इंदापूर तालुक्यातील सर्व ऊसाचे गाळप करणार -हर्षवर्धन पाटील
- शेतकऱ्यांनी चिंता करू नये
इंदापूर: प्रतिनिधी दि. 19/1/22
कर्मयोगी शंकररावजी पाटील व नीरा भीमा हे दोन्ही साखर कारखाने उत्कृष्टरित्या पुर्ण क्षमतेने ऊसाचे गाळप करीत आहेत. चालू गळीत हंगामात मुबलक प्रमाणावरती ऊस गळीतासाठी शेतात उभा असला तरी उसाचे एक टिपरुही गळीताअभावी शेतात शिल्लक राहणार नाही, सर्व उसाचे गाळप केले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस गाळपाबाबत चिंता करू नये, असा स्पष्ट दिलासा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे आजअखेर 5 लाख 65 हजार 970 मे.टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे आजअखेर 3 लाख 93 हजार 130 मे.टन उसाचे गाळप झालेले आहे. सध्या 7/8 व्या महिन्यातील आडसाली उसाचे गाळप झाले असून, सुरू, पूर्वहंगामी, खोडवा उसाचे गाळप वेळेवर करण्यासाठी शेतकी विभागामार्फत नियोजन केले जात आहे. शेतकऱ्यांच्या सर्व ऊसाचे गाळप करणेसाठी आम्ही कटिबद्ध असून, ऊस गाळपासाठी शेतकर्यांनी काळजीपोटी अकारण घाई करू नये. तालुक्यातील सर्व उसाचे गाळप होण्यासाठी छत्रपती साखर कारखान्याच्या प्रशासनाशीही बोलू, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. तसेच येत्या 8 -10 दिवसांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी ऊस गाळपास संदर्भात संवाद साधण्यासाठी गावभेटी दौऱ्याचे नियोजन करणार असल्याची माहितीही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
_____________________________
फोटो :-हर्षवर्धन पाटील.

