आयपीएलच्या पंधराव्या सत्रात मुंबई इंडियन्सने आपल्या खराब कामगिरीने तळाचे स्थान घट्ट करताना स्वतःची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याची हाती आलेली सुवर्णसंधी गमावली आणि याचा लाभ उठवत केकेआरने बाराव्या सामन्यात पाचवा विजय मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा तूर्त तरी जिवंत ठेवल्या.
सोमवारी नव्या मुंबईतील डि वाय पाटील स्टेडियमवर केकेआर व मुंबई इंडियन्स यांच्या झालेला सामना चालू सत्रातील एकूण छप्पन्नावा सामना होता. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे केकेआरला प्रथम फलंदाजीस बोलावले. या सत्रात सलामीची जोडी केकेआरची मुख्य डोकेदुखी ठरत असताना या वेळी संघात पाच मोठे बदल करून परत एकदा अजिंक्य राहाणे व व्यंकटेश अय्यर या सलामीवीरांना केकेआरने निवडले. या वेळी मात्र या दोघांनीही साठ धावांची पायाभरणी केली. अय्यर ४३, राहाणे २५, नितिश राणा ४३ व रिंकू सिंग २१ यांनी बऱ्यापैकी धावा केल्या. एकवेळ केकेआर दोनशेला भोजा करेल असे वाटत असताना अचानक या सत्रात जसप्रित बुमराहाच्या अंगात वेगळेच वादळ संचारले व पाहता पाहता त्याने अवघ्या दहा डावात अर्धा संघ बाद केला व केकेआरची धावसंख्या १६५ वर रोखली.
सुरुवातीच्या आठ पराभवातून सावरून सलग दोन विजय मिळवत आपल्या जुन्या लयीत मुंबई आली असे वाटत असताना परत एकदा मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आणि अठराव्या षटकात ११३ धावात गाशा गुंडाळत ५२ धावांचा पराभव स्विकारला. या सामन्यात घडलेल्या काही निर्णायक घटनांवर आपण एक नजर टाकूया.
केकेआर एकवेळ १४.१ षटकात १३६ अशा मजबूत स्थितीत असताना जसप्रित बुमराहाचे वादळ आले आणि त्यात रसेल, राणा, जॅक्सन, कमिंस व नारायण पालापाचोळ्या सारखे उडाले. त्यावेळी सामना मुंबईच्या बाजूने झुकला.
मुंबईची खराब सुरुवातीनंतर बाजू सावरणारा ईशान किशन ४३ चेंडूत ५१ धावांवर बाद झाला आणि तेथेच मुंबईचा पराभव निश्चित झाला. कारण त्यानंतर अनुभवी पोलॉर्डसह सहा फलंदाज अवघ्या तेरा धावांत बाद झाले आणि मुंबईने सामना गमावला व यंदा शेवटच्या क्रमांकावरच राहाणार हे देखील पक्के केले.
या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार श्रेयस अय्यर व रोहित शर्माची कामगिरी बघितली तर त्यामध्ये बरचसं साम्य आढळलं. फलंदाजीत दोघेही फेल ठरले तर क्षेत्ररक्षणा दरम्यान गोलंदाजीत बदल करणे व योग्य फिल्डींग लावणे या बाबी दोघांनीही चांगल्या पैकी वठविल्या.
मुबंईकडून या सामन्यात गोलंदाजीत बुमराहा व डॅनियल सॅम्स प्रभावी ठरले तर फलंदाजीत केवळ ईशान किशननेच चमक दाखविली. गोलंदाजीत मुरुगन अश्विन, राइली मेरेडिथ व पोलार्ड अपयशी ठरले. फलंदाजीत सुर्यकुमार यादवच्या गैरहजेरीत फलंदाजी पुरी कोलमडली. रमनदीप सिंहस, टिम डेविड, पोलार्ड यांनी साफ निराश केले. तर कर्णधार रोहीत शर्मा तिसऱ्या पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. याचा मुंबईला मोठा फटका बसला.
केकेआरसाठी गोलंदाजीत कमिंस, रसेल, टिम साऊदी, वरूण चक्रवर्ती बळी मिळविण्यात यशस्वी ठरले. सुनिल नारायणने बळी मिळविले नसले तरी धावा रोखण्यात यश मिळवून मुंबईच्या फलंदाजांना त्याने डांबून ठेवले. फलंदाजीत मधली फळी साफ अपयशी ठरल्याने केकेआर आणखी मोठी धावसंख्या रचू शकले नाही.
मुंबईवरील विजयाने केकेआरला संजिवन मिळाले खरे परंतु पुढचे दोन सामने सरस धावगतीसह जिंकण्याचे अवघड काम पार पाडावे लागणार आहे. शिवाय नशिबावरही अवलबून राहावे लागेल. या सर्व गोष्टी जुळल्या तरच त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळेल.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

