shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टिम इंडियाच्या कामगिरीत घसरण सुरूच !



              दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आलेख दिवसें दिवस खालच्या दिशेने जात असल्याचे खेदजनक दृश्य सध्या दिसत आहे. दौऱ्याची सुरुवात पहिला कसोटी सामना जिंकून झोकात करणाऱ्या भारताच्या विजयाची गाडी कधी पराभवाच्या रस्त्यावर आली व पराभवाच्या खोल खाईत गेली हे न उलगडणारे कोडे तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना पडले आहे. कसोटी मालिकेतला दुसरा सामना भारत जिंकता जिंकता हारले. त्याचे दुःख ताजे असतानाच तिसरा कसोटीही भारत केविलवाण्यारित्या हरल्याने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न हवेतच विरले.

                 

या पराभवाच्या जखमा ताज्या असतानाच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली. संघात ताज्या दमाचे वनडे स्पेशालिस्ट खेळाडू आल्याने भारत आपला विजयी रथ पुन्हा डामडौलाने दौडवील अशी अपेक्षा होती. मात्र नियमित कर्णधार रोहित शर्माच्या गैरहजेरीत कर्णधारपदाची धुरा हाती आलेला के.एल राहुल नाणेफक हारला आणि तेथेच भारताच्या उलट्या गिणतीला सुरूवात झाली.

                  
दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात निराशजनक झाली. त्यांचे तीन प्रमुख फलंदाज केवळ ६८ धावात तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर कर्णधार टेंबा बवुमा व ड्यूसेन यांच्यातील द्विशतकी भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला संकटातून बाहेर तर काढलेच पण संघाची धावसंख्या तिनशेच्या घरात नेऊन ठेवली. या खेळीदरम्यान बवुमा ११०, व ड्युसेन नाबाद १२९ यांच्या खेळी लक्षणीय ठरल्या. ड्युसेन केवळ १३ धावांवर असताना यष्टीरक्षक रिषभ पंतने त्याचा झेल सोडून केवळ ड्यूसेनलाच जीवदान दिले नाही तर टिम इंडियाच्या पराभवाची कबरच खोदली. आपल्याला आठवत असेलच वॉन्डरर्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात याच रिषभ पंतने किगन पिटरसनचा बारा धावांवर झेल सोडला होता. त्यानंतर पिटरसनने दोन उपयोगी भागिदाऱ्या करत स्वतः ६२ धावांची खेळी सजविली. त्यानंतर आफ्रिकन गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून सामना जिंकला. मगआत्मविश्वास वाढलेल्या पिटरसनने तिसऱ्या कसोटीत ७२ व ८२ धावा ठोकून आफ्रिकेला मालिका जिंकून देण्यात मोलाची कामगिरी केली व स्वतःही सामनावीर, मालिकावीर पुरस्कार पटकविला.

              
हंगामी कर्णधार केएल राहुलकडे भारताचा भविष्यातला कर्णधार म्हणून बघितले जाते. मात्र आयपीएल, वाँडरर्स कसोटी व या सामन्यात ज्याप्रमाणे त्याने संघाचे नेतृत्व केले ते बघता तो कोणत्याच प्रकारच्या संघाचा कर्णधार करण्याच्या लायकीचा नाही हे सिध्द झाले. त्याला धड गोलंदाजीत योग्य बदल करता आले नाही, ना धड क्षेत्ररक्षण अचूक लावता आले. संघात व्यंकटेश अय्यरच्या रूपात अष्टपैलू खेळाडू उपलब्ध असताना शिवाय ड्यूसेन-बवुमा जोडी इतर कोणत्याही गोलंदाजाकडून फुटत नसताना व्यंकटेशला गोलंदाजी देणे गरजेचे असताना त्याला एकही षटक न देणे हे राहुलच्या दिवाळखोर कप्तानीचे लक्षणं असल्याचे स्पष्ट होते. त्याचबरोबर शार्दूल ठाकूर डेथ ओव्हर्सचा योग्य गोलंदाज नसल्याचे माहिती असूनही डेथ ओव्हर्स़ स्पेशालिस्ट बुमराहा व भुवनेश्वरचे षटके आधीच संपवून टाकणे राहुलची अपरिपक्वता दाखवून गेले. 

