शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शुक्रवार दिनांक १५ एप्रिल २०२२
सरपंच परिषदेच्या पदाधिकार्यांनी केली नगरमध्ये मागणी..!!
सरपंच, सदस्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार द्या..!!
अहमदनगर : सरपंच परिषदेने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निवडणुकीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची मागणी केली. नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व अॅड. विकास जाधव बोलत होते.
अॅड.जाधव म्हणाले, पक्ष बंदीच्या कायद्याप्रमाणेच पॅनल बंदीचा कायदा करावा, अशी मागणी परिषदेने राज्य सरकारकडे केलेली आहे. पक्षाच्या गटनोंदणी प्रमाणे पॅनल तहसील कार्यालयात नोंदविला जावा. त्यामुळे पॅनल फोडाफोडीचे राजकारण व त्यावरून वाद होणार नाहीत. पॅनल बंदी कायद्या संदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बरोबर कोल्हापुरात बैठक झाली आहे. लवकरच हा कायदा येईल. तसेच विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून गेलेले 21 आमदार असतात. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींनाच मतदानाचा अधिकार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायतीही येतात. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक प्रक्रियाच चुकीची आहे. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा. निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने 28 हजार ग्रामपंचायतींना विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपासून दूर ठेवले आहे. नगर व सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची नावे न आल्यास न्यायालयीन लढा लढण्यात येईल असा इशारा, अॅड. जाधव यांनी दिला.
यावेळी दत्ता काकडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिवांप्रमाणे, मंत्र्यांना त्यांच्या विभागाच्या सचिवांच्या पगारा एवढे मानधन मिळते. त्याच न्यायाने ग्रामसेवकांच्या पगारा एवढे मानधन सरपंचांना देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे महिला विभाग समन्वयक अंजना येवले आदी उपस्थित होते.
सरपंच परिषद, मंबईतर्फे राज्यातील चार लोकप्रतिनिधी व तीन प्रशासकीय अधिकार्यांना 22 एप्रिलला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रदेशाध्यक्ष काकडे व अॅड. जाधव यांनी दिली.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

