कडवी फलश्रुती आहे . याचे कारण असे कि एकनाथ महाराज त्यांच्या गुरूच्या म्हणजे जनार्दनस्वामी यांचेकडे हट्ट धरून बसले कि मला दत्त महाराजांचे दर्शन घडवा . जनार्दन स्वामीनी त्यांना दौलताबाद येथे किल्यावर बोलावले . एकदिवस एक योगी एकनाथ महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले , एकनाथांनी त्यांना आपण कोण असे विचारले तेव्हा तो योगी त्यांना आशीर्वाद देऊन न बोलता निघून गेला आणि नंतर जेव्हा जनार्दनस्वामी हसले तेव्हा एकनाथ महाराजांना समजले कि दत्तमहाराज दर्शन देऊन गेले . तेव्हा हि आरती एकनाथ महाराजांनी तेथे लिहिली आणि लिहून गेले "सबाह्याभ्यंतरीं तू एक दत्त , अभाग्यासी कैची कळेल हि मात".
फारच सुरेख, सुंदर..!
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

