निमगांव केतकीतील शेतकऱ्यांचे “आत्मदहन” आंदोलन मागे...
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद.
शेतकरी व व्यापारी हे दोन्ही आंदोलक व प्रशासक यांची तात्काळ जिल्हाधिकारी बरोबर बैठक लावून येथील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गांचा निर्माण झालेला प्रश्न एकत्रितपणे सामजस्याने सोडवु - तहसीलदार श्रीकांत पाटील.
शेतकऱ्यांनी १०८ दिवसाचे सुरु असलेले बेमुदत धरणे आंदोलन घेतले मागे.
आंदोलन मागे घेण्याचे जाहीर करत असताना आंदोलकांनाचे अश्रूं अनावरण झाले.
इंदापूर प्रतिनिधी: आत्मदहन हा काही मार्ग नाही. येथील पर्यायी रस्ता (रिअलायंमेंट)व गावातुन जाणारा रस्ता या शेतकरी व व्यापारी हे दोन्ही आंदोलक व प्रशासक यांची तात्काळ जिल्हाधिकारी बरोबर बैठक लावून येथील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गांचा निर्माण झालेला प्रश्न एकत्रितपणे सामजस्याने सोडवु असे आवाहन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील केल्या नंतर पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी आपले १०८ दिवसाचे सुरु असलेले बेमुदत धरणे आंदोलन व महात्मा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारचे ३० जानेवारी रोजी होणारे आत्मदहन मागे घेतले.
शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या रिअलायमेंट रस्त्याच्या विरोधासाठी १५ आक्टोबर पासून शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन निमगांव केतकीत सुरू होते. हा लादलेला रिअलायमेंट रद्द झाल्याचे लेखी आश्वासन दिले नाही तर ३० जानेवारी २०२२ ला आत्महन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता.आंदोलनाच्या ठिकाणी रविवारी सकाळ पासूनच पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता ,त्यामुळे येथे पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.यावेळी अग्निशामक बंब ही तयार ठेवण्यात आला होता.
यावेळी लादलेला रिअलायमेंट रद्द व्हावा यासाठी आम्ही प्रशासन, लोकप्रतिनिधी सर्वांकडे आमचे गाऱ्हाणे व वस्तुस्थिती मांडून सुद्धा कुणीही दखल न घेतल्याने आम्ही आत्मदहनाचे पाऊल उचलले असल्याचे सर्जेराव जाधव,तात्यासाहेब वडापुरे,ॲड. सचिन राऊत,संदीप भोंग,मच्छिंद्र आदलिंग, कुलदीप हेगडे यांनी सांगितले. तर रासपचे माऊली सलगर,अजित पाटील,किरण गोफणे,बहुजन परिषदेचे बिभीषण लोंखडे,कॉग्रेसचे तानाजी भोंग यांनी यावेळी आंदोलनास पाठिंबा दिला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे तांत्रिक व्यवस्थापक इंद्रकुमार नारायणकर यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आत्मदहन हा आंदोलनाचा मार्ग नसून हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी ,गावातील व्यापारी व दुकानदार व प्रशासन यांची तात्काळ जिल्हाधिकार्यांबरोबर बैठक लावू व त्यातून सकारात्मक मार्ग काढू त्यासाठी पर्यायी एक दोन आणि तीनचा विचार करु,जेणे करून यामध्ये कमीतकमी नुकसान होईल आणि सर्वाना सोयीचा मार्ग निघेल. तहसीलदारांच्या या तोडग्याचे आक्रमक झालेल्या शेतकरी आंदोलकांनी प्रतिसाद देत आंदोलन मागे घेण्याचे जाहीर करत असताना आंदोलकांना अश्रूं अनावरण झाले.आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, मात्र यापुढे आमच्यावर अन्याय होणार नाही अशी दखल घ्यावी. अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. या आंदोलनात शेतकरी महिलावर्गही उपस्थित होता.
आंदोलनस्थळी लाकडाचे सरण रचुन ठेवले होते.डीझेल व किटकनाशकच्या बाटल्याही आंदोलकांनी जमा केल्या. आंदोलनांच्या ठिकाणी काय घडणार हे पाहण्यासाठी निमगांवकरांनी प्रंचड मोठी गर्दी केली होती.

