shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केकेआरच्या बेजबाबदार फलंदाजीमुळे आरसीबीच्या खात्यात विजय जमा...!



            ज्या डि वाय पाटील स्टेडियमवर दोन दिवसांपूर्वी पंजाब व आरसीबी यांच्यातील सामन्यात धावांचा महापूर आला होता, त्याच मैदानावर केकेआर व आरसीबी यांच्यातील सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांना एकेका धावेसाठी त्रस्त व्हावे लागले. बुधवारी झालेल्या सामन्यात या स्पर्धेतील अलिखित नियमाप्रमाणे जिंकणाऱ्या संघाने प्रतिपक्षाला प्रथम फलंदाजीस पाचारण करायचे दव असलेल्या मैदानाचा लाभ उठवित मिळालेले विजयी लक्ष आरामात साध्य करायचे. त्याप्रमाणे या सामन्यातही तसेच झाले. मंगळवारी पुण्यात राजस्थान व हैद्राबाद सामन्यात हा तोटका तुटला होता. मात्र मुंबईत हि परंपरा कायम राहीली.

              उदघाटनच्या सामन्यात गतविजेत्या चेन्नईला लिलया लोळविल्या नंतर केकेआरच्या संघाचा आत्मविश्वास वाढणे साहजिकच होते. मात्र येथे उलटेच झाले. आत्मविश्वास वाढल्याने खेळ उंच उंचावण्याऐवजी केकेआरची फलंदाजी नुसती ढेपाळलीच नाही तर अगदी रसातळालाच गेली. जणू अतिआत्मविश्वासाने गर्वाचा घडाच फुटला !
               हिंदी चित्रपटातील " तू चल मै आया " या गाण्याप्रमाणे केकेआरच्या फलंदाजांत डगआऊटमध्ये परतण्याची जणू चढाओढच लागली होती. सलामीवीर अजिंक्य राहाणे ९, व्यंकटेश अय्यर १०, कर्णधार श्रेयस अय्यर १३, नितीश राणा १०, सुनिल नारायण १२, शेल्डन जॅक्सन शुन्य, टम साऊदी शुन्य हे तर एकापाठोपाठ बाद झाले. सलग चार षटकात चार बळी महत्वाचे गडी बाद झाल्याने केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. सॅम बिलिंंग्ज १४, रसेल २५, उमेश यादव १८ यांनी थोडीफार धुगधुगी दाखविल्याने कशाबशा १२८ धावा फलकावर लागल्या. पूर्ण वीस षटके देखील केकेआरच्या एकाचढ एक फलंदाजांना खेळता आले नाही.
              आरसीबीकडून वानेेंदू हसरंगाने चार, तर हर्षल पटेलला दोन व मोहम्मद सिराजला एक बळी मिळाला. वानेंदू हसरंगाने नारायण व जॅक्सन यांना सलग दोन चेंडूवर बाद करून हॅट्रीकची संधी निर्माण केली होती. परंतु दुर्देवाने त्याला ती साधता आली नाही.
              सन २०१७ मध्ये या दोन संघात असाच एक सामना कोलकात्यात झाला होता. तेंव्हा केकेेआर प्रथम खेळताना १३१ धावांत बाद झाले होते. त्या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी आरसीबीला केवळ ४९ धावांत गुंडाळून ८२ धावांचा मोठा विजय मिळविला होता. या सामन्यात तसाच चमत्कार आरसीबीकडून होतो का ? अशी उत्सुकता लागली होती.
             विजयासाठी असलेल्या १२९ धावांचा पाठलाग करताना बंगलोरची ३ बाद १७ अशी अवस्था झाली असता परत एकदा केकेआर चमत्कार करतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु डेव्हीड विली व शेफरन रूदरफोर्ड यांनी ४५ व रूदरफोर्ड -शाहबाज अहमद यांनी ३९ धावांच्या दोन बहुमुल्य भागीदाऱ्या करून आरसीबीला विजयाच्याया उंबरठयावर आणून ठेवले. परंतु अठराव्या षटकात टिम साऊदीने रूदरफोर्ड व हसरंगाला बाद करून केकेआरच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या. मात्र त्यानंतर दिनेश कार्तिकने एक षटकार व चौकार ठोकून आरसीबीला विजयी केले. आपणास ठाऊक असेलच एक वर्षापूर्वी हाच दिनेश कार्तिक केकेेआरचा कर्णधार होता.
               पहिल्या फेरीचे सामने संपून दुसरी फेरी या सामन्याने सुरू झाली. काही संघात अजून बरेचसे खेळाडू येणे बाकी आहेत. काही संघातील महत्वाचे खेळाडू जखमी असून ते तंदुरूस्त होण्याच्या प्रतिक्षेत आहे.  स्पर्धा आता रंगात यायला सुरू झाली असली तरी मुंबईत पहिली फलंदाजी करणारे संघ पराभूत होत आहेत हे काहीसे स्पर्धेला गालबोट लावणारे असल्याने आयपीएलच्या रंगात भंग पडत असल्याचे विदारक दृश्य दिसत आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close