गर्भवती स्त्री ज्या प्रमाणे नऊ महिन्यानंतर बाळाला जन्म देते व प्रसुतीच्या दरम्यान तिला ज्या यातनांना सामोरे जावे लागते व मुल जन्मास घातल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जे हास्य उमलते तो तिच्या व तिच्या आप्तजणांसाठी जगातला सर्वात आनंददायक क्षण असतो. अगदी तशीच बाब मुंबई इंडियन्सच्या बाबत आयपीएलच्या पंधराव्या सत्रात घडली. आयपीएलचे सर्वाधिक पाच विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सची या सत्रात अतिशय गचाळ व निराशजनक सुरूवात झाली. एक दोन नाही तर तब्बल आठ सुरुवातीचे सामने हारून मुंबईने स्वतःचे या आयपीएल सत्रातील आव्हान गोत्यात आणलेच, परंतु आपल्या सोनेरी इतिहासाला कलंकही लावला. यामुळे मुंबई संघाबरोबर त्यांचे जगभरातील करोडो चाहते प्रचंड निराश झाले.
या आठ सामन्यात मुंबईनेही विजयासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांचे प्रत्येक प्रयत्न फेल ठरत होते. मेगा ऑक्शनमध्ये चुकलेल्या संघ निवडीनंतर प्रत्यक्ष सामन्याचा संघ निवडता टिम मॅनेजमेंटला तारेवारची कसरत करावी लागत होती. जो संघ निवडला जात होता तो हारतच होता. असे करता करता आठ सामने झाले. या दरम्यान कर्णधार रोहीत शर्मा कमालीचा हताश झाला होता. त्याचे कारणही तसेच खास होते. याच रोहीतच्या नेतृत्वात मुंबईने पाच आयपीएल करंडक उंचावले होते व त्याच यशस्वी नेतृत्वाच्या बळावर रोहीतला भारताच्या तिन्ही प्रारूपातील संघांचे नेतृत्व मिळाले होते. या सलग आठ पराभवांमुळे टिकाकार रोहीतच्या नेतृत्व क्षमतेवरच संशय व्यक्त करू लागले होते.
त्यामुळे नवव्या सामन्यात मिळालेला विजय रोहीतसाठी खासच होता. कारण त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. स्पर्धेतील ४४ व्या सामन्यात मुंबईची गाठ बलाढय राजस्थान रॉयल्सशी पडली. या सामन्यात मुंबईने संघात गंभीरतेने बदल करून विजयासाठीच मैदानात जायचा निश्चय केलेला दिसला. पदार्पण करणारा फिरकीपटू कार्तिकेयने या सत्रात धावांचा पाऊस पाडणाऱ्या जोश बटलरला पॉवर प्ले मध्ये अक्षरशः जखडून ठेवले होते. मुंबईच्या इतर गोलदाजांनीही राजस्थानच्या पडीक्कल, सॅमसन, हेटमायर, पराग या फलंदाजांनाही फारसे चाळचूळ करू दिले नाही. परंतु डावाच्या शेवटच्या टप्प्यात बटरलने नवोदित ऋतिक शौकीनच्या षटकात चार षटकार म्हणून राजस्थानची धावगती वाढवली मात्र शौकीनने त्याच षटकात बटलरला बाद करून हिशोब चुकता केला. बटलरच्या ६८ धावानंतरही राजस्थानच्या धावा समाधानकारक नव्हत्या. शेवटी आर.आश्वीनने नऊ चेंडूत २१ धावा फटकावून राजस्थानला १५८ पर्यंत नेऊन ठेवले.
