shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नमामि चंद्रभागा प्राधिकरणाअंतर्गत शक्ति प्रदत्त समितीची तिसरी बैठक संपन्न*

*नमामि चंद्रभागा प्राधिकरणाअंतर्गत शक्ति प्रदत्त समितीची तिसरी बैठक संपन्न*
इंदापूर प्रतिनिधी(पुणे, दि. 14):- चंद्रभागा (भीमा) नदी व तिच्या उपनद्यांमध्ये होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी नमामि चंद्रभागा प्राधिकरणाअंतर्गत शक्ति प्रदत्त समितीच्या तिसऱ्या बैठकीचे आयोजन मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती अध्यक्षतेखाली गुरुवारी करण्यात आले. जलप्रदूषण कमी करण्यासाठी तयार केलेले प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना श्री. चक्रवर्ती यांनी दिल्या. 

बैठकीस  पुणे विभागीय आयुक्त तथा नमामि चंद्रभागा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सौरभ राव, शक्ति प्रदत्त समितीचे सदस्य तथा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सोलापुरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते.

श्री. राव म्हणाले, महाराष्ट्रामधील भिमा (चंद्रभागा) नदी ही भाविकांसाठी महत्वपूर्ण आहे. परंतू भीमा नदीचे व तिच्या उपनद्यांचे विविध मार्गांनी प्रदूषण होत असल्याने या नद्यांना प्रदुषणमुक्त करणे गरजेचे आहे. नदीकाठावरील गावे आणि शहरात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांची उभारणी केल्यास नदीपात्रामध्ये अस्वच्छ पाणी येण्यास प्रतिबंध होण्यास मदत होईल.

देहू, आळंदी, पंढरपुर यांसारख्या धार्मिक ठिकाणी वारकरी व भाविकांसाठी शौचालय बांधणे व इतर सुविधा उपलब्ध करून देणे. नद्यांच्या काठांवर वृक्षलागवड करणे व हरित पट्टे विकसित करणे आदी उपाययोजना राबविणे व त्या अनुषंगिक प्रस्तावांना मान्यता देणे, नविन प्रस्ताव मांडणे याबाबत श्री. राव यांनी माहिती दिली.

श्री. शंभरकर यांनी भीमा नदीच्या काठांवर असलेल्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारणी आणि पंढरपुर येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्राधिकरणाअंतर्गत करावयाच्या सुविधांबाबात, तर श्री.आयुष प्रसाद यांनी  पुणे जिल्ह्यामधील गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीबाबत प्रस्तावांचे समितीसमोर सादरीकरण केले. त्याचप्रमाणे भीमा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी भीमा नदीच्या खोऱ्याचा अभ्यास करून आवश्यक उपक्रमांचा बृहत आराखडा तयार करण्याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

बैठकीस सामाजिक वनीकरण विभागाचे वन संरक्षक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आदी उपस्थित होते.
close