shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पँथर रत्नाकर मखरे तात्या म्हणजे लढवय्या,निर्भिड आणि संघर्षशील योद्धाचं..!


दि.१४ मे २०२१ च्या मध्यरात्री कोरोना काळात तात्यांचे दुःखद निधन झाले. ही घटना अत्यंत दुःखदायक आहे. कारण अत्यंत कष्टातून उभं राहिलेलं व्यक्तिमत्त्व आपल्यातून जाणं हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे.
तात्याचं दुसर नाव संघर्ष ! अगदी विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्या वाट्याला संघर्ष आला. अन्याय आणि प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करणे हा त्यांचा पिंडचं. हक्कासाठी लढणे हा तात्यांचा स्थायीभाव होता. भीती त्यांना शिवत नव्हती. उपेक्षित, वंचित, गोरगरीब वर्गासाठी तात्यांनी तहयात संघर्ष केला.

तात्या तुमची निर्भिड होती वाणी अन्
करारी होता बाणा
डोंगराला टक्कर दिली
पण वाकला नाही कणा
गोरगरीबांच्या हितासाठी तुम्ही
भल्याभल्यांना भिडला"
नेतृत्व आणि वक्तृत्वाचा मिलाफ म्हणजेच तात्या. शिव, फुले,शाहू, आंबेडकरी विचारांची कास धरून सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रभावी वाटचाल करणारे व्यक्ती म्हणजे तात्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे राजकारणा पलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच राहिली. अनेक वर्षापासून नानाविध अध्यायांचा इतिहास,हृदय आणि श्वासांच्या नात्याइतका एकरुपतेने सामावला गेला आहे.

तात्यांची राजकीय सुरुवात सन- १९७४ पासून नगरपालिकेत नगरसेवक निवडीने झाली.१२ डिसेंबर १९९० ला नगरसेवकांमधून नगराध्यक्ष पदी तात्यांची निवड झाली. नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विकासाच्या योजना राबविल्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे नगरपालिका मैदानात बसविले . अनेक उल्लेखनीय कामे तात्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केले.म्हणूनच महाराष्ट्रातील नामांकित कारभार चालवणारे नगराध्यक्ष म्हणून तात्यांना बहुमान मिळाला. 
तात्यांनी राजकीय जीवनात भाजपा मध्ये देखील काही काळ काम केले. पण त्यात ते रमले नाहीत.मा. एम. बी. मिसाळ (नाना) यांच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भारतीय दलित पँथर मध्ये राजकीय सुरुवात झाली. आक्रमकतेने काम, आंदोलने उभारली. समाजासाठी काहीतरी वेगळं काम करण्याची तात्यांची तयारी असायची वेळप्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला. राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेबांशी घनिष्ठ संबंध आले. आठवले साहेबांनी तात्यांना महाराष्ट्रभर फिरवलं. दौरे झाले. घणाघाती भाषणं व्हायची. अन्यायाविरूद्ध लढतांना नवी ऊर्जा मिळायची . पुढे दलित पँथर जिल्हाध्यक्ष, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या तात्यांनी निडर पणे पार पाडल्या.

खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्ट वक्ते, सार्वजनिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे, प्रचंड इच्छाशक्ती, नाविन्याचा ध्यास घेणारे, आपल्या  कार्य कर्तृत्वाने आपलेसे करणारे प्रेरणास्थान तात्या. दूरदृष्टीने झपाटून काम करणारं गतिमान नेतृत्व म्हणजे तात्या....
 तात्यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर ह्या संस्थेच्या माध्यमातून  शिक्षणाशी ज्यांच्या अनेक पिढ्यांचा कधी संबंध आला नव्हता अशा पददलित,भटके विमुक्तांच्या, बहुजनांच्या नव्या पिढ्यांना त्यांनी केवळ सुशिक्षित केले नाही.तर बुध्द,कबीर, शिव,फुले, शाहू आंबेडकर ह्या बहुजन महापुरुषांची दृष्टी दिली. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने संस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने सन्मानित केले.

