श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले पण कुणापुढे हात पसरले नाहीत,अशा वाटेवर त्यांनी गेल्या ३०-३५ वर्षांपासून जिल्ह्यात साहित्य चळवळ शांत पण मनापासून सुरु ठेवली, हा मार्ग त्यांनी पुस्तक वाचनातून शोधला.आजच्या पिढीने वाचनाचा प्रकाशदिवा हाती,माथी ठेवला तरच अज्ञानाचा, दारिद्र्याचा अंधार दूर होईल असे मत महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर इंदिरानगर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान कार्यालयात प्रतिष्ठानचा १६ वा वर्धापनदिन आयोजित करण्यात आला होता,त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश कुलथे बोलत होते. अध्यक्षस्थानी ऍड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते.यावेळी प्रा.शिवाजीराव बारगळ, डॉ.बाबुराव उपाध्ये,मंदाकिनी उपाध्ये, ताराताई सैंदोरे,गणेशानंद उपाध्ये, सौ.आरती उपाध्ये,सोनिया सैंदोरे, व्यंकटेश जोर्वेकर, निर्मिक उपाध्ये आदी उपस्थित होते.डॉ.बाबुराव उपाध्ये यांना अहमदनगर येथील स्व. माधवराव मुळे प्रतिष्ठानचा शिक्षणमहर्षी माधवराव मुळे साहित्य गौरव पुरस्कार मिळाला, त्याबद्दल प्राचार्य शेळके यांनी प्रथम सौ. मंदाकिनी उपाध्ये यांचा सत्कार केला. तर डॉ. उपाध्ये यांचा सत्कार प्राचार्य शेळके, पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी बुक, बुके,मानपत्र देऊन सन्मान केला.
यावेळी प्रकाश कुलथे यांनी मराठी भाषा,साहित्य, संस्कृती, माणूस आणि वाचन चळवळ यांचा प्रभाव सांगून डॉ. उपाध्ये यांनी आपल्या स्वखर्चातून आणि सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात वाचन चळवळ रुजविली.त्यांच्या सहकार्यातूनच आम्ही मित्रपरिवार अशा चळवळीत गतिशील आहोत.जागतिक पुस्तक दिनी दरवर्षी वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम आयोजित केले जातात ही गौरवास्पद वाटचाल असल्याचे सांगितले,प्रा.शिवाजीराव बारगळ, ताराताई सैंदोरे,व्यंकटेश जोर्वेकर, गणेशानंद उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य शेळके यांनी जागतिक पुस्तक दिन म्हणजे वाचनाचा प्रेरणादायी दिवस आहे, डॉ. बाबुराव उपाध्ये हे पोरके होते पण पोरकेपणाचे भांडवल त्यांनी कधी केले नाही, त्यांना अत्यन्त प्रतिष्ठेचा असा शिक्षणमहर्षी माधवराव मुळे साहित्य गौरव पुरस्कार मिळाला.डॉ. उपाध्ये यांनी लिहिलेल्या 'फिरत्या चाकावरती 'या आत्मकथनास हा पुरस्कार मिळाल. हे वेगळेपण लक्षात घेतले पाहिजे,
अज्ञानी माणसांना त्यांची लेखन तपशर्या दिसणार नाही पण हे कार्य अनेक पिढयांना दिशादर्शक आहे,ह्या तपस्वी वाटेवर त्यांना सौ. मंदाकिनी उपाध्ये यांची निर्मळ,निरपेक्ष साथ मिळाली हे महत्वाचे आहे.डॉ. उपाध्ये यांनी सांगितले की, जागतिक पुस्तकदिन स्पेनमध्ये २३ एप्रिल १९२३ रोजी पुस्तक विक्रेत्यांनी सुरु केला . २३ एप्रिल १९९५ रोजी युनोस्कोने जगभर तो सुरु केला अशा प्रकारचा इतिहास आणि पुस्तक महत्व सांगितले आणि सूत्रसंचालन केले तर सौ. आरती उपाध्ये यांनी आभार मानले.

