त्यांनी लिहिलेल्या काही शेरांची यादी असून त्यात
*अ* पासून *ज्ञ* पर्यंत सगळी बाराखडी सामावलेली आहे.
*(अ)*
अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?
*(आ)*
आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली
*(इ)*
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
*(ई)*
'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?
*(उ)*
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली
*(ए)*
एक मी निःशब्द किंकाळीच होतो
ऐकण्यासाठी सुना बाजार होता
*(ऐ)*
ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले
*(ओ)*
ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो
*(क)*
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली
*(ख)*
खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?
*(ग)*
‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’
*(घ)*
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
*(च)*
चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!
*(छ)*
छाकटे दुर्वास का निवृत्त झाले?
शापितांनी काय छाकट्यांचे करावे?
*(ज)*
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही!
*(झ)*
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी
मातीत पावलांचे काही ठसेच होते!
*(ट)*
टाकली हातातली मी सर्व पाने
कोण जाणे,हारलो की जिंकलो मी
*(ठ)*
ठेवले मी तयार ओठांना
एकदा तू पुकार ओठांना
*(त)*
तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही
*(द)*
दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता
*(थ)*
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणाऱ्या कसलीच खंत नाही....
*(ध)*
धन्य ही श्रद्धांजली जी वाहिली मारेक~यांनी,
संत हो आता बळीचा न्यायनिर्वाळा कशाला ?
*(न)*
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा
*(प)*
पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!
*(फ)*
फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते
*(ब)*
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!
*(भ)*
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एव्हढे मी भोगिले की मज हसावे लागले
*(म)*
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !
*(य)*
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते...
*(र)*
रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे...
*(ल)*
लागले न झाडांना दोनचार शिंतोडे
नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा....
*(व)*
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?...
*(श)*
शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या
हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही....
*(स)*
सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा,
तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती....
*(ह)*
हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा....
*(ज्ञ)*
ज्ञानदेव लिहूनी गेले ओळ ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी....
🌹 कवी- सुरेश भट

