कसोटी कर्णधार पदावरून पायउतार झाल्यानंतर येत्या चार मार्चपासून मोहाली कसोटीत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात एका सामान्य खेळाडू म्हणून कोहली खेळण्यासाठी उतरणार आहे. त्यावेळी मागील सात वर्षानंतर निव्वळ खेळाडू म्हणून सदर कसोटीत तो भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल आणि त्याबरोबरच त्याला अनेक विक्रम करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.
श्रीलंकेविरुद्ध झालेली तीन टि- ट्वेंटी सामन्यांची मालिका एकतर्फी खिशात घालणारा भारतीय संघ आता शुकवारपासून श्रीलंकेविरूध्द दोन कसोटींची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला असून गेली कित्येक दिवस खराब फॉर्म, वादविवाद व शतकांसाठी त्रस्त असलेला माजी कर्णधार विराट कोहली या सामन्याच्या रूपात आपला शंभरावा कसोटी खेळणार असून महेंद्रसिंग धोनी नंतर केवळ दुसऱ्याच ( रोहीत शर्मा ) कर्णधाराच्या नेतृत्वात तो कसोटी खेळताना दिसेल. श्रीलंके विरूद्ध टि- ट्वेंटी मालिकेत न खेळल्याने आधीच रुसलेल्या धावा त्याच्या बॅटच्या कक्षेत येतात का नाही ते पहाणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.
कसोटी क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात केवळ सत्तर खेळाडूंना शंभर किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी खेळण्याचा सन्मान प्राप्त झाला असून भारताचा विक्रमादित्य सचिन तेंडूलकर दोनशे कसोटी खेळून या अनोख्या क्लबमध्ये अग्रस्थानी आहे. सचिनसह खालील अकरा खेळाडूंनी भारताकडून कसोटींचे शतक पूर्ण केले असून कोहली अशी करामत करणारा बारावा भारतीय बनणार आहे.
राहुल द्रविड़ ( १६३), वीवीएस लक्ष्मण ( १३४), अनिल कुंबले ( १३२), कपिल देव ( १३१), सुनील गावस्कर ( १२५), दिलीप वेंगसरकर ( ११६), सौरव गांगुली ( ११३), इशांत शर्मा ( १०५), हरभजन सिंह ( १०३) और वीरेंद्र सहवाग ( १०३) हे ते शंभरावर कसोटी खेळाडू असून कोहली त्यांच्या पंक्तीत बसणार आहे. जागतिक क्रिकेटचा विचार केला तर जिमी अंडरसन १६९ अँडरसन, व रिकी पाँटींग १६८ कसोटी खेळून अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. ईशांत शर्मा, स्टुअर्ट ब्रॉड, व लाथन लायन हे खेळाडू सध्या शंभरावर कसोटी खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. या विशिष्ट क्लबमध्ये कोहली या कसोटीसाठी मैदानात पाऊल ठेवताच सामील होणार आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात स्वतःच्या शंभराव्या कसोटीत शतक करण्यात जगातील केवळ नऊ फलंदाजांना यश आले असून कोहली अशी कामगिरी करणारा दहावा खेळाडू बनावा यासाठी तमाम भारतीय क्रिकेट रसिक देवाकडे प्रार्थना करत आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलिया व विंडीज यांच्या प्रत्येकी एक, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेच्या दोन -दोन तर न इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी हा करिश्मा केला आहे. त्यापैकी केवळ ज्यो रुट हाच काय तो सध्या सक्रिय क्रिकेट खेळत आहे.
कोहली खराब फॉर्म मध्ये असला तरी श्रीलंकेविरूध्द त्याची पूर्वीची कामगिरी उत्साहवर्धक असल्याने तो या सामन्यात सकारात्मक मानसिकतेने उतरल्यास आश्चर्य मानू नये. कोहली श्रीलंकेविरूध्द नऊ कसोटी खेळला असून त्यातील पंधरा डावात ७७.२३ च्या सरासरीने १००४ धावा त्याच्या नावे आहेत, त्यामध्ये पाच शतकं व दोन अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय भारतात त्याची श्रीलंके विरुद्धची कामगिरी अतिशय बोलकी आहे. तीन कसोटींच्या पाच डावात १५२ च्या सरासरीने ६१० धावा त्याने ठोकल्या आहेत.
विराटने आतापर्यंत ९९ कसोटयात ७९६२ धावा ५०.३९ च्या सरासरीने ठोकल्या असून २७ शतके त्याच्या खात्यात जमा आहेत. त्यामध्ये द्विशतकेही केली असून दोन श्रीलंकेविरूध्द ठोकली आहे.
प्रत्यक्ष मैदानात कोहलीला खेळायचे असून त्याची मानसिकता कशी असेल यावरच त्याची कामगिरी अवलंबून असणार असून बीसीसीआयने त्याच्या शतकी कसोटीसाठी प्रेक्षकांसाठी स्टेडियमची दरवाजे उघडी केली असल्याने प्रेक्षकांनाही कोहलीची विक्रमी कामगिरी बघण्याची संधी मिळणार असल्याने आता कोहलीवरच सर्वांच्या अपेक्षा पुर्ण करण्याची जबाबदारी आहे. बेस्ट ऑफ लक कोहली !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

