सेंच्युरीयन पार्कवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर पाहुण्या भारतीय संघाने यजयान दक्षिण आफ्रिकेला खिंडीत पकडले असून आपली स्थिती अतिशय मजबूत केली आहे. भारताच्या प्रयत्नांवर पाऊस खलनायक बनून विघ्न आणण्याची शक्यता असली तरी भारताला विजयासाठी हवे असलेले सहा बळी पहिल्या सत्रात मिळविले तर भारत विजयाचे सोपस्कार पुरे करू शकतो. कारण दक्षिण आफ्रिकन वेळेनुसार दुपारी एक वाजल्या नंतर तेथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने भारतासाठी काळजीचे वातावरण बनले आहे. सेंच्युरियनवर पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजविताना अवघ्या तीन गडयांच्या मोबदल्यात २७२ धावा ठोकल्या होत्या. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ पुर्णपणे पावसात वाहून गेल्याने खेळपट्टीने आपला रंग बदलला व ती फलंदाजांशी फारकत घेऊन चक्क गोलंदाजांच्या प्रेमात जाऊन पडली. तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून अठरा तर तिसऱ्या दिवशी तेरा फलंदाज बाद झाले असून धावसंख्या बेताचीच बनली आहे. तरीही पहिल्या दिवशी भारताच्या फलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या भांडवलावर भारताला अजूनही विजयाची संधी उपलब्ध आहे. भारताची धारदार गोलंदाजी बघता दक्षिण आफ्रिकेचे सहा बळी मिळविणे बिलकुल मुश्किल दिसत नाही. मात्र त्यासाठी वरूण राजाने भारतीय संघावर कृपा दाखवून सहा फलंदाज बाद होईपर्यंत दडी मारून बसण्याची गरज आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशीही खेळपट्टीचे उग्ररूप तसेच होते. खेळपट्टीवर चेंडू चांगल्या पैकी उसळतही होते. शिवाय आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारताच्या फलंदाजांचे वारू उधळणार नाहीत याची दक्षता घेतली. रिषभ पंत, अजिंक्य राहाणे, जसप्रित बुमराहा वगळता भारताच्या फलंदाजांनी धाडसी फलंदाजी करण्याचे साहस अजिबात दाखविले नाही. पहिल्या डावातील शतकवीर राहुलही विशेष चमक दाखवू शकला नाही.
चेतेश्वर पुजाराचे वारंवार संधी मिळूनही अपयशी ठरण्याची श्रृंखला सुरूच होती. धावा होत नसल्याने त्याचे तंत्र उघडे पडत असून मानसिकताही नकारात्मक दिसत असून किमान पुढच्या कसोटीत त्याला आराम देऊन फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरला संधी देता येऊ शकते. जेणे करून श्रेयसच्या गुणवत्तेला वावही मिळेल, भारताचाही लाभ होईल व पुजाराला आराम दिल्या नंतर त्याला त्याच्या खेळाचे पृथःक्करण करण्याची संधीही मिळेल.
परदेशात चांगली कामगिरी करण्याची कला अवगत असण्याची अजिंक्य राहाणेची एकच गोष्ट त्याला या सामन्यात खेळण्याची संधी देऊन गेली. वास्तविक त्याची मानसिक स्थिती व फॉर्म त्याच्या विरोधात होता व सर्वच स्तरातून त्याला संघात घेण्यास विरोध होता. तरीही संघ प्रबंधनाने त्याला दिलेल्या संधीचा त्याने बऱ्याच अंशी लाभ उठविला. केएल राहुलच्या १४६ धावानंतर राहाणेच्या ६८ धावा या सामन्यातील कोणत्याही भारतीय फलंदाजांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या धावा आहेत. राहणेने या सामन्यात दोन्ही डावात सकारात्मक मानसिकता दाखवत आक्रमक खेळ केला. त्याच्यात धावा बनविण्याची भूक आहे हे बघून नक्कीच समाधान झाले. आता हाच टेंपो त्याने कायम ठेवण्याची गरज आहे.
मागील ७६७ दिवसांपासून होत नसलेल्या शतकाचे भुत कर्णधार कोहलीच्या मानगुटीवर बसल्याचे दिसत आहे. बीसीसीआयशी घेतलेल्या पंग्याचे दिसत नसले तरी फार मोठे दडपण त्याच्यावर असल्याचे दिसून येते. त्याचे त्याच त्याच पद्धतीने बाद होणे त्याच्या तंत्रापेक्षा नकारात्मक मानसिकतेचा भाग असल्याचे दिसत आहे. जम बसल्यानंतर त्याचे बाद होणे त्याच्या लौकिकाच्या विरोधात असून त्याला लवकरात लवकर यातून बाहेर येणे गरजेचे आहे अन्यथा याचे नुकसान त्याच्या बरोबर भारतीय संघालाही सोसावे लागत आहे.
निसर्ग भारतावर कृपा करून हातातोंडाशी आलेला विजय पदरात पाडेल व गेली तीस वर्षांपासून आफ्रिकेत राहून गेलेला मालिका विजय मिळण्याची पहिली पायरी भारत चढेल. या अपेक्षेने प्रस्तुत लेख प्रपंच येथेचे थांबवू या.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

