शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा:-
दि.१/१२/२०२१
देशांतर्गत दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय वादळयुक्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणावरून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण होऊन येत्या ३६ तासांत अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात आज दि.१डिसेंबर २०२१ रोजी ढगाळ वातावरणासह सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग नुकसानीची शक्यता दिसत असल्यामुळे हवालदिल झाला आहे.
आज शुभविवाहाचे तिथी दाट असल्याने लग्न समारंभातही अडथळे निर्माण होत आहेत.
पहाटेपासून ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अहमदनगर, पुणे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.
वेगवान वारे वहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्रात यावेळी वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ४५-५५ किलोमीटरवरून ताशी ६५ कि.मीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनाऱ्यावर वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० कि.मी. प्रतितास जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

