shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारत दौऱ्यात विंडीजची संपूर्ण शरणागती ; टिम इंडियाची आत्मसन्मान वाढविणारी प्रगती..!


            एखाद्या दुःखद स्वप्नाप्रमाणे वेस्ट इंडिजचा भारत दौरा संपला. विंडीजने या दौऱ्यात प्रथम तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली व तीनही सामन्यात भारतासमोर सफसेल लोटांगण घेतले. त्यानंतर झालेल्या तीन टि- ट्वेंटी सामन्यात परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. कारण विंडीजचा संघ टि- ट्वेंटी सामन्यात जगातल्या प्रबळ संघात गणला जातो. या संघात अतिशय विस्फोटक फलंदाज, धारदार जलदगती गोलंदाज, दर्जेदार फिरकीपटू व खास करून अष्टपैलू खेळाडूंचा विशेष भरणा आहे. शिवाय किरॉन पोलॉर्डसारखा भारदस्त व्यक्तीमत्व असलेला अनुभवी कर्णधार या संघाची धुरा वाहत आहे. त्यातच अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे भारतात येण्यापूर्वी मायदेशात झालेल्या टि- ट्वेंटी मालिकेत विंडीजने आयसीसी मानांकनात अग्रेसर असलेल्या इंग्लंडला चिरडून मालिका जिंकल्यामुळे भारतातही त्यांच्याकडून विशेष कामगिरीची अपेक्षा होती. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे विंडीज संघातील अनेक खेळाडू आयपीएलमध्ये विविध संघांकडून सातत्याने खेळत असल्याने भारतीय खेळपट्टया त्यांच्या परिचयाच्या होत्या. त्यामुळे त्यांना चांगली कामगिरी करण्यास आत्मिक बळ मिळणार होते.

             परंतु प्रत्यक्ष मालिकेला सुरूवात झाल्यानंतर विंडीजकडून भारतावर आक्रमण झालेच नाही. एकट्या निकोलस पूरननेच एकहाती किल्ला लढविला. तीनही सामन्यात त्याचे आक्रमक अर्धशतके वांझोटे ठरले. रोवमन पॉवेलने त्याला थोडीफार साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचेही प्रयत्न अपुरे पडले. विशेष म्हणजे शेवटचे दोन सामने दव पडलेल्या ओल्या मैदानात झाले तेंव्हा ते धावांचा पाठलाग करत होते. विजय अवाक्यात आला असतानाही त्यांना दोन सामन्यात आपल्या उद्दिष्टापर्यंत जाता आले नाही.
               या मालिकेत विंडीज संघ पूर्ण क्षमतेने खेळत होता. परंतु गोलंदाजीत ते खास कामगिरी करू शकले नाहीत. भारताचे फलंदाज नवखे व कमी अनुभवी होते त्यांना रोखण्यात ते कमी पडले. शिवाय वाईड बॉल व गचाळ क्षेत्ररक्षण करून त्यांनी आपल्या अडचणीत स्वतः होऊन भर घातली. कर्णधार पोलॉर्ड स्वतःही नेतृत्व, फलंदाजी व गोलंदाजी या तिनही क्षेत्रात निष्प्रभ ठरल्याने विंडीजला रित्या हाताने परतावे लागले.
                भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत सडकून मार खाऊन आल्यानंतर संघातही बरेच बदल झाले. रोहीत शर्माने पूर्ण कालिन कर्णधार म्हणून धुरा स्विकारल्यानंतर संघाची जडणघडण प्रक्रिया सुरू झाली. संघात नवे खेळाडू आले व त्यांनी आपला प्रभाव दाखवून संघाच्या यशात वाटा उचलला. रवि बिश्नोई, हर्षल पटेल, दिपक चाहर, शार्दूल ठाकूर, व्यंकटेश अय्यर यांनी संधीचा अचूक लाभ उठवित आपले संघातील स्थान बळकट केले. यामध्ये विशेष उठावदार कामगिरी केली ती सुर्यकुमार यादवने. वनडे मालिकेत सातत्यमय खेळ केल्यानंतर टि- ट्वेंटी मालिकेत संकटसमयी संघाचा ढासळता डोलारा सांभाळून संघाला सदृढ स्थितीत पोहचविले. याचे फळ त्याला तिसऱ्या टि-ट्वेंटी सामन्यात सामनावीर पुरस्कारासह मालिकावीर पुरस्कार मिळून झाले.
             व्यंकटेश अय्यरनेही मिळेल त्या संधीचा लाभ उठवून फलंदाजी व गोलंदाजी या क्षेत्रात आपली छाप सोडून अष्टपैलू खेळाडूची भारताची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने आश्वासक कामगिरी केली. हर्षल पटेलने प्रत्येक सामन्यात आपल्या मर्यादित अस्त्रांचा प्रभावी वापर करत भविष्यात भारतासाठी शुभ संकेत दिले. रवि बिश्नोई हा नवा लेगस्पिनर उद्याची आशा दाखवून गेला तर यजुवेंद्र चहलही रंगात आला.
             आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ईशान किशन विशेष चमक दाखवू शकला नाही. मात्र त्याला सुधारणा करण्यास पुरेसा वाव असल्याने भविष्यात भारतीय संघाबरोबर तो हमखास असणार आहे. या मालिकेत भारताचे क्षेत्ररक्षण चिंतेची बाब असून निर्णायक क्षणी सोपे सोपे झेल सोडणे संघाला संकटात टाकत आहे. त्यावर युध्द पातळीवर काम करणे गरजेचे आहे. तर वाईड चेंडू टाकणे हा नवा आजार भारतीय गोलंदाजांना जडला आहे. त्यामुळे विपक्षी संघाला अवांतर धावा व जास्तीचे चेंडू खेळायला मिळतात. त्याचे नुकसान भारताला निर्धारीत वेळेत आपले षटके पूर्ण करता न येण्यात होतो व संघाला कारवाईचा सामना करावा लागतो. यावरही तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत.
             कर्णधार म्हणून रोहीतची कामगिरी उठावदार असून त्याच्या यशाची टक्केवारी ८४ टक्के इतकी झाली असून पंचवीस पेक्षा जास्त सामन्यात नेतृत्व केलेल्या जगातील समस्त कर्णधारात ती अव्वल आहे. यामुळे रोहीतची " मिशन वर्ल्डकप " मोहीम फत्ते होण्याची आशा वाढली असून मागील सलग नऊ सामने जिंकून भारताने आपल्याच सर्वोच्च कामगिरीची बरोबरी साधली आहे. त्याचबरोबर विंडीजवरील मालिका विजयाने सहा वर्षानंतर भारत प्रथमच आयसीसीच्या टि- ट्वेंटी मानांकनात प्रथम क्रमांकावर आले असल्याने संघाचे मनोबल नक्कीच उंचावले असणार ? सध्याची भारताची होत असलेली प्रगती नक्कीच स्पृहणीय असून संघाचे त्यासाठी अतिविशेष अभिनंदन !!!
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close