भारत आणि श्रीलंका यांच्या मोहालीत पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर आधारीत इंडिया टिव्ही न्यूज चॅनेलवर चर्चासत्र सुरू होते. मीही ऑन लाईन त्यात सहभागी होतो. नेमके त्याच वेळी मी विचारलेल्या प्रश्नावर इंडिया टिव्हीचे क्रिडा संपादक समिप राजगुरू उत्तर देते होते व संयोजक अंकनकर यांच्या मोबाईलवर एक वृत्त आलं. ते वाचून त्यांनाही विश्वास बसेना. त्यावेळी त्यांनी आपल्या जवळच्या सुत्रांशी खात्री करून घेतलीच शिवाय थेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर बघून पूर्ण खात्री झाल्यानंतरच त्यांनी महान लेगस्पिनर गुगलीचा बादशहा शेन वॉर्न कालवश झाल्याची बातमी दबक्या आवाजात दिली. हि धक्कादायक बातमी सांगताना त्यांच्या तोंडून व्यवस्थित शब्दही फुटत नव्हते. त्यावेळी इतका जोराचा आघात त्यावेळी सर्वांनाच बसला. कारण बावन्न वर्षीय शेन वॉर्नचं अचानक जाणं तितकच दुःखद व थक्क करून सोडणारं होतं.
श्रीलंकेविरुध्द भारतीय संघाने दिवसअखेर सहा गड्यांच्या मोबदल्यात ३५७ अशा फलकावर दिसायला चांगल्या धावा नोंदविल्या असल्या तरी त्या दरम्यान भारताच्या प्रत्येक फलंदाजाने सुरेख सुरूवातीनंतर अवसानघातकी फटके मारून आपले बळी गमावले व संघाला प्रत्येक वेळी डाव सावरतोय असे वाटत असताना संकटात टाकले. मात्र प्रत्येक वेळी छोटया भागिदाऱ्या झाल्याने भारत दिवसअखेर सदृढ परिस्थितीत दिसत होते. कसोटीचं शतक साजरं करणारा विराट कोहली धावाचं शतक साजरं करण्यात मात्र अपयशी ठरला. हनुमान विहारीही बरा खेळला. तर रिषभ पंत या वेळी जोरदार खेळला मात्र शतकाने त्याला हुलकावणी दिली व त्याच्यासह तमाम क्रिकेटरसिक निराश झाले. दिवसाच्या शेवटी जडेजा व आश्वीन नाबाद होते. श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली, मात्र तेही आपले पुर्ण वर्चस्व राखण्यात कमी पडल्याने दिवसअखेर भारताचे पारडे जड बनले.
भारताच्या या संमिश्र पण समाधानकारक कामगिरीवर जवळ जवळ सर्वच क्रिकेटरसिक व तज्ञ खूष असताना ऐन याच क्षणी शेन वॉर्नच्या निधनाचे वृत्त धडकडे आणि साऱ्या क्रिकेट जगताच्या काळजाचे ठोकेच चुकले. जगभरातील मान्यवर क्रिकेटपटूंकडून वॉर्नच्या आकस्मिक निधनामुळे शोक व्यक्त करू आपल्या भावना व त्याच्यासह अनुभवलेले किस्से सुनावत होते.
नेमके त्याच वेळी माझं मनही तीस वर्ष मागे गेलं आणि १९९२ च्या ज्या सिडनी कसोटीत एका सदृढ बांध्याच्या तेवीस वर्षीय खेळाडूने केलेल्या पदापपर्दापणासून शेवटच्या घटके पर्यंतचा त्याचा जीवन प्रवास माझ्याही डोळ्यासमोर जीवंत झाला. त्या सामन्यात भारताच्या रवी शास्त्रीने २०६ धावा फटकविल्या होत्या. त्यातील दिडशे धावा तर एकटया शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर निघाल्या होत्या. त्यावेळी तो एक फालतू गोलंदाज वाटला होता. मात्र त्यानंतर शेन वॉर्नने माझ्यासह जगातल्या तमाम क्रिकेट रसिकांच्या त्या मताला खोटे ठरवून जगातील सर्वोत्तम मनगटी स्पिनर बनवून दाखविले. इतकेच नाही तर एक हजार पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय बळी मिळवून स्वतःची वेगळीच छाप सोडली.
क्रिकेटची भयंकर जाण असलेल्या शेन वॉर्न जवळ एका निष्णात फिरकी गोलंदाजाजवळ असणारे प्रत्येक अस्त्र होते. गुगली, फ्लिपर, फ्लोटर हे त्यातील प्रमुख अस्त्र जगभरातील नामवंत फलंदाजांना सळो की पळो करून सोडायचे. एशेस मालिकेत इंग्लंडच्या माईक गँटींगला टाकलेला एक चेंडू गॅटींगलाच नव्हे तर मैदानात उभ्या असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना देखील अंचबीत करून बेल्स उडवून गेला. त्याच चेंडूला एकविसाव्या शतकातील सर्वोत्तम चेंडूचा मान मिळाला.
शेन वॉर्न इतका बुद्धीमान खेळाडू होता की त्याच्या आकस्मिक चाली त्याचे तत्कालीन कर्णधार स्टिव्ह वॉ व रिकी पाँटींगला जगातील सर्वोत्तम कर्णधार बनवून गेल्या. शेन वॉर्नच्या अफाट कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाने जवळजवळ वीस वर्ष क्रिकेटवर अधिराज्य केले व तीन वर्ल्ड जिंकण्यात साह्य मिळाले. शेन वॉर्नची फलंदाजीही अफलातून होती. परंतु इतके सगळे गुण असताना देखील ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाचे पुर्ण काल नेतृत्व करण्यास मिळाले नाही ही शेनची खंत शेवटपर्यंत कायम राहीली.
आयपीएलच्या विजेतेपदाचा पहिला करंडक उंचावणारा कर्णधार शेन वॉर्नच होता. त्याच्याच नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने आपला एकमेव करंडक जिंकला आहे. वॉर्नचे भारताविषयी अतिशय चांगले मत होते. भारतीय खेळाडूंनाही तो वेळोवेळी मदत करायचा. परंतु म्हणतात ना नियती कोणालाच परिपूर्ण बनू देत नाही. अगदीच तशीच अवस्था शेन वॉर्नची होती.
मैदानावर त्याची कारकिर्द जितकी भूषणावह होती तितकीच नामुष्कीकीजन्य मैदानाबाहेर होती. तो दारूच्या मोठया प्रमाणात आहारी गेला होता, तर बाहेरख्यालीपणामुळे त्याला अनेक वाद विवाद, कोर्टकचेऱ्या व संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे बस्तान बसलेले हसते खेळते कौटुंबीक जीवन उधवस्त झाले.
शेन वॉर्नचे अनेक किस्से व आठवणी माझ्या हृदयाच्या कप्प्यात घर करून बसल्या आहेत. त्याचे सर्व वर्णन येथे शक्य नसल्याने या महान खेळाडूस दुःखद अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हा छोटाशा लेखास पुर्णविराम देतो.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

