नगरपालिकेच्या मैदानात रासप, शिवसेना सर्व उमेदवार देणार - महादेव जानकर
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची इंदापूर शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांच्या घरी सदिच्छा भेट .
इंदापूर येथे पदाधिकाऱ्यांची जानकरांनी घेतली भेट : पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पूर्व तयारी जोमात
फोटो ओळ : इंदापूर येथे शिवसेनेच्या वतीने रासपचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांचा सन्मान करताना शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसेना सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार असून, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत. रासप व शिवसेना एकमेकांच्या सहकार्याने सर्व ताकदीने निवडणुकीत उतरणार आहेत. असा सूचक इशारा राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिला आहे.
इंदापूर येथे सोमवार ( दि. २३ ) रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी इंदापूर शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी हिंदुस्तान माथाडी जनरल कामगार सेना सरचिटणीस दुर्वास शेवाळे, अवधुत पाटील,
शहर समन्वयक संजय खंडागळे, क्षेत्रप्रमुख सचिन चौगुले, उपशहर प्रमुख अशोक देवकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, तानाजी शिंगाडे, सतीश इंगळे व रासप आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इंदापूर नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाचे, पडद्या मागचे कलाकार कामाला लागले आहेत. सर्व पक्ष व संघटना यांची अंतर्गत जय्यत तयारी चालू आहे. प्रत्येक वार्डात आपला उमेदवार कसा ताकदीचा उभा करता येईल याची चाचपणी सुरू आहे. तसेच राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे वरिष्ठ नेत्यांनी अजूनही याबाबत एकही शब्द बोललेले नसले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिसरात काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमात तयारीला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

