शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. गुरूवार दिनांक १७ मार्च २०२२
साईंच्या शिर्डीतही होळीचा उत्साह; पारंपरिक पद्धतीने होलिका दहन..!!
शिर्डी : श्री साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीत हुताशनी पौर्णीमेचे औचित्य साधून साईमंदीर परिसरातील गुरुस्थानसमोर साईसंस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते होळीची विधीवत पूजा करून भक्तीमय वातावरणात होलीकोत्सव साजरा करण्यात आला.
दरम्यान आज (गुरुवार दि.१७ मार्च) रोजी हुताशनी पौर्णिमा. 'हुताशन' म्हणजे हुत पदार्थांचे दिलेल्या आहुतींचे अशन, अर्थात भक्षण करतो तो अग्नी. विशेष रूपांत अग्नीचे पूजन करण्याची पर्वणी म्हणून ही हुताशनी पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. या पर्वावर साजरा होणारा उत्सव होलिका, होळी, शिमगा या नावांनीही ओळखला जातो. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव असे तीन वेगवेगळे दिनविशेष यात अंतर्भूत असतात.
होलीकोत्सव मोठ्या उत्साहात तसेच भक्तीमय वातावरणात शिर्डीतील साईमंदीरात श्री साईबाबा संस्थानच्या वतीने साजरा करण्यात आला. साईबाबा आपल्या हयातीत असतांना भक्तांसमवेत यामधील रंगोत्सव साजरा करत होते. असे वर्णन साईचरित्रात आहे. परंतु होलीकोत्सव म्हणजेच होळी हा सण बाबांच्या निर्वाणानंतर साईभक्तांनी सुरू केला असून ती परंपरा जपण्याचे काम साईसंस्थान आजतागायत करत आहे.
अतिशय आनंदात व थाटामाटात होळी उत्सव साईमंदीर तसेच गुरुस्थानसमोर साजरा केला. यावेळी साईसमाधी मंदिरात साईबाबांच्या मुर्तीला आणी समाधीवर साखरेपासून बनवलेले गुलाबी रंगाचे हार कडे घालण्यात आले होते. तर मध्यान्ह आरतीपुर्वी श्री गुरुस्थान मंदिरासमोर होळी पेटविण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते होळीची विधीवत मंत्रोच्चार करत पुजा करण्यात आली.
याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, प्रशासकीय अधिकारी दिलिप उगले, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते. यावेळी शिर्डी माझे पंढरपूर आरती करून पवित्र होळीला नैवेद्य दाखवण्यात आला.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

