कोविड-१९ च्या सावटात समस्त क्रिकेट जगताचे लक्ष लागलेली जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लिग अर्थात आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमियर लिगच्या पंधराव्या पर्वाची सुरुवात मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर झाली. स्पर्धेच्या प्रथेप्रमाणे गत स्पर्धेतील विजेते व उपविजेते यांच्या लढतीने या पर्वाचे उदघाटन झाले. गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज व उपविजेते कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेली ही लढत मागच्या सामन्याच्या अगदी उलट झाली. सीएसकेकडून या लढतीत गतविजेत्यांच्या लौकीकाला धक्का देणारा खेळ झाल्याने सामन्याचा निकाल त्यांच्या विरोधात जाणार हे उघडच होते व झालेही तसेच.
केकेआरला या स्पर्धेच्या निमित्ताने श्रेयस अय्यरच्या रूपात अनुभवी कर्णधार लाभला तर सीएकेला महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून रविंद्र जडेजा सारखा कोरा करकरीत कर्णधार मिळाला. मात्र नाणेफेकीपासून सामन्याच्या निकालापर्यंतच्या सर्वच बाबी जडेजाच्या विरोधात गेल्याने कर्णधारपद ही कठीण बाब असते हे जडेजाला नक्कीच समजले असेल. कर्णधार पदाशिवाय जडेजाची बॅटही विशेष तळपली नाही तर बॉलनेही त्याला खास चमत्कार करता आला नाही.
चौदाव्या पर्वाचा ऑरेंज कॅप विनर सीएसकेचा ऋतूराज गायकवाड यावेळी धावांचे खातेही उघडू शकला नाही. त्यामुळे या स्पर्धेत ऋतूराज समोरील आव्हान सोपे नसणार हे उघड झाले. काही किरकोळ अपवाद वगळता सीएसकेने मेगा ऑक्शनमध्ये पूर्वीचाच संघ मिळविला खरा परंतु तो जोश या लढतीत बिलकुल न दिसल्याने गतविजेत्यांचे आव्हान यंदा सोपे नसणार हे स्पष्ट झाले.
सामन्याच्या सुरूवातीपासूनच नियमीत अंतराने विकेट गेल्याने सीएसकेला धावगती वाढविण्यात अपयश आले. त्याची परिणीती म्हणजे धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या चेन्नईला धावांचे पहिले शतक गाठण्यास साडे अठरा षटके लागले. शेवटच्या नऊ चेंडूत एकतीस धावा निघाल्याने डावाच्या अखेरीस एकशे एकतीस अशी काहीशी समाधानकारक धावसंख्या सीएसकेच्या नावावर लागली होती. सीएसकेकडून बुजुर्ग खेळाडू एम एस धोनीने नाबाद अर्धशतक ठोकले, परंतु त्यात पूर्वीच्या धोनीच्या खेळाचा दरारा नव्हता.
केकेआरच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. त्यात उमेश यादव विशेष उठून दिसला. तसेच यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनने यष्टीमागे शानदार कामगिरी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने चमकदार नेतृत्वाने छाप सोडली.
केकेआरकडून विजयी लक्षाचा पाठलाग करताना भारताच्या सर्वच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संघातून कालबाह्य झालेल्या अजिंक्य राहाणेने चमकदार ४४ धावा बनवून विजयात मोलाचा वाटा उचलला. राहाणेची एक मोठी शोकांतिका आहे. एका सामन्यात तो चांगला खेळल्यानंतर पुढच्या सामन्यात तोच टेंपो त्याला राखता येत नाही. त्यामुळे त्याला भारताच्या संघाचे उपकर्णधारपद व नंतर खेळाडू म्हणून असलेले संघातील स्थानही गमवावे लागले होते. ती गत येथे होऊ नये अन्यथा एक क्रिकेटपटू म्हणून त्याच्या कारकिर्दीचा अंत या आयपीएल सत्रानंतर होऊ शकतो.
ड्वेन ब्राव्होने तीन बळी घेऊन सीएसकेकडून काहीसा प्रतिकार केला मात्र धावांचे पाठबळ कमी असल्याने त्याचे प्रयत्न तोकडे पडले व इतर गोलंदाजही निष्प्रभ ठरल्याने केकेआरने सहा गडी व नऊ चेंडू राखून आरामात विजय मिळविला व आपले विजयाचे खाते उघडले.
या पराभवाने सीएसकेला नव्याने आरंभ करावा लागणार आहेच, शिवाय नवा कर्णधार रविंद्र जडेजाला आपल्या वैयक्तिक खेळासह संघाची धुरा यशस्वीरित्या सांभाळायची आहेच. परंतु कर्णधार म्हणून धोनीने घालून दिलेला आदर्श व उभे केलेले उच्चांकही जपायचे आहे. आता जडेजा एवढे कठीण आव्हान कसे पेलतो हे बघणे मनोरंजक ठरणार आहे तर श्रेयस अय्यर त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा कशा पूर्ण करतो हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

