पेट्रोल-डिझेलला हद्दपार करा, शेतकऱ्यांचा पेट्रोलचा खर्च वाचवा. शेतकरी अन्नदाता च नव्हे तर ऊर्जादाता बनला पाहिजे," असे आवाहन केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील साखर सम्राटांना केले.
अकोले । प्रतिनिधी :-
राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी अकोल्यात आले होते.यावेळी माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार वैभवराव पिचड, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सरचिटणीस नितीन दिनकर, सौ.हेमलताताई पिचड, जेष्ठ नेते शिवाजी राजे धुमाळ,भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे,जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव,अकोले नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, आशाताई बुचके,जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे,अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे,अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकर देशमुख, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,यशवंतराव आभाळे, राजेंद्र डावरे,उद्योजक नितीन गोडसे,राजेंद्र गोडसे,विजय पवार,सौ शीतल वैद्य, प्रसन्ना धोंगडे, सौरभ देशमुख आदीं उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मधुकरराव पिचड यांचा सपत्नीक अभिष्टचिंतन गौरव करण्यात आला.
यावेळी कळसुबाईचा शिखर यात्री -५०वर्षाचे विकासपर्व या विशेषांकाचे प्रकाशन ना.गडकरी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधीमंडळात माझा व मधुकरराव पिचड यांचा प्रथम परिचय झाला. त्यावेळी ते मंत्री होते. लोकांत मिळून मिसळून काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. आदिवासी समाजासाठी योगदान देणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपैकी मधुकरराव पिचड यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. असे गौरवउदगार गडकरी यांनी काढले.
अगस्ति कारखाना टिकवायचा असेल किंवा त्याचा विकास करायचा असेल तर तो पिचड साहेबांच्या ताब्यात दया अन्यथा त्याचे बिकट हाल होतील असे मत यांनी व्यक्त केले. पिचडांच्या पिढीने देशात विकास करण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नातून परिवर्तन आले आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ना. नितीन गडकरी म्हणाले, देशात साखरेचे प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. ऊस हे हमखास नफा देणारे पीक आहे. त्यामुळे शेतकर्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी साखरेपासून इथेनॉल तयार करावे. इथेनॉल विकले तरच साखर कारखाने टिकतील. पुढच्या महिन्यापासून फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या स्कुटर, रिक्षा, ट्रक, कार, बस बाजारात येणार आहेत. या संपूर्ण इथेनॉलवर चालू शकतील अथवा इथेनॉल व पेट्रोलच्या मिश्रणावर चालतील. इथेनॉलची किंमत पेट्रोलच्या निम्मी आहे. शिवाय दोन्ही इंधनातून वाहनांना सारखेच अँव्हरेज मिळेल. इथेनॉलमधून प्रदुषण होणार नाही. त्यामुळे इथेनॉलची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. त्यामुळे मी अहमदनगर जिल्ह्याला इथेनॉल पेट्रोल पंप मिळवून देतो. अहमदनगर जिल्ह्यातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले.या साठी पुढाकार खा.सुजय विखे व वैभव पिचड यांनी घ्यावा
ते पुढे म्हणाले की, भारतात शेतीसाठी पोटॅशियम खतांची मागणी आहे. त्यासाठी आवश्यक पोटॅश आपल्याला आयात करावे लागते. इथेनॉल तयार करताना स्पेंटवॉश हे बॉयलरमध्ये जाळल्यावर पोटॅश निघते. हे साखर कारखान्यांत तयार होणारे पोटॅशही सरकार 30 ते 32 रुपयांना विकत घेईल. त्यातून कारखान्यांचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकर्यांच्या इथेनॉलवर वाहने चालतील. इथेनॉल ग्रीन फ्युएल आहे. त्यामुळे प्रदुषणापासून मुक्ती मिळेल. शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे. आदिवासी भागात तांदूळ पिकतो. त्यातून बायो सीएनजी, बायो एलएनजी तयार करता येतो. माझा ट्रॅक्टर बायो सीएनजीवर चालतो.
समाजातील शोषित, पीडित जनतेची सर्वांगिण प्रगती व उन्नती करण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे,आता भविष्यातील बदलानुसार आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. वैभव पिचड व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सारख्या युवा नेत्यांनी आदिवासी, शेतकर्यांना संपन्न करण्याचे मिशन हाती घ्यावे. नवीन व्हिजन घेऊन चालले तर महाराष्ट्र सुखी, समृद्ध होईल असे मत व्यक्त केले.
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नथीचे कौतुक करता पण नाक दुसऱ्याचे आहे हे विसरू नका असा टोला हे निळवंडे धरणावरुन ना. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली. पाणी अकोल्याचे आणि कौतुक संगमनेरचे टिका करुन निळवंडे धरणाचे शिल्पकार मधुकर पिचड हेच असल्याचे सांगितले. तसेच आता 2019 ला चुक केली आता आमदार पुन्हा दुरुस्त करण्याची वेळ आली आहे असे म्हणून वैभव पिचड यांना जनतेने आमदार करावे असे सुचक विधान केले. जे सोडून गेले त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. पिचड साहेबामुळेच शालिनिताई विखे पाच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्षा होऊ शकल्या. त्यांचे आमच्यावर उपकार आहेत.ते विसरले असतील पण आम्ही विसरणार नाही.आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून वेळप्रसंगी काम करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.ना.गडकरींनी ज्याला हात लावला त्याचे सोने होते. त्यामुळे अकोले तालुक्यातील जनतेने पिचड पितापुत्राला साथ द्यावी असे आवाहन केले.
मधुकरराव पिचड ऋण व्यक्त करताना म्हणाले की, माझा जन्म शिक्षकाच्या घरात झाला. शिकण्यासाठी मी पुण्याला गेलो. मात्र प्रधान सरांच्या आशिर्वादाने समाजसेवेचा धडा मिळाला आणि तालुक्यात जनतेची सेवा कर लागलो. पुढे पठार भाग आणि अकोल्याच्या जनतेने मला सात वेळा आमदार केलं. गेल्या 50 वर्षे पूर्वीचा अकोले फार वेगळे होते. येथे रस्ता सोईचे नव्हते, पाणी, विज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रोजगार, सावकारशाही हे सर्व फार भयानक होतं. आमच्या डोळ्यादेखील पावसाचे पाणी खानी वाहून जात होते. तेव्हा कोणी आम्ही फार मोठा लढा उभा केला आणि येथील पाटपाण्याची चळवळी उभी करन मुळा, प्रवरा आणि आढळावर धरणं बांधली. त्यात निळवंडे धरