युएईत सन २०२१ च्या उत्तरार्धात झालेल्या टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल झाले असून अद्यापही काही बदल करण्याचा झपाटा सुरूच आहे. रवी शास्त्रीसह संपूर्ण प्रशिक्षक चमू हटविल्यानंतर राहुल द्रविडच्या दिमतीला नवा प्रशिक्षण संघ टिम इंडियाशी जोडण्यात आला. त्याच काळात तत्कालीन कर्णधार विराट कोहली टि- ट्वेंटी, वनडे व कसोटी या तीनही प्रारूपातून नेतृत्व मुक्त झाला. या दरम्यान बरच काही राजकारण झालं. रोहीत शर्माच्या रूपाने संघाला तीनही प्रारूपात नवा कर्णधार मिळाला. शास्त्री - कोहलीच्या कार्यकाळात असलेल्या संघात खूप बदल झाले आणि आता तर भारतीय संघाचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलला.
१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी बीसीसीआयकडून कसोटी नेतृत्वावरून पायउतार झालेल्या विराट कोहलीचा वारसदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील मुंबईच्या रोहीत शर्माचा कसोटी कर्णधार म्हणून राज्याभिषेक केला. यामुळे रोहित शर्मा भारतीय क्रिकेटच्या सर्वच प्रारुपातील संघांचा पूर्णकालीन कर्णधार बनला. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्ध आगामी होणाऱ्या टि- ट्वेंटी व कसोटी मालिकेसाठी संघात मोठे बदल करून भविष्यातील संघ बांधणीकडे पाऊल टाकल्याचे दिसत आहे.
निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी संघाची घोषणा करताना रोहीत शर्माला भारताचा पस्तीसावा कसोटी कर्णधार बनविताना भारतीय क्रिकेटची दिर्घकाळ सेवा करणारे चेतेश्वर पुजारा, ईशांत शर्मा, वृध्दीमान साहा व भारतीय क्रिकेट इतिहासातील अपराजित कर्णधार अजिंक्य राहाणेला संघाबाहेर घालविण्यात आले असून नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
कोरोना संक्रमण व खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या भारतीय संघाची जुळवा जुळव करण्यात निवड समितीलाही मोठे सायास पडत आहेत. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, के.एल राहुल अनफिट असल्याने संघाबाहेर गेले. तर रविचंद्रन आश्वीनची संघात निवड झाली असली तरी त्याचे प्रत्यक्ष सामन्यात खेळणेही त्याच्या तंदुरूस्तीवर अवलंबून असणार आहे.
विराट कोहली, रिषभ पंत यांना वेस्ट इंडिजविरूध्दच्या शेवटच्या टि - ट्वेंटी सामन्यापासूनच संघातून आराम दिला असून श्रीलंकेविरूद्धच्या टि- ट्वेंटी मालिकेतही ते खेळणार नाहीत. मात्र कसोटी साठी ते उपलब्ध असणार आहेत. तर शार्दूल ठाकूर श्रीलंकेविरूध्द कोणत्याही संघात खेळताना आपल्याला दिसणार नाही. विश्वस्त सुत्रांच्या माहितीनुसार शार्दूलचे लग्न असल्यामुळे तो संघाबाहेर असेल. या दरम्यान कसोटी संघात उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारची भारतीय संघात प्रथमच वर्णी लागली आहे.
दक्षिण आफ्रिकेत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणे अपेक्षित कामगिरी करू न शकल्याने त्यांना संघाबाहेर पाठविणार हे जवळ जवळ निश्चित होते. परंतु त्यांना बीसीसीआयकडून रणजी स्पर्धेत स्वतःला अजमविण्याची संधी देण्यात आली. अजिंक्य राहाणेने सौराष्ट्राविरुद्ध मुंबईकडून खेळताना संघाला संकटातून वाचविणारी शतकी खेळी केल्यामुळे तो संघात येईल असे वाटत होते परंतु निवड समितीने अखेर त्याला बाहेरचा रस्ता दाखविलाच. दुसरीकडे त्याच सामन्यात चेतेश्वर पुजारा मुंबई विरूद्ध शुन्यावर बाद झाला. त्यामुळे त्याचे भारतीय संघाचे दरवाजे बंद होणार यावर त्याने स्वतःच शिक्कामोर्तब केले.
रोहीत शर्मा सध्या चौतीस वर्षांचा असून त्याची फिटनेस त्याला दिर्घकाळ खेळू देईल असे वाटत नसल्याने. भविष्यातील कर्णधार म्हणून बीसीसीआयने केएल राहुल, रिषभ पंत व जसप्रित बुमराहा यांना रोहितच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्याचा निर्णय घेतला असून रोहीतच्या तंदुरूस्तीवरच त्याच्या नेतृत्वाचे भवितव्य अवलंबून असेल.
सध्याची भारतीय क्रिकेटमधील जडणघडणीची प्रक्रिया बघता भविष्यातही हे बदलाचे वारे आणखी काही दिवस तरी असेच सुरू राहाणार असे दिसत आहे. मात्र हे सर्व होत असताना या राजकारणापेक्षा भारतीय क्रिकेटचे भले करण्यात जास्त इंटरेस्ट दाखविला तर भारतीय क्रिकेट नक्कीच उंचावर जाईल. उगाच याची त्याची जिरविण्याचे राजकारण केले तर भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच मारक ठरेल. यासाठी बीसीसीआय खरोखर प्रामाणिक प्रयत्न करेल असा आशावाद आपण करण्यास काहीच हरकत नसावी.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

