चुकांच्या जंजाळात चेन्नई होरपळली !
पंधराव्या आयपीएल सत्राच्या सहाव्या दिवशी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर लखनौ सुपर जायटंस व चेन्नई सुपर किंग्ज या पहिल्या फेरीतील दोन पराभूत संघात लढत झाली. केएल राहुल लखनौचे प्रथमच नेतृत्व करत असला तरी मगील दोन वर्ष त्याने पंजाबचे अपयशी नेतृत्व केले आहे. यापूर्वी राहुलने नेतृत्व केलेल्या अनेक सामन्यात त्याचा संघ बऱ्याचदा विजयाच्या जवळ जावूनही पराभूत व्हायचा म्हणून त्याला अनलकी कर्णधार म्हणून ओळख मिळू लागली असताना या सामन्यात मात्र पराभवाच्या उंबरठयावर उभा असलेला त्याचा संघ जिंकल्याने त्याच्यावर चिकटू पाहू लागलेले निगेटीव्ह बिरूद काहीसे दूर झाले आहे.
आयपीएलचे चालू सत्र सुरू झाल्यापासून मुंबईत झालेले सर्व सामने नाणेफेक जिंकणारा व दुसरी फलंदाजी करणारा संघ जिंकले असल्याने या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेवटी झाले ही तसेच ! पण यावेळी नाणेफेक, दव यांच्यापेक्षा दुसरी गोलंदाजी करणाऱ्या सीएसकेच्याच सांघिक चुका जास्त असल्याने त्यांच्या हातातोंडातील विजय निसटला.
महेंद्रसिंग धोनीने स्वतःच्या यशस्वी कारकिर्दीनंतर कर्णधार पदावरून पायउतार होत अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली. परंतु पहिल्या दोन्ही सामन्यात मिळालेली हार त्याच्यासाठी काटेरी हार ठरला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला आपले सुरूवातीचे दोन्ही सामने गमावण्याची नामुष्की पत्करावी लागली. केकेआर विरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांचे ना गोलंदाज चालले होते ना फलंदाज. मात्र या सामन्यात फलंदाजांनी भली मोठी धावसंख्या रचून विजयाचा पायाही रचला होता. परंतु गोलंदाज चालले नाही. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित राहातात, रविंद्र जडेजा नेतृत्वात कमी पडतो की यापूर्वी मजबूत असलेली गोलंदाजी यंदा कमजोर सिध्द होत आहे ?
आता मात्र आपण चेन्नईकडून या सामन्यात झालेल्या चुकांवर नजर टाकूया. गोलंदाजी करतेवेळी लखनौच्या डावात सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर मोईन अलीने क्विंटन डिकॉकचा झेल सोडला. त्यावेळी क्विंटन तीस धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने ६१ धावा बनवून संघाचा मजबूत पाया रचला. त्यानंतर आठव्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर तुषार देशपांडेने केएल राहुलचा झेल सोडला. त्यावेळी राहुल छत्तीस धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने स्वतःच्या चारच धावा वाढविल्या, परंतु संघाची धावसंख्या ८० वरून ९९ पर्यंत नेत १९ धावा लखनौच्या खात्यात वाढविल्या होत्या.
चौदाव्या षटकात एर्विन लुईसचा झेल तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर अंबाती रायडूने सोडला. तो मात्र सीएसकेच्या मुळावरच उठला. त्यावेळी दहा धावांवर खेळणारा लुईस नंतर २३ चेंडूत नाबाद ५५ धावा ठोकत लखनौला विजयी करूनच परतला नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक स्वतःच्या नावे केले.
अठराव्या षटकापर्यंत सीएसकेचे सामन्यावर चांगल्यापैकी नियंत्रण होते. परंतु कर्णधार जडेजा व वरिष्ठ खेळाडू धोनी यांच्याकडून अंतिम टप्यात गोलंदाजीचे योग्य नियोजन न झाल्याने महत्वाचे एकोणिसावे व विसावे षटक टाकण्यास त्यांच्याकडे अनुभवी गोलंदाजच नसल्याने १९ वे षटक नवख्या शिवम दुबेला टाकावे लागले व त्याला तो दबाव पेललाच नाही. शेवटच्या दोन षटकात चौतीस धावांची गरज असताना दुबेच्या त्या षटकात लुईस - बदोनी जोडीने तब्बल पंचवीस धावा ठोकून सामना आपल्याकडे वळविला. येथे दुबे पेक्षा त्याला गोलंदाजी देणारे जडेजा -धोनी हेच मुख्य दोषी आहेत.
मागच्या सत्रात चेन्नईच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरताना सर्वाधिक धावांसाठी असलेली मानाची ऑरेंज कॅप पटकविणारा ऋतूराज गायकवाड दोन सामन्यात फक्त एक धाव काढू शकल्याने सीएसकेला मोठा फटका बसला. शिवाय पहिल्यांदाच कर्णधारपद स्विकारलेल्या रविंद्र जडेजाचा गोलंदाजीत बदल करताना झालेला गोंधळ सीएसकेच्या पराभवाच्या प्रमुख कारणांपैकी असले तरी यंदा मेगा ऑक्शनमध्ये हेजलवूड, शार्दूल ठाकूर, लुंगी एंगिडी सारखे अनुभवी गोलंदाज न मिळणे व चौदा कोटी रुपये खर्च करून घेतलेला दिपक चाहर अनफिट असल्याने उपलब्ध नसल्यामुळे चेन्नईची मोठी कुचंबणा झाली आहे हे मात्र तितकेच सत्य आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

