shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डे नाईट कसोटीत फलंदाजांच्या कौशल्याची सत्वपरीक्षा सुरू !

             भारत व श्रीलंका यांच्यात बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडीयमवर चालू मालिकेतील दुसरा व अंतिम कसोटी सामना दिवस रात्र पद्धतीने सुरू झाला. मोहालीच्या पहिल्या कसोटीत एकतर्फी विजय मिळवून टिम इंडिया या सामन्यासाठी उंच मनोधैर्याने मैदानात उतरली. जयंत यादव ऐवजी अक्षर पटेलला संधी देऊन भारताने आपले स्पिन आक्रमक मजबूत केले. वास्तविक बघता डे नाईट कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजांना सहाय्य मिळत असते. परंतु भारताने या प्रकारासाठीही मायदेशात खेळताना लाल चेंडूच्या कसोटीत वापरतात तोच फॉर्म्यूला वापरून पुन्हा एकदा सर्वांना चकीत केले.

            मनात योजल्याप्रमाणे नाणेफेकीचा कौलही भारताच्या बाजूने लागताना कर्णधार रोहीत शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्वतःचाच निर्णय रोहीत शर्मा व त्याचा सलामीचा जोडीदार मयंक अग्रवालने चुकीचा ठरविला. मयंकने तर बाद होण्याचा जणू चंगच बांधला होता. विनाकारण धाव घेण्याचा प्रयत्न फसला व नाटयमयरित्या नोबॉलवर धावचित झाला. रोहीत शर्मा व विराट कोहली हे दोघे तर शापीत असल्यासारखेच बाद झाले. रोहीतवर कर्णधारपदाचे टेन्शन वाढले असल्याचे मागील काही डावातील त्याच्या अपयशावरून जाणवते तर विराट कोहली चांगला स्टार्ट मिळाल्या नंतर अचानक स्विच ऑफ होतो. मागील ७१ डावात त्याच्या बॅटमधून तिहेरी धावसंख्या न निघाल्याचे भूत त्याच्या मानगुटीवर बसल्याचे जाणवत आहे.

             जम बसलेल्या हनुमान विहारीची गगनभरारी फार काही झालीच नाही. तर रिषभ पंत आल्यापासून सहाव्या गियरमध्येच खेळला. त्याने झटपट ३९ धावा केल्या परंतु त्या संघाच्या सदृढतेसाठी पुरेशा नव्हत्या. मात्र सहाव्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरने टि-२० ला साजेशी जोरदार खेळी केली मात्र ९८ चेंडूत ९२ धावा फटकावून यष्टीचित होऊन परतला. त्याचे शतक हुकले परंतु भारताला अनपेक्षीत रित्या अडीज शतकी मजल मारून देण्यात श्रेयसची खेळीच मोलाची ठरली. यावेळी मात्र भारताचे शेपूट बिलकुलच न वळवळल्याने अवघ्या दोन सत्रातच भारताचा डावा आटोपला. 

              श्रीलंकेकडून आपली अंतिम कसोटी खेळणाऱ्या जलदगती गोलदांज सुरंगा लकलमसह फिरकीपटू जयविक्रमा, एम्बुलडेनिया, धनंजय डिसिल्व्हा यांनी अचूक गोलंदाजी करून भारतीय फलंदाजाचे वारू उधळू दिले नाही. आपल्या लक्षात असेलच भारताच्या याच फलंदाजांनी मोहालीत ५७४ धावा एकदाच काढून एक डाव २२२ धावांनी विजय मिळविला होता.

                श्रीलंकेच्या तुलनेत भारतीय संघ सर्वच बाबतीत वरचढ आहे हे श्रीलंकेची फलंदाजी सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा जाणवले. जसप्रितु बुमराह व मोहम्मद शमीने आपल्या धारदार वेगवान माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांचे कंबरडेच मोडून काढत दिवसअखेर अवघ्या ८६ धावात त्यांचे सहा मुख्य फलंदाज तंबूत धाडले. शिवाय डिआरएस घेण्यात रिषभ पंत कडून कर्णधार रोहीतला चुकीचा सल्ला मिळाला अन्यथा त्यांचा सातवा फलंदाजही तेंव्हाच बाद झाला असता. अक्षर पटेलने या दरम्यान एक बळी मिळवून आपलीही उपस्थिती दाखवून दिली.

                 या सामन्यासाठीच्या खेळपट्टीत फिरकी गोलंदाजांना मोठे सहाय्य आहे. परंतु वेगवान गोलंदाजही तिचा लाभ उठवत असल्याने फलंदाजांची सत्वपरीक्षा सुरू आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून सोळा गडी बाद झाले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचे शेपूट फार काही करामत करेल असे वाटत नाही. भारताला पहिल्या डावात मोठे अधिक्य मिळण्याचीच शक्यता वाटते.  त्यानंतर भारताचे फलंदाज दुसऱ्या डावात किती धावा बनवितात हे औत्सुक्याचे ठरेल. मात्र भारताने कितीही धावा केल्या तरी सामन्याचा निकाल भारताच्याच बाजूने लागेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

                  खेळपट्टीचा एकंदर रागरंग बघता सामन्या तिसऱ्या दिवशीच निकाली निघू शकतो. पण जास्तच काही गडबड झाली तर दुसऱ्या दिवसअखेर निकाल हाती आल्यास अतिशयोक्ती मानू नये.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com.
close