shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोहीत शर्माची " १००० " शी असलेली जगावेगळी जवळीक...!


            अठ्ठेचाळीस वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेट  सामन्यांच्या इतिहासात प्रथमच एक संघ आपला एक हजारावा सामना खेळणार आहे. सहा फेब्रुवारी २०२२ रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद या जगातल्या सर्वात मोठ्या मैदानावर ही ऐतिहासिक लढत यजमान भारत व पाहुणा वेस्ट इंडिज या संघात खेळली जाणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.  माजी विश्वविजेत्या संघांना हा अनोखा सामना खेळण्याची संधी मिळणार असून ती या दोन्ही संघासांठी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.

             भारताने आपल्या आजवरच्या वनडे सामन्यांच्या प्रवासात पंचविस कर्णधार बघितले असून या ऐतिहासिक सामन्यात रोहीत शर्माला संघाचे नेतृत्व करण्याचा दुर्लभ लाभ मिळणार आहे. रोहीतने वनडे सामन्यात यापूर्वी भारताचे हंगामी नेतृत्व केले असून या मालिकेपासून तो भारताचे नियमीत कर्णधारपद भूषविणार आहे. रोहीत शर्माच्या कारकिर्दीत अनेक पराक्रम घडले असून काही चमत्कारीक विक्रमही त्याच्या नावावर असून अतिशय दुर्मिळ असे ऐतिहासिक योगायोगही रोहीत शर्माशी जोडले आहेत. आज आपण अशाच एका भन्नाट योगायोगाच्या घटनेची चर्चा येथे करणार आहोत.

             भारताचा सफेद चेंडूच्या खेळातील मियमीत कर्णधार रोहीत शर्माच्या मागील सात वर्षांच्या कारकिर्दीत एक योगायोग तब्बल चार वेळा घडला आहे. तो म्हणजे एक हजार या अंकाशी त्याच्याशी असलेली अनोखी जवळीक क्रिकेट जगताने अनुभवली आहे.
               येत्या रविवारी वेस्ट इंडिज विरूध्द भारत यांच्यातील सामना हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही संघाने खेळलेला वैयक्तिक एक हजारावा सामना असणार आहे आणि या ऐतिहासिक सामन्यात रोहीत शर्मा भारताचे नेतृत्व करणार असून ती एक अतिशय दुर्लभ घटना ठरणार आहे.

               सन २०१५ मध्ये रोहीतच्या कारकिर्दीत एक हजार या अंकाचा अशाच एका ऐतिहासिक पराक्रमाशी संबंध आला होता. त्यावेळी रोहीतने भारताकडून कसोटी क्रिकेट इतिहासातला एक हजारावा षटकार ठोकला होता. याचा अर्थ रोहीतला भारताचा एक हजारावा कसोटी षटकार ठोकण्याचा मान मिळाला होता.
                सन २०१७ मध्ये पुन्हा एकदा रोहीतचा एक हजार या जादूई अंकाशी सामना झाला. त्यावेळी क्रिकेटच्याा जन्मदात्या इंग्लंडच्या धरतीवर एक हजारावं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं गेलं. ते हजारावं शतक ठोकण्याचा अनोखा मान रोहीत शर्माला मिळाला. १५ जून २०१७ मध्ये बर्मिंगहॅम येथे चँपियन्स ट्रॉफी मध्ये बांगलादेशविरूध्द खेळताना त्याने नाबाद १२३ धावांची खेळी साकारली होती. विशेष म्हणजे त्या सामन्यात भारतानेे नऊ गडी राखून विजय मिळविला होता. तर तत्कालीन कर्णधार विराट कोहली ९६ धावांवर नाबाद राहीला होता.
               त्यानंतर तीन नोव्हेंबर २०१९ रोजी रोहीतचे नाव पुन्हा एकदा एक हजार या अनोख्या अंकाशी जोडले गेले. त्यावेळी भारत व बांगलादेश यांच्यात दिल्ली येथे टि ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातला एक हजारावा सामना खेळला गेला. विशेष योगायोगाची गोष्ट म्हणजे तत्कालीन कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहीत शर्माला त्या सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषविण्याचा ऐतिहासिक सन्मान मिळाला होता.
                 एका मागोमाग एक करून विराट कोहलीने भारताच्या टि- ट्वेंटी, वनडे व कसोटीचे कर्णधारपद सोडून दिल्याने सर्वात अनुभवी व पात्र असलेल्या रोहीत शर्माकडे तूर्त तरी सफेद चेंडूच्या खेळाचे कर्णधारपद आले असून काही दिवसात कसोटीचाही तो अधिकृत कर्णधार बनण्याची शक्यता आहे. गेली नऊ वर्ष भारताला आयसीसी स्पर्धा जिंकता न आल्यामुळे कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाला असून इतक्या मोठया कालखंडानंतर भारताला विश्वविजेता बनवण्याची कामगिरी रोहीतवर येऊन पडली आहे. रोहीतचा स्वभाव, खेळाडूंना हाताळण्याची पध्दत व जेथे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तेथे केलेली चमत्कारीक कामगिरी बघता तो भारतीय क्रिकेटला नक्कीच उंचावर नेईल असे आशादायक वातावरण असून त्याचे नशिब व असेच अनोखे योगायोग त्याला वारंवार साथ देऊन भारतीय क्रिकेट रसिकांना आनंद सागरात डुबवण्याचा योग रोहीतला मिळण्याची आशा आपण बाळगण्यात काहीच गैर वाटत नाही.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close