shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या या हत्याकांडाला आज वर्ष पूर्ण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१
अहमदनगर : जिल्ह्यातील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या खटल्यात ११ जणांना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल झाले आहे. 

 
मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्यासह ११ आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया झाल्यावर या खून खटल्याची न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होईल. या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे व बाळ बोठे यांनी अनुक्रमे जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केले आहेत. त्यावरील सुनावणीही प्रलंबित आहे.३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात जरे यांची हत्या झाली. त्यांच्या कारला अडवून दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोघांनी त्यांच्याशी वाद घालत असताना धारदार चाकूने त्यांचा गळा चिरून हत्या केली. सुरवातीला हे प्रकरण रस्त्यात झालेल्या वादावादीची असल्याचे समोर आले होते. मात्र, वाद सुरू असताना जरे यांच्या मुलाने एका आरोपीचा फोटो मोबाईलमध्ये काढला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी तपास केला. अवघ्या दोन दिवसातच ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) पाच आरोपींना अटक झाली.


त्यांच्या चौकशीतून जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तीन डिसेंबरला जाहीर केले. त्यानंतर मात्र बोठे फरार झाल्याने त्याचा शोध राज्यात व देशभरात घेण्यात आला. १०२ दिवसांनंतर १२ मार्च २०२१ रोजी बोठे याला हैदराबाद येथे अटक झाली.

त्यावेळी बोठेला फरार होण्यास मदत करणार्‍या आरोपींना अटक झाली. जरे यांच्या खून प्रकरणात एकूण ११ आरोपी असून, यात प्रत्यक्ष खुनात सहा व फरार असतानाच्या काळात बोठेला मदत करणारे पाच जण आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close