प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
सोलापूर : दि. २७ / सोलापूर जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलच्या विरोधात यंदा दूध संघ बचाव कृती समितीने आव्हान दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्या सून वैशाली जितेंद्र साठे या विरोधात दूध संघ बचावचा उमेदवार असल्याने हे निवडणूक प्रतिष्ठेची झाली. यापूर्वी १७ संचालक पैकी ओबीसी मधून काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी माघार घेतल्याने दीपक माळी हे बिनविरोध झाले.उर्वरित सोळा जागेसाठी निवडणूक लागली त्यासाठी ३१ उमेदवार रिंगणात होते शनिवार २६ फेब्रुवारी रोजी बाळे परिसरातील चंडक प्रशालेमध्ये मतदान झाले. सकाळी आठ ते पाच दरम्यान ३१६ मतदारांपैकी चुरशीने ३१३ मतदान झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले. आपल्या सून उमेदवार असल्याने काका साठे हे दिवसभर मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. दरम्यान पराभवाची चाहूल लागताच काका साठे हे मतदान केंद्र सोडून निघून गेले, सत्ताधारी शेतकरी विकास आघाडी पॅनलने एकहाती सत्ता प्रस्थापित केली.