एकशे एकोणसाठ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातही गचाळ झाली. बर्थ डे बॉय कर्णधार रोहितच्या बॅटने या वेळीही मौन राखणेच पसंत केले. रोहीतच्या खात्यात दोन धावा झाल्या असतानाच त्याने खेळपट्टीचा निरोप घेतला. मग रोहीतचा विरह सहन न झाल्याने साडेपंधरा कोटींना खरेदी केलेला ईशान किशन सव्वीस धावा काढून परतला आणि मुंबई पुन्हा एकदा दबावात आली. मात्र या सत्रात सातत्याने धावांसाठी प्रयत्नरथ असलेल्या तिलक वर्मा व सुर्यकुमार यादवने ८१ धावांची भागीदारी करून मुंबईला विजयाच्या समिप नेऊन ठेवले. सुर्यकुमारने ५१ धावा करून आपली जबाबदारी पार पाडली. तर तिलक वर्मानेही ३४ धावा केल्या. हे दोघेच विजयाचे सोपस्कार पार पाडतील असे वाटत असताना सतराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यजुवेंद्र चहलने सुर्याला बाद केले आणि त्यानंतर अठराव्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच चेंडूवर तिलक वर्मा बाद झाला आणि मुंबईच्या गोटात खळबळ उडाली. हे दोघे बाद झाले तेंव्हा मुंबईच्या १३४ धावा झाल्या होत्या. या नंतर संघात परतलेल्या टिम डेव्हीडने त्याचे हात खोलायला सुरूवात करत वीस धावा जमविल्या. शेवटच्या षटकात चार धावा हव्या असताना मोठा फटका मारण्याच्या नादात अनुभवी पोलॉर्डही बाद झाला. त्यावेळी पुन्हा एकदा मुंबईच्या हातातला विजय निसटतो की काय असे वाटू लागले होते. त्यावेळी कर्णधार रोहीतचा चेहरा भयानक चिंताग्रस्त बनला होता.
त्यानंतर पुढच्याच चेंडूवर नवा फलंदाज डॅनिएल सॅम्सने षटकार खेचून बहुप्रतिक्षित असलेल्या मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्काकामोर्तब केले. त्याबरोबरच कर्णधार रोहीतच्या चेहऱ्यावरील सर्व चिंता गळून पडल्या आणि मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंसह समस्त चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. या विजयाबरोबरच स्पर्धा सुरू झाल्यानंतर ३५ दिवसांनी विक्रमी विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या पराभवाचा भोपळा फुटला व गुणतालिकेत दोन गुणांची नोंद झाली.
या सामन्यात संघाची निवड अचूक ठरली. संघात प्रथमच दोन फिरकी गोलंदाज खेळविले. पदार्पणवीर कार्तिकेयने चार षटकात केवळ १९ धावा देत एक बळी मिळवून सर्वांनाच प्रभावित केले. तर दुसरा फिरकीपटू ऋतिक शौकीनही प्रभावी ठरला. डॅनिएल सॅम्स, पोलार्ड, बुमराहा यांनीही सुंदर प्रदर्शन केले. या सत्रात प्रथमच मुंबईची गोलंदाजी एकजीव दिसली. तर अनुभवी सुर्यकुमारला पुन्हा त्याच्या आवडीच्या तिसऱ्या क्रमांकावर पाठविल्याने संघाला बळकटी आली. आठ कोटींना खरेदी केलेल्या टिम डेव्हीडनेही संघात यशस्वी पुनरागमन करत स्वतःच्या कुवतीला न्याय दिला. कर्णधार रोहितचे नेतृत्वही चांगले झाले. मात्र त्याचे फलंदाजीत अपयशी ठरणे संघासाठी व वैयक्तीक त्याच्यासाठीही चिंतेची बाब ठरत आहे.
मुंबईचे चालू सत्रातील आव्हान जरी संपले असले तरी येथून पुढे राहीलेल्या सामन्यात मिळणारे विजय त्यांच्या पुढील वर्षाच्या तयारीला चालना देऊन जातील. त्यामुळे या वर्षीच्या अपयशाने नाऊमेद न होता सकारात्मकता घेऊनच पुढच्या तयारीला बळकटी देता येईल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

