स्वातंत्र्यसोबत स्वैराचार येतो.
स्वैराचारासोबत अत्याचार येतो.
स्वैराचार आणि अत्याचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण याला जो मुलामा दिलेला आहे तो ऐश्वर्य, मनोरंजन, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य, आचरणस्वातंत्र्य, आहारस्वातंत्र्य, ऐशाराम, सुखलोलुपता यांचा.
चंगळवादाच्या या बेगडी कोंदणाने एकदा का स्वातंत्र्य बंदीस्त झाले की त्याग, संस्कार, उपासना, दान, आदर, उपकारांची जाणिव, राष्ट्राभिमान, आरोग्य संवर्धन,पर्यावरण रक्षण, सामाजिक बांधिलकी, हे सारे विचार अडगळीत ढकलले जातात.
आज आपल्या भारतात हेच घडताना दिसत असून स्वातंत्र्याकडून स्वैराचाराकडे वेगाने झेपावणाऱ्या संस्कृतीने कुटुंब व्यवस्था, नातीगोती यांची धुळधाण अशी काही उडविलेली आहे की येत्या पन्नास वर्षांनंतर काका, मामा, मावशी, आत्या ही नाती समजवून घेताना शब्दकोशाचा आधार घ्यावा लागेल.
अगदी स्वतःपुरते विचार केला तरी, कधीही उठायचे, कधीही जेवायचे, कधीही झोपायचे, काहीही कुठेही,कसेही खायचे यामुळे आपल्या आरोग्याची जी अपरिमित हानी आपणच केलेली आहे आणि आचरण स्वातंत्र्याचा जो स्वैराचारी वापर केलेला आहे त्यामुळे आपण किती आणि कोणत्या प्रकारच्या आजारांना बळी पडलेले आहोत याचे, ज्याचे त्याने आत्मपरीक्षण केले तरी मिळालेले स्वातंत्र्य जपताना काय करायला हवे याचा बोध प्रत्येकाला होईल.
या विषयावर खूप काही लिहीण्यासारखे आहे. वाचकांनी हे मिळालेले स्वातंत्र्य कसे जतन करावे या विषयावर आपले आत्मपरीक्षण लिहावे व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण, आरोग्य जनजागरण मोहिमेमध्ये सहभाग नोंदवावा.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेच्या पर्यावरण, आरोग्य व राष्ट्रभक्ती जनजागरण मोहीम अंतर्गत प्रकाशित.
लेखक : चंद्रकांत शहासने, देशभक्तकोशकार, पुणे
मोबाईल : ९८८१३७३५८५

