शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक २६ मे २०२२
गावाने कृषि उत्पादनाचा ब्रँड विकसीत करावा- संचालक संशोधन व विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख..!!
: कृषि तंत्रज्ञान पारायणास सुरुवात :
राहुरी विद्यापीठ : शेतीचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर पहिले सूत्र योग्य तंत्रज्ञान आणि वाण वापरुन उत्पादनात वाढ करणे यामुळे तेहतीस टक्के उत्पन्न वाढेल. दुसरे सूत्र शेतीतील अनावश्यक खर्च कमी करावे यामुळे तेहतीस टक्के उत्पन्न वाढेल आणि तिसरे सूत्र स्वतःची विपणन व्यवस्था निर्माण करावी यामुळे तेहतीस टक्के उत्पन्न वाढेल. या त्रिसूत्रीचा उपयोग केला तर उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.
गावातील शेतकर्यांनी एकत्र येवून गावाचा पाच वर्षाचा पीक आराखडा तयार करावा. शेतकरी उत्पादक कंपण्या स्थापन करुन गावातील कृषि उत्पादनावर गावतच प्रक्रिया करुन कृषि मूल्यवर्धन करावे. शास्त्रज्ञ आणि कृषि विस्तार अधिकारी यांच्या मदतीने दर्जेदार कृषि उत्पादन घ्यावे. कृषि उत्पादनाचा गावाचा ब्रँड विकसीत करावा. शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत विपणनाची साखळी निर्माण करावी यामुळे गावातील पैसा गावातच राहिल व शहरातील पैसा गावात येईल असे प्रतिपादन संचालक संशोधन व विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तांभेरे ता. राहुरी येथे दोन दिवसीय कृषि तंत्रज्ञान पारायणाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. गडाख बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत तांभेरे गावचे सरपंत्र नितीन गागरे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. दत्तात्रय पाचारणे, शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. प्रकाश मोरे, मंडल अधिकारी राहुल ढगे, तांभेरे सोसायटीचे चेअरमन श्रीकांत मुसमाडे, मेजर ताराचंद गागरे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतांना शिवाजीराव जगताप म्हणाले गावाने ग्राम विकास समिती स्थापन करावी व या समितीद्वारे गावाचा विकास आराखडा तयार करावा.
ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कोव्हीड-19 काळात बरेच व्यवसाय बंद पडले परंतु शेती व्यवसाय हा अविरत सुरु राहिला व त्याने देशाची अर्थव्यवस्था सावरली. शेती ही देशाची अर्थव्यवस्था सावरु शकती तर गावाचा विकास सुध्दा घडवून आनु शकते. शेतकर्यांना गावातच सामुहिक बिजोत्पादन घ्यावे व गावाची बियाण्यांची मागणी गावातच भागवावी. जमिनीच्या आरोग्यपत्रिकेनुसार खत व्यवस्थापन करावे. जमिनीतील जैवविविधतेचे संवर्धन करावे व जिवंत जमीन एका पिढीपासून दुसर्या पिढीकडे हस्तांतरीत करावी आणि शेती संस्कृती जपावी.
पहिल्या दिवशीच्या कृषि तंत्रज्ञान पारायणाच्या तांत्रिक सत्रात डाळिंब पिकांवर शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डाळिंब पीक लागवडीसाठी जमिनीची निवड व निगा यावर डॉ. अनिल दुरगुडे, डाळिंब पिकावरील किडींचे नियंत्रण या विषयावर डॉ. अशोक वाळुंज आणि डाळिंब पिकावरील रोगांचे व्यवस्थापन या विषयावर डॉ. प्रकाश मोरे यांनी मार्गदर्शन केले. शिवार फेरीमध्ये गोकुळ मुसमाडे आणि डॉ. बापूसाहेब मुसमाडे यांच्या डाळिंब बागेत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. दुसर्या दिवसाच्या तांत्रिक सत्रात खरीप हंगाम पूर्व तयारी या विषयावर डॉ. दत्तात्रय पाचारणे, कृषि विभागातील विविध योजना या विषयावर महेंद्र ठोकळे, कपाशीवरील बोंड अळी व ऊस पिकातील हुमणी अळीचे नियंत्रण या विषयावर डॉ. नंदकुमार भुते यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.
गावाने कृषि उत्पादनाचा ब्रँड विकसीत करावा- संचालक संशोधन व विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. गोकुळ वामन यांनी मानले. या कृषि तंत्रज्ञान पारायणास तांभेरे गावाचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

