शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१
अहमदनगर : थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्रामविद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले आहे.
⚡ ऊर्जा राज्यमंत्र्यांसोबत बैठक
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामविद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये बैठक घेतली. या बैठकीस महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व संचालक (प्रकल्प/मासं) भालचंद्र खंडाईत उपस्थित होते. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रेन्चायझी तत्त्वावर ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते.
कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्रामविद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे.
"काही दिवसांपुर्वी ग्राम विद्युत व्यवस्थापक त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे आले होते. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापक काम करत आहेत.
त्यांच्या कामाच्या तुलनेत त्यांना कमी मानधन मिळते अशीही त्यांची तक्रार होती. त्यांच्या या मागणीचा विचारविनिमय करून मानधनात वाढ करण्याचे निर्देश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आणि वेळोवेळी पाठपुरावा केला.
महावितरण कंपनीने एक परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे. महाविकास आघाडी नेहमीच कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे व भविष्यातही राहील - ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे"
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

