शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१
वांबोरी शासकीय उपसा सिंचन योजनेच्या दुरूस्तीस प्रशासकीय मान्यता- राज्यमंत्री तनपुरे..!!
राहुरी : राहुरी तालुक्यातील वांबोरी शासकीय उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरूस्तीच्या ४ कोटी ३७ लाख ८३ हजार २५३ रूपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन या कामाचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना श्री. तनपुरे म्हणाले की मुळा धरणाच्या सिंचनापासून वंचित राहिलेल्या वांबोरी येथील क्षेत्रासाठी शाश्वत सिंचन उपलब्ध होण्याकरीता या कामास प्राधान्याने हाती घेण्याचे आपण निश्चीत केले होते. या योजनेचे काम १९८५ मध्ये पुर्ण करण्यात आले होते. या उपसा सिंचन योजनेमुळे वांबोरी या अवर्षण प्रवण क्षेत्रातील ९७७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होतो. मुळा उजवा कालवा कि.मी. क्र. १४ / ७०० येथे उपसा सिंचन योजनेचा उद्भव आहे. याठिकाणाहून ९०० मिलीमीटर व्यासाच्या दोन पाईपव्दारे गुरूत्ववाहिनीने पाणी पंपगृहात घेण्यात येते. परंतू योजना कार्यान्वीत होऊन ३७ वर्षाचा कालावधी झालेला असल्यामुळे योजनेची पाईप लाईन तसेच विद्युत उपकरणे मोठया प्रमाणावर निकामी झालेली आहेत. यासाठी स्थापत्य व विद्युत घटकांच्या विशेष दुरुस्तीचे काम करणे आवश्यक होते.
या योजनेच्या टप्पा क्र. १ याठिकाणी ६० अश्वशक्तीचे एकुण ६ पंप असून त्यापैकी ५ सद्यस्थितीत नादुरूस्त आहेत. तसेच ५० अश्वशक्तीचे असलेले दोन्हीही पंप नादुरूस्त आहेत. तसेच योजनेच्या टप्पा क्र. २ येथील ६० अश्वशक्तीचे २ तर ५० अश्वशक्तीचे दोन असे सर्वच पंप नादुरूस्त आहेत. यासाठी याठिकाणी नविन सबमर्सिबल पंप बसविण्यात येणार असून खराब व गळती होत असलेल्या ठिकाणची पाईपलाईन बदलण्यात येणार आहे. योजनेच्या वितरण व्यवस्थेतील भराव पुर्ण खचलेला असून सदरची व्यवस्था नव्याने तयार करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर योजनेच्या विद्युत घटकातील कंट्रोल पॅनल, स्टार्टर, केबल, स्विचयार्ड तसेच ट्रान्सफर्मर यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी निधीही उपलब्ध करण्यात आलेला असून कार्यारंभ आदेशही देण्यात आलेले असल्याने लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यास आपले प्राधान्य असणार आहे. या कामास मंजूरी देण्यात आल्याने वांबोरी परिसरातील शेतक-यांनी आनंद व्यक्त केला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