               
भारताच्या क्षेत्ररक्षकांनीही अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण केले व सोपे सोपे झेल सोडले. तर गोलंदाजांमध्ये बुमराहा वगळता इतर गोलंदाजांत जराही उत्साह दिसला नाही. नोबॉल ही भारतीय गोलंदाजांची मोठी डोकेदुखी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. खास करून शार्दूल ठाकूरला यावर मोठे काम करण्याची गरज आहे.
                  
केवळ उत्कृष्ठ फलंदाजीतील कामगिरीमुळे केएल राहुलला कर्णधारपदाची लॉटरी लागत आहे. त्याच्यात कर्णधारपदाचे कुठलेही मटेरियल नाही. पण पहिल्या कसोटीतील शतकानंतर त्याच्यातील फलंदाजही मृत झाल्याचे त्यानंतरच्या प्रत्येक डावात घडले व या सामन्यातही त्याचा प्रत्यय आला. डावखुऱ्या शिखर धवनने ७९ धावांची खेळी करून स्वतःची जागा सेफ केली. मात्र संघाला गरज असताना हाराकिरी करून बाद झाला.
                    
मागील तिन महिन्यांपासून दर महिन्याला एक असे टि-२०, वनडे व कसोटीचे कर्णधारपद गमावलेला विराट कोहली या सामन्यात निव्वळ एक फलंदाज म्हणून खेळला. या सामन्यात त्याने ५१ धावाही केल्या. मात्र त्या खेळीत जुन्या विराट कोहलीची झलक अजिबात दिसली नाही. शिवाय संघाच्या संकटसमयी त्याच्याकडून अपेक्षित असलेली मदत कर्णधाराला झाली नाही. केपटाऊन कसोटीत डिआरएस प्रकरणात स्टंप माईक मध्ये वादग्रस्त विधान करून प्रक्षेपण कंपनी सुपर स्पोर्टसवर ताशेरे ओढणाऱ्या कोहलीला या कंपनीने क्षेत्ररक्षण करताना कोहलीवर कॅमेरा न ठेवता त्याला प्रकाशझोतातून वगळल्याचे विदारक दृश्यही दिसले.
                   
चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणे कसोटी मालिकेत मधल्या फळीत सातत्याने अपयशी ठरल्याने भारत मालिका हरले असे सांगितले जाते. मात्र या सामन्यात श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर व रिषभ पंतही फेल गेल्याने नजरेच्या टप्प्यात दिसणारा विजय भारताच्या हातून निसटला. भारतीय संघाच्या कर्णधार पदाचा दावेदार समजल्या जाणाऱ्या रिषभ पंतला अजूनही परिस्थितीचे गांभीर्य समजत नाही. बेजबाबदार फटके मारून बाद होण्याचा लौकीक त्याने या सामन्यातही जपला. संघातून वगळण्याची वेळ आल्यावर एखादी मोठी खेळी करून स्वतःचे स्थान वाचवण्यात यश मिळत असलेल्या पंतला फलंदाजी व गोलंदाजीत अजून खूप काही सुधारणा करायच्या आहेत. तेंव्हा कर्णधारपद सोडा त्याला संघात ठेवायचे नाही यावर देखील गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.
               
गोलंदाजीत सडकून मार खाल्लेल्या शार्दूल ठाकूरने नाबाद अर्धशतकी खेळी करून आपली उपयुक्तता सिद्ध केली मात्र त्याच्या कडून संघाला बॅट व बॉलने प्रत्येक सामन्यात सारखीच कामगिरी अपेक्षित असल्याने त्याच्या खेळात सुधारणा होणे गरजेचे आहे. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा संघाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होतोय असे सकृत दर्शनी दिसत आहे. त्यावर लवकारात लवकर तोडगा निघाला पाहिजे नाहीतर एका चांगल्या संघाचा वेस्ट इंडिज व्हायला वेळ लागणार नाही.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close