तात्या त्यांच्या मर्जीनुसार जगताना / वागताना
 त्यांच्या जबाबदा-यांपासून ते कधी दूर गेले नाहीत. जनतेचे दुःख जपणारे, सत्यासाठी धडपडणारे, जनतेची वकिली करणारे ध्येयनिष्ठ, कार्यमग्न, बहुआयामी व्यक्तिमत्त्व, कार्यतत्पर, वक्तशीर, संघर्षशिल, हसतमुख, कुटुंबवत्सल, संवेदनशील, स्पष्टवक्ते, शिक्षणप्रेमी व धुरंधर असे नेतृत्व म्हणजे तात्या.
कोल्हापूर, सांगली, सातारा येथे महापूर आल्यावर पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवन उपयोगी साहित्य  दिले.
गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात राज्यपातळी,जिल्हा पातळीवर सर्व सामान्य बहुजनांवर झालेल्या कायिक वाचिक हल्ल्याच्या विरोधात तात्यांचे देखणे शब्द तलवारी सारखे तळपले. त्यांनी आवाज उठले म्हणून त्या वृत्तीनी डोके वर काढले नाही., हे तात्यांशी मतभेद असणारे सुध्दा मान्य करतील. तात्यांनी आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. प्रतिकूल परिस्थितीत खूप संघर्ष केला. तात्यांना त्यांच्या प्रत्येक प्रसंगात पत्नी आयु.शकुंतला मखरे (काकी) यांनी साथ दिली.तात्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात आपलं योगदान दिलं.कोरोना ह्या महामारीमुळे लॉकडाऊनच्या बिकट परिस्थिती मध्ये गोरगरीब लोकांच्या हाताला काम नाही म्हणून उपासमारीची वेळ आली होती. तात्यांनी भिमाई आश्रमशाळेवर आंबेडकरनगर, साठेनगर, होलारवाडा येथील लोकांना गहू,तांदूळ ह्या वस्तुचे वाटप केले. कोणतीही काम प्रसिद्धीसाठी कधीच केलं नाही. केलेल्या विधायक कार्याचा कधी गवगवा देखील केला नाही. गरीबीचे चटके त्यांनी स्वतः सोसले असल्याने गरिबीच्या व्यथा काय असतात हे त्यांनी जवळून अनुभवलं आहे. म्हणून त्यांनी मदत करताना मागे पुढे पाहले नाही. तात्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (ट्रस्ट) इंदापूरच्या माध्यमातून  छत्रपती शिवाजी महाराज जयंती गेल्या ४-५ वर्षांपासून सुरु करुन इंदापूर येथे मोठा आदर्श निर्माण केला. पहिल्या शिवजयंतीला छत्रपती संभाजी महाराज यांना निमंत्रित करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज जयंतीला आले कार्यक्रम पहिला. आणि महाराजांनी तात्यांचे कौतुक केले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूरच्या वतीने तात्यांनी  सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी/ कार्याबद्दल शिवजयंती दिनी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तात्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू  होतं. राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी आश्रमशाळेकरिता तात्यांना अनेकदा मदत केली.
तात्यांची दूरदृष्टी ही कमालीची होती.
अशा किती तरी घटना, प्रसंग आहेत ज्यातून तात्यांचे वेगळेपण, साधेपणा, मोठेपण, कर्तृत्व दिसून येत राहिलं.   मेहनत, कष्ट आणि प्रचंड इच्छाशक्ती असल्याशिवाय व कामाचा पाठपुरावा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही, असं तात्या नेहमी म्हणायचे परंतु त्यांनी स्वतः कृतीतून अनेकदा सिद्धही केलं.तात्या उभ्या आयुष्यात कोणालाच शरण गेले नाहीत. असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.
आदरणीय तात्यांना प्रथम स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !!
शब्दांकन:- श्री. नानासाहेब सानप सर, इंदापूर.
close