◼️यंग चांदा ब्रिगेडची मागणी, मनपा आयुक्तांना निवेदन सादर
◼️निधी न दिल्यास जन आंदोलन उभारु !
चंद्रपूर -किरण घाटे- बाबुपेठ उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध होण्यास दिरंगाई होत असल्याने पुलाचे काम कासव गतीने सुरु आहे. मात्र आता सदरहु कामाची गती वाढावी या करिता चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना काही अंशी यशही आले आहे. नुकतेच नगरविकास मंत्री यांनी 5 कोटी 26 लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकिय मान्यता दिली आहे. तर चंद्रपूर मनपाकडे थकीत असलेले 5 कोटी रुपयेही मनपाने तात्काळ अदा करावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे.
◼️ यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांची भेट घेत सदरहु मागणीचे एक निवेदन त्यांना दिले आहे. लवकरच मनपा प्रशासन या उड्डाणपुलाचे 5 कोटी रुपये अदा करेल असे आश्वासन मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी यावेळी त्या शिष्टमंडळाला दिले आहे. या वेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, विश्वजित शाहा, मुन्ना जोगी, चंद्रशेखर देशमुख, विलास सोमलवार, शहर संघटक रुपेश पांडे, बबलु मेश्राम, बादल हजारे, प्रतिक हजारे आदींची उपस्थिती होती.
◼️शहरातील बाबूपेठ परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम प्रगती पथावर आहे. या विधान सभा क्षेत्राचे आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नातून नगरविकास विभागाकडून बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी उर्वरित 5 कोटी 26 लक्ष रुपयांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. परंतु उड्डाणपुलाचे बांधकामाकरिता प्रशासकीय मान्यतानुसार चंद्रपूर महानगरपालिका तर्फे ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे शासनातर्फे निर्देशित करण्यात आले होते. परंतु अजूनही महानगरपालिका तर्फे हा निधी देण्यात आलेला नाही. हा निधी प्राप्त न झाल्यामुळे मागील अनेक वर्षापासून बाबूपेठ उड्डाणपुलाचे बांधकाम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे रहदारी रस्ता उपलब्ध नसल्याने आणि बांधकाम बंद असल्यामुळे सदरहु परिसरातील नागरिकांना रहदारी करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहर मनपा द्वारे सुरु असलेले सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाचे काम त्वरित थांबवून सदरहु निधी बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी वर्ग करण्यात यावा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. एक महिण्याच्या आत हा निधी न दिल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.



