पारनेर तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा जोरात ; टाकळी ढोकेश्वर मधील वासुंदे चौकातुन राजरोज पणे होणाऱ्या अवैध वाळू व्यवसायावर कारवाई होणार का ?
वाळू व्यवसायाला कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद : महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन वाळू तस्करांवर कारवाई का करत नाही ?
टाकळी ढोकेश्वर । श्रीनिवास शिंदे
पारनेर तालुक्यातील अनेक अवैध धंदे खुलेआम सुरू असून प्रशासनाचा यावर कोणताही वचक राहिलेला दिसत नाही. तालुक्यातील पळशी, वनकुटे, तास, देसवडे, मांडवे, खडकवाडी, पोखरी, पवळ दारा, कामटवाडी येथील मुळा नदी, काळू नदी, मांडहोळ नदी या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू आहे. महसूल प्रशासन यावर कोणतीही कारवाई का करत नाही ? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
त्यामुळे तालुक्यातील अवैद्य वाळू वाहतूक बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. आशी मागणी वाळू वाहतूक होणारे गावातील ग्रामस्थांनी केली आहे. पारनेर तालुक्यातील अनेक ठिकाणांहून अवैध वाळू उपसा जोराने सुरू असून याकडे महसूल विभाग पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे. वाळू वाहतुकीमुळे परिसरातील नदीचे प्रवाह बदलत असून त्यामुळे नदीपात्राच्या कडेला असलेली शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच वाळू वाहतुकीमुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. विनापरवाना असलेल्या चालकांकडून बरेच अपघात झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना होणारा त्रास व मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वाळू उत्खनन यावर आता महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने कारवाई करून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
एकीकडे रस्त्यांसाठी लोकप्रतिनिधी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून देतात तर दुसरीकडे अशा अवैध वाहतुकीमुळे नव्याने तयार झालेल्या रस्त्यांची दुर्दशा होत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या ढंपरवरील नंबर ही हे खोडलेले असतात. तसेच ढंपर वाहन चालकांचे वेगावर देखील नियंत्रण नसते. RTO विभागाने या कडे लक्ष देऊन अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
दरम्यान वाळू वाहतूक करणारे वाळू तस्कर हे परिसरातील सर्वसामान्य जनतेवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून वाळू व्यवसाय करणाऱ्या तस्करांवर आता कारवाई होणे गरजेचे आहे.
पारनेर तालुक्यात होत असलेले मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी ही तालुक्याला वाळू तस्करीचा अड्डा बनवत आहे का? महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे झोपेचे सोंग घेऊन वाळू तस्करांना पाठीशी घालत आहे का ? व संबंधित वाळू तस्करांना कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद आहे. पारनेर तालुक्यात वाळू तस्करीला लगाम कोण घालणार ? असा सवाल परिसरातील ग्रामस्थांनी आता उपस्थित केला आहे.

