लातूर । प्रतिनिधी :-
महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण (महाज्योती) संस्थे अंतर्गत संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना बार्टी, सारथीप्रमाणे (फेलोशीप) शिष्यवृती देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्या अनुषंगाने ओबीसी, भटके-विमुक्त समूहातील संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृती देणे अपेक्षित असतानाही त्या बाबत कुठलीच हालचाल झालेली नाही. संशोधक विद्यार्थ्यांना कुठलेच भवितव्य नसल्याचा विचार सरकारी पातळीवरून होत असल्याचा आरोप करून शिष्यवृती देण्यापासून संबंधित यंत्रणा दूर पळत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
महाज्योती अंतर्गत पीएचडी, एम.फिल. च्या संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी, सारथीच्या धर्तीवर शिष्यवृती देण्याचा ठराव घेण्यात आला होता. मात्र अद्यापही अनेक ठराव हे केवळ कागदावरच राहिले आहेत. राज्याचे बहुजन कल्याण मंञी विजय वडेट्टीवार यांनी ५०० संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृती देण्याची घोषणा करून, ५०० वरून संशोधक विद्यार्थ्यांची संख्या वाढवून लवकरच संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृतीची वाटप करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतरही शिष्यवृतीबाबत काहीच हालचाल झालेली दिसत नाही. इतकच काय आज पर्यंत महाज्योतीला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकही मिळू शकला नाही. एकंदरीत महाज्योतीची संशोधक विद्यार्थी शिष्यवृतीची योजना अधांतरीच आहे. मागील चार महिन्यांपासून महाज्योती कार्यालयाअंतर्गतचे कामकाजही जैसे थेच आहे.
या अशा अवस्थेमुळे सद्य:स्थितीत तरी या योजनांचा लाभ भटक्या-विमुक्त समूहातील संशोधक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल असे दिसत नाही. यामुळे संशोधक विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. सातत्याने विद्यार्थी कार्यालयाशी संपर्क साधत आहेत परंतु कसलाही प्रतिसाद मिळत नाही. असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे केली आहे.
शिष्यवृतीसाठीचे बहुतांश संशोधक विद्यार्थी हे भटके-विमुक्त, बारा बलुतेदार समूहातील कामगारांची मुले आहेत. त्यामुळे महाज्योतीअंतर्गत येणा-या इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृती बाबत कुठलेच ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने अस्वस्थता पसरली आहे. आजपर्यंत भटक्या-विमुक्त समूहातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये शिष्यवृती न मिळण्याचे अनेक कारणे आहेत. सातत्याने राज्यकर्त्यांचा भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसंदर्भात होत असलेले दुर्लक्ष, महत्वपूर्ण योजनांचा अभाव, प्रभावहीन चळवळी पाहता एकूणच वोट बॅंकचा विचार करता शासनाचा पाहण्याचा उदासीन दृष्टीकोन याला कारणीभूत आहे. यामुळे आजपर्यंत उच्च शिक्षणामध्ये भटक्या-विमुक्तांना शिष्यवृती देण्याबाबत कुठलीच पाऊले उचलली नाहीत.
महाज्योतीअंतर्गत ( फेलोशीप) शिष्यवृतीबाबत सरकारने केवळ घोषणाबाजी व जाहिरातच केलेली आहे. यासंदर्भात कुठलीही कृती अथवा अंमलबजावणी झालेली नाही. आताही आचार संहितेच कारण पुढे करून शिष्यवृती देण्यापासून संबंधित यंत्रणा दूर पळत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिष्यवृत्ती संशोधक विद्यार्थ्यांना मिळेल का? याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. याविषयावर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी दिला आहे.

