गुरूवार दिनांक २६ मे २०२२
कृषि विषयक धोरणे ठरविताना शेतकरी केंद्रस्थानी असावा- कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील..!!
राहुरी विद्यापीठ, : महाराष्ट्राचे 16 ते 17 टक्के क्षेत्र सिंचनाखाली असूनही अन्नधान्य तसेच फळांच्या उत्पादनात राज्य देशात अग्रेसर आहे. कृषि विद्यापीठांच्या संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना झाला असून त्यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच राज्यालाही फायदा झाला आहे. आपला देश व राज्य विविध जैवविविधतेने संपन्न आहे. पण या जैवविविधतेकडे आपले म्हणावे तसे लक्ष नाही. या बदलत्या हवामानात व वाढणार्याव तापमानात तग धरून राहणारी देशी पशू आपल्याकडे आहेत.
यामध्ये राजस्थानातील वातावरणाशी जुळवून घेणारी काटक अशी थारपारकर ही गाय जास्त दूध देण्याच्या आपल्या क्षमतेमुळे लक्षणीय ठरत आहे. त्याचबरोबर केरळमधील कमी उंचीची वेचूर ही गाय इ. अशाप्रकारे विशेष लक्षणे असणाऱ्या गाईमुळे त्या त्या भागातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणात निश्चितपणे वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाचे विपणन ही मोठी समस्या आहे. शेती उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड दिल्यास नक्कीच उत्पन्नात वाढ होऊ शकते त्यासाठी कृषि विषयक धोरण ठरविताना शेतकरी केंद्रस्थानी असावा असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
पुणे येथील यशदा संस्थेच्या वतीने प्रोबेशनरी आयएएस अधिकाऱ्यांच्या तुकडीचे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे तीन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गासाठी आगमन झाले होते. या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते.
या अधिकाऱ्यांनी या तीन दिवसांच्या दौऱ्यात महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, फळपिकांचे प्रात्यक्षिक क्षेत्र, औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, उद्यानविद्या फळ रोपवाटिका, कोरडवाहू संशोधन प्रकल्प, कास्ट प्रकल्प, गो संशोधन प्रकल्प, सूक्ष्म सिंचन पार्क, विद्यापीठ ग्रंथालय, जैविक कीटकनाशक प्रयोगशाळा, बेकरी युनिट तसेच अखिल भारतीय समन्वित अवजारे प्रकल्प या प्रकल्पांना भेटी देऊन माहिती घेतली. विद्यापीठाचे संशोधन, शिक्षण तसेच विस्तार कार्याचा आढावा संशोधन आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी सादर केला.
नियंत्रक श्री. सुखदेव बलमे यावेळी उपस्थित होते. विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता व सर्व विभाग प्रमुख यांच्याशी प्रोबेशनरी आयएएस अधिकाऱ्यांच्या चर्चासत्र प्रसंगी कास्ट प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार यांनी हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र काष्ट प्रकल्प व ड्रोन तंत्रज्ञान, बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. विजय शेलार यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या बौद्धिक संपदेची सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने या विषयावर तर प्रशासन विभागातील उपकुलसचिव श्री. व्ही. टी. पाटील यांनी कृषि विद्यापीठाच्या स्टॅट्युटसंबंधी माहिती दिली.
या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला तसेच बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेटीप्रसंगी कुलमंत्री डॉ. महानंद माने यांनी माहिती दिली. या अधिकाऱ्यांचे विद्यापीठ भेटीचे व प्रशिक्षणाचे संपूर्ण नियोजन प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे यांनी केले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

