shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्हॅलेंटाईनच्या प्रेमाचा क्रिकेटलाही सलाम...!



            चौदा फेब्रुवारी या दिवसाला संपूर्ण विश्वात काही अपवादात्मक देश सोडल्यास अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. चौदा फेब्रुवारी हा दिवस येण्याचा त्याच्याशी संबंधीत बरेचसे लोक अनेक दिवस अगोदरच त्याची वाट पहात असतात. जसा चातक पक्षी पावसाची ! त्या काळात त्याची उत्सुकता व आतुरता पराकोटीला पोहोचलेली असते. चौदा फेब्रुवारी हा दिवस स्वतंत्रपणे सर्वत्र प्रेमदिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसालाच व्हॅलेंटाईन डे म्हणून संबोधले जाते. वास्तविक पहाता चौदा फेब्रुवारी हा जरी स्पेशल प्रेम डे असला तरी याची सुरुवात एक आठवडाभर अगोदरच म्हणजे सात फेब्रुवारीलाच होते. 

             सात फेबुवारीलाच सुरू होणाऱ्या या प्रेमवेडयांच्या प्रित सप्ताहातील प्रत्येक दिवस  वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो तसेच मोठ्या धामधुमीत साजराही केला जातो. सात फेब्रुवारीला रोझ डे, आठ फेब्रुवारीला प्रपोज डे, नऊ फेब्रुवारीला चॉकलेट डे,  दहा फेब्रुवारीला टेडी डे, अकरा फेब्रुवारीला प्रॉमिस डे, बारा फेब्रुवारीला किस डे, तेरा फेब्रुवारीला हग डे तर चौदा फेब्रुवारीला सर्वांचा मोस्ट वॉन्टेड व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात व उल्हासात साजरा केला जातो.
            काही अपवादात्मक ठिकाणी व परिस्थितीत याला गालबोट लागतं तो भाग अलाहिदा ! व्हॅलेंटाईन नावाचा प्रेमदिवस साजरा करण्यासाठी आता तर प्रेमविरांजवळ पूर्वीच्या तुलनेत अत्याधुनिक प्रचार व प्रसार यंत्रणा उपलब्ध आहेत. जणू विज्ञानाची प्रगती प्रेमासाठी पोषकच ठरली आहे ! इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉटसप, इंस्टाग्राम, ट्वीटर, फ्लीट, कू, मोबाईलहून थेट संभाषण, स्टेनो़ लिपी यांचाही वापर या संपूर्ण प्रित सप्ताहात मोठया प्रमाणात केला जातो. तर ग्रिटींग्ज, महागडया भेटवस्तूंची मोठी देवाण घेवाण होतो. याचा लाभ व्यावसायिक विक्रेत्यांना चांगल्या प्रमाणात होतो.
             वरील सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्ही म्हणाल आम्हांला तर हे सगळं माहिती आहे. येथे आम्हांला हे सांगण्याची काय गरज ?  परंतु असली राज की बात ही आहे की, क्रिकेट व व्हॅलेंटाईन यांची प्रित जरा हटकेच आहे. व्हॅलेंटाईन हे वलंयाकीत नाव असलेले सहा क्रिकेटपटू आतरराष्ट्रीय स्तरावर चमकून गेले आहेत. यापैकी व्हिन्सेंट व्हॅलेंटाईन हे सन १९३३ मध्ये वेस्ट इंडिज कडून दोन कसोटी सामने खेळले आहेत. सन १९३० च्या दशकात ब्रायन व्हॅलेंटाईन हे इंग्लंडकडून सात कसोटी सामने खेळले. आल्फ व्हॅलेंटाईन हे वेस्ट इंडिज कडून खेळले असून व्हॅलेटांईन नाव असलेल्या क्रिकेटपटूत त्यांची कारकिर्द सर्वात यशस्वी ठरली आहे. आल्फ व्हॅलेंटाईन हे फिरकी गोलंदाज म्हणून अतिशय प्रभावी होते. त्यांनी विंडीजसाठी १३९ बळींची कमाई केली आहे.
            व्हॅलेंटाईन या वलयांकीत नावात चौथा क्रमांक लागतो तो महिला क्रिकेटपटू कॅरोल व्हॅलेंटाईन हिचा !  सन १९३४ -३५ मध्ये महिलांचे अधिकृत कसोटी सामने सुरू झाले. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या या पहिल्या ऐतिहासीक महिला क्रिकेट कसोटीत खेळण्याचा मान कॅरोल व्हॅलेंटाईन हिला मिळाला आहे.
            आल्फ व्हॅलेंटाईन हे व्हॅलेंटाईन ग्रुपमधील सर्वात जास्त यशस्वी व प्रसिद्ध होते. आल्फ व व्हिन्सेंट हे  दोघेही वेस्ट इंडिजच्या जमैका बेटावरचे. परंतु त्या दोघात कुठलेही नाते संबंध नव्हते. केवळ नावात व्हॅलेंटाईन होते इतकीच काय ती सान्यता !
            सन १९७९ च्या विश्वचषक स्पर्धेत जॉन व्हॅलेंटाईन नावाचा खेळाडू कॅनडाकडून तीन सामने खेळला होता. मॅथ्यू व्हॅलेंटाईन फ्लेमिंग हा खेळाडू इंग्लंडकडून अकरा एकदिवशीय सामने खेळला. या मॅथ्यूच्या वडिलांचे नाव व्हॅलेंटाईन होते. म्हणून येथे त्याच्या व्हॅलेंटाईन नावाचा उपयोग करणेही अगत्याचे ठरते.
            जरा नीट विचार केला तर व्हॅलेंटाईन नावाच्या खेळाडूंमुळे व्हॅलेंटाईन डे पाळला जात नाही. मात्र व्हॅलेंटाईन डे मुळे त्यांच्या नावाचे स्मरण नक्कीच होते. परंतु व्हॅलेंटाईन हे ओढ लावणारे अतूट नाव आहे ! क्रिकेटमधील सर्व व्हॅलेंटाईन्सने आपलं सारं प्रेम क्रिकेटवर भरभरून केले. त्यामुळे क्रिकेट, प्रेम व व्हॅलेंटाईन यांची दास्तान अजबच वाटते. म्हणून या तिघांनाही सलाम केल्या वाचून राहावत नाही.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close