गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी दिर्घ आजारानंतर शेवटचा श्वास घेतला आणि भारतच नव्हे तर संपूर्ण जगच दुःख सागरात कोसळले. लतादिदी गायन व सिनेतृष्टीतील एक माईलस्टोन होत्या. परंतु त्याही पेक्षा त्या भारतीय क्रिकेटच्या निस्सीम चाहत्या होत्या. त्यांच्या जगाचा निरोप घेण्याने सर्वच क्षेत्रांना मोठा आघात पोहोचला आहे. लतादिदीने सिनेसृष्टीसाठी भरभरून दिले परंतु एकेकाळी हलाखीचे साम्राज्य असलेल्या बीसीसीआय व भारतीय क्रिकेटपटूंना वेळोवळी मदतीचा हात पुढे केला. लतादिदींनी देशप्रेमच व्यक्त केले नाही तर भारतीय क्रिकेटला एक नवसंजीवनी देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
सन १९८३ मध्ये जेंव्हा भारताने पहिला विश्वचषक जिंकला तेंव्हा बीसीसीआय अतिशय गरीब होती. आजच्या प्रमाणे बीसीसीआय खेळाडूंना मानधन व सोयीसुविधा देऊ शकत नव्हती. त्यावेळी लतादिदीने भारतीय खेळाडूंना मदतीचा हात दिला होता आणि त्या विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेटचे भाग्यच बदलले. नंतर बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनले, भारतीय संघ जगातील अग्रणी व प्रबळ संघ बनला. या मागे लतादिदींचा फार मोठा हात आहे.
लंडनमध्ये लतादिदींचा बंगला सुप्रसिद्ध क्रिकेट मैदान लॉर्डसला लागूनच असून त्या बंगल्यातून बसल्या बसल्या क्रिकेटचा सामना सहज बघितला जाऊ शकतो. सन १९८३ च्या त्या अविस्मरणीय अंतिम सामन्यापूर्वी लतादिदींनी संपूर्ण भारतीय संघाला आपल्या याच निवासस्थानी रात्रीचे भोजन दिले होते. त्यानंतर लतादीदींनी अंतिम सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन बघितला होता. त्या अंतिम सामन्यानतंर लतादिदींनी भारतीय संघाला पुन्हा एकदा मेजवानी देऊन राष्ट्रीय आनंदोत्सव साजरा केला होता.
सन १९८३ च्या विश्वविजेत्या संघाला बक्षिस देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते. तेंव्हा लतादिदींनी स्वत: पुढाकार घेत दिल्लीच्या इंद्रप्रस्थ स्टेडियमवर एक संगिताचा कार्यक्रम घेऊन वीस लाख रुपये कमावले व ते बीसीसीआयच्या स्वाधीन केले. त्यानंतर बीसीसीआयने विश्वविजेत्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षिस म्हणून दिले होते. लतादिदींचे ते पैसे भारतीय क्रिकेटसाठी कमालीचे धार्जीण झाले. त्यावेळी लतादिदींचे धाकटे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी क्रिकेटपटूंच्या सन्मानार्थ एक प्रेरणादायी गित लिहिले होते. ते लतादिदीने त्या कार्यक्रमात सादर केले होते. सन २०११ मध्ये भारताने दुसऱ्यांदा विश्वकरंडक जिंकला तेंव्हा बीसीसीआय प्रत्येक खेळाडूला दोन दोन कोटी रुपये देण्याइतपत सक्षम झाली होती.
रविवारी सकाळी लतादिदींच्या निधनाची दुःख वार्ता समजली तेंव्हा माझेही काळीज सुन्न झाले होते. कारण शनिवारी रात्री भारताच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने विंडीजमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकविले आणि त्याच वेळी बीसीसीआयने संघातील खेळाडूंना प्रत्येकी चाळीस लाख रुपये देण्याचे घोषित केले. ही सुखद बातमी ऐकण्यास लतादिदी आज आपल्यात नाहीत मात्र त्यांनी प्रामाणिकपणे केलेली मदत भारतीय क्रिकेटला रास आली याचे मोठे समाधान त्यांना नक्कीच मिळेल.
या थोर विभूतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रध्दांजली ! लतादिदी अमर रहे !!
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

