shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टिम इंडिया मकर संक्रांतीचा आनंद द्विगुणीत करणार ?



           दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय फलंदाजांनी आपल्या खराब कामगिरीचा सिलसिला सुरूच ठेवल्याने तिसऱ्या व निर्णायक कसोटी सामन्यात भारतासमोर पराभवाचे संकट उभे ठाकले आहे. सामन्याचे पूर्ण दोन दिवस शिल्लक असून दक्षिण आफ्रिकेला सामना व मालिका जिंकण्यासाठी केवळ १११ धावा आणखी काढायच्या असून सध्याचा त्यांचा खेळ व मानसिकता बघता ते आपले उद्दीष्ठ साध्य करण्याचीच मोठी शक्यता असून मागच्या कसोटीत जे भारतीय गोलंदाजांना जमलं नाही तेच अवघड काम करण्याची पूर्ण जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्यावर येऊन पडली आहे. दक्षिण आफ्रिकेचे उर्वरीत आठ गडी बाद करण्यात त्यांना यश मिळते का नाही ? हाच सध्या लाखमोलाचा प्रश्न सर्वांसमोर आहे. गोलंदाजांच्या यशस्वीतेवरच भारताचे दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका विजय मिळविण्याचे स्वप्न अवलंबून आहे.

             भारताचे गोलंदाज त्यांच्या परीने अटोकाट प्रयत्न करतात हे आपण यापूर्वी अनेकदा व याच कसोटीच्या पहिल्या डावात अनुभवले आहे. पहिल्या डावात भारताचा संघ २२३ धावात बाद झाल्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या करामतीमुळे भारत तेरा धावांची मनोबल वाढविणारी आघाडी घेऊ शकला होता. मात्र त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी दाखविलेला निष्काळजीपणा भारताला पराभवाच्या दारात घेऊन उभा आहे.

               भारताचे सलामीवीर के एल राहुल व मयंक अग्रवाल पहिल्या कसोटीचा पहिला डाव वगळता एकदाही संघाला भरीव सलामी देऊ शकले नाही. शिवाय मयंक अग्रवालचे पहिल्या सामन्यातील अर्धशतक वगळता त्याने केवळ मैदानावर हजेरी लावण्याचेच काम केले. तर राहुल एक शतक व एक अर्धशतक ठोकल्यानंतर निस्तेज झाला. त्याचा फटका भारताला चांगलाच बसला.

                चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणे हे दोघेही नाव मोठे व लक्षण खोटे या उक्ती प्रमाणे वागले. ज्या अनुभवाच्या फायद्यासाठी त्यांना संघात घेतले त्या अनुभवाचा त्यांनी संघाला काही एक फायदा करून दिलाच नाही तर उलट संघाला खाईत नेऊन सोडले. याचा परिणाम त्यांची कारकिर्द अकाली संपणार ही आता काळ्या दगडावरची रेष आहे.

                ज्या कर्णधार कोहलीला जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून गणले जाते त्याचा लवलेशही त्याच्या खेळात या सामन्यात जाणवला नाही. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या कोहलीने दोन्ही डावात खेळलेले चेंडू बघता त्याचाही स्वतःवरचाच भरवसा कमी झाल्यासारखे वाटले. पहिल्या डावात २२० चेंडूत ७९ धावा बऱ्या वाटल्या, पण दुसऱ्या डावात १४३ चेंडूत केलेली २९ धावांची खेळी त्याच्या लौकिकाच्या विपरीत होती. गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर संथ खेळण्यापेक्षा धावा वाढविण्यावर जोर दिला असता तर त्याच्या बरोबर संघाच्याही धावा वाढल्या असत्या. कोहलीचा या सामन्यातील खेळ बघितला तर आपल्याला सहज जाणवेल की त्याच्या खेळात एक वेगळीच भीती व काहीसा स्वतःला फलंदाज म्हणून सेफ करण्याचा स्वार्थीपणा दिसला.

                 मागच्या कसोटीत बेजबाबदार फटका मारून सर्वांच्या टिकेचा धनी बनलेल्या रिषभ पंतने ४ बाद ५८ धावा असताना मैदानाचा ताबा घेतला. त्यानंतर भारताने १४० धावा बनविल्या त्यापैकी नाबाद १०० धावा त्याच्या एकटयाच्या होत्या. यावरून त्याच्या खेळीचे महत्व लक्षात येते. पंत जर चांगला खेळला नसता तर भारताच्या शंभर धावाही झाल्या नसत्या व भारताला भोगीच्या दिवशीच पराभवाचा भोग पत्करावा लागला असता. या शानदार खेळीने पंतने टिकाकारांना चोख उत्तर दिले असले तरी त्याला यापुढे अशा अनेक खेळी सातत्याने कराव्या लागतील.

                  रविचंद्रन आश्वीन, शार्दूल ठाकूर, जसप्रित बुमराहा, उमेश यादव, मोहम्मद शमी फलंदाजीत कच्चे लिंबु साबीत झाले, पण गोलंदाजीत प्रतिपक्षाचा पाचोळा करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. द. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दोन्ही डावात टिच्चून असा भेदक मारा करून कागदोपत्री बलाढय असलेली भारतीय फलंदाजी नेस्तनाबुत केली असल्याने भारताच्या फॉर्मात असलेल्या गोलंदाजाकडून तशाच कामगिरीची  अपेक्षा आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेसमोर सध्या अतिशय तोकडे आव्हान असल्याने आफ्रिकन फलंदाजांनी हाराकिरी केली तरच भारताच्या विजयाची शक्यता आहे. नाहीतर कमजोर लेखलेल्या दक्षिण आफ्रिकेला मायदेशात स्वतःची शान वाढविण्याची संधी आपोआप मिळणार आहे. त्यामुळे मकर संक्रातीच्या दिवसाचा गोडवा वाढविण्याची अवघड जबाबदारी भारतीय संघ पेलतो का ? यावरच संक्रातीचे तीळ गोड का कडू हे ठरवतील.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close