वडापूरी येथे श्री खंडोबा देवस्थान चंपाष्टमी उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी या पावन भूमीमध्ये श्री खंडोबा यात्रा चंपाषष्ठी उत्सव दि. ९ डिसेंबर २०२१ रोजी मार्तंड भैरव चंपाषष्ठी उत्सव वडापुरी व पंचक्रोशीतील भाविक सालाबादाप्रमाणे दरवर्षी मार्तंड भैरव चंपाषष्ठी उत्सवानिमित्त व कुलदैवत श्री खंडोबा देवाची यात्रा गुरुवार दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये संपन्न झाला.
यामध्ये सकाळी देवाचा अभिषेक महापूजा बलभीम पवार व परशुराम करगळ यांच्या हस्ते संपन्न झाला. यानंतर दिवसभरात गावातील भाविकांच्या वतीने पुरणपोळीचा नैवेद्य व नारळ श्री चरणी अर्पण केले. संध्याकाळी ५ वाजता श्री खंडोबाची पालखी मिरवणूक वाजत गाजत लेझीम पथकासह काढण्यात आले. यामध्ये गावातील सर्व लहान-थोर भाविकांनी सहभाग घेतला. यानंतर पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर नीरा-भीमा कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के यांच्या हस्ते दिपोत्सव संपन्न झाला. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर सायंकाळी ७ वाजल्यापासून संजय तुकाराम पवार व मारूती करगळ यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर देवाचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम चे उद्घाटन तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे यांच्या हस्ते करण्यात आले
हा कार्यक्रम संजय हिवरे पुरंदावडेकर यांचा होता. रात्री १२ वाजता देवाची आरती करून लंगर तोडण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर चंपाषष्टी कार्यक्रमांमध्ये गावातील ग्रामस्थांनी नेहमीप्रमाणे देणगी दिली तसेच देवस्थानासाठी आपापल्या परीने सेवाभावी वृत्तीने वेगवेगळ्या माध्यमातून आपली सेवा उत्तम पद्धतीने केल्याचे दिसून आले . श्री खंडोबा यात्रा चंपाषष्ठी उत्सव गेली एकवीस वर्षापासून समस्त ग्रामस्थ वडापुरी व देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने साजरी करण्यात येते. या यात्रेसाठी पुढील दहा वर्षाची महाप्रसादाचे पंगत सध्या ठरवली गेली आहे.
श्री खंडोबा देवस्थान तीनशे वर्षापूर्वीचे असून श्रींची मूर्ती अखंड पाषाणातील कोरीव मूर्ती असून मूर्तीच्या पाठीमागे पाषाणातील पाच शिवलिंग आहेत. श्री खंडोबा देवस्थान वडापुरी व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने अतिशय भावपूर्ण आणि एकोप्याने हा चंपाषष्ठी उत्सव संपन्न होतो.
या खंडोबा मंदिरासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी पाच लाख रुपयाची संरक्षक भिंत चे काम केले आहे. तसेच उर्वरित कामे वेगवेगळ्या माध्यमातून लवकरच होतील अशी ग्रामस्थांना आशा आहे आणि खंडोबा देवस्थान परिसर अतिशय प्रसन्न आणि चांगले ठेवण्याचा ट्रस्ट च्या वतीने राहुल देवकर यांनी सांगितले.

