पूर्णा । वार्ताहर :-
जिल्ह्यातील परभणी - गंगाखेड ( एनएच, पीडब्ल्यूडी) व परभणी-जिंतूर ( एनएच, एमएसआरडीसी) येथील प्रगतीपथावरील कॉंक्रिटीकरणाच्या कामातील काही भागामध्ये तडे गेलेले आहेत. या भागातील दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरु आहे. सद्यस्थितीत परभणी- गंगाखेड कामाचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत सामाजिक अंकेक्षण (ऑडीट) करण्यात आले आहे. तथापि, अहवाल प्राप्त होणे बाकी असल्याने या अहवालानुसार पुढील कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सभागृहात दिली आहे. परभणी- गंगाखेड कामाच्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधींकडून निवेदन प्राप्त झाले होते.
परभणी - मानवतरोड - पाथरी ( एनएच, पीडब्ल्यूडी) रस्ता डांबरीकरणाचा असून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत आहे. परभणी - झिरो फाटा ( एनएच, पीडब्ल्यूडी) या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून डांबरीकरण झालेल्या ठिकाणी रस्ता सुस्थितीत आहे. तथापि, या कामाच्या संथगतीमुळे मंजूर निविदा रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान उर्वरित कामासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त होईपर्यंत या भागातील रस्ता सुस्थितीत ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक दुरुस्तीबाबतची प्रक्रिया निविदा स्तरावर आहे. प्रश्नांंकीत नमूद रस्त्यांपैकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील झिरो फाटा ते पूर्णा (जि.परभणी ) रस्त्यावरील झिरो फाटा ते लक्ष्मीनगर पाटी, माटेगाव पाटी व माटेगाव ते सुरवाडी फाटा हे रस्ते वाहतुकीयोग्य ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या देखभाल दुरुस्तीची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. उर्वरित सुरवाडी फाटा ते सुरवाडी तसेच पूर्णा, पांगरा, पिंपळा, लोखंडे मार्ग धार ( लोण बुद्रुक ) हे रस्ते ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत असून त्यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार पूर्णा- पांगरा इजिमा -०८ रस्त्यावर जिल्हा परिषदेव्दारे मुरुम टाकण्यात आला आहे. तसेच पांगरा , पिंपळा ( लोखंडे ) मार्ग धार ( लोण बुद्रुक ) हा रस्ता इजिमा ४२ व सुरवाडी फाटा ते सुरवाडी या दोन्ही रस्त्यांचे काम निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.
परभणी जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या दर्जाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. परभणी जिल्हयात होत असलेल्या परभणी - गंगाखेड , परभणी - मानवतरोड - पाथरी , परभणी- जिंतूर , परभणी -झिरोफटा या राष्ट्रीय महामार्गांचे काम दर्जाहीन होत असल्याने विहीत मुदतीपूर्वीच सदरील कामांना तडे जाणे, खडे पडणे व इतर प्रकार होत असल्याने वरील सर्व कामांची दर्जाची व देखरेख करणार्या अधिकार्यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्य सचिव मुंबई यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे २०२२ मध्ये केली आहे, हे खरे आहे काय? असल्यास, सर्व कामांची, दर्जाची मुख्य सचिव यांंच्या विशेष दक्षता पथकामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय? असल्यास, त्या सर्व चौकशीत काय निष्पन्न झाले? तसेच दर्जाहीन कामे करणारे कंत्राटदार व त्यावर नियंत्रण करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द कोणती कार्यवाही करण्यात आली आहे? नसल्यास, जिल्हयाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या कामाकडे होत असलेल्या दुर्लक्षाची कारणे काय आहेत? असे प्रश्न विचारण्यात आले होते.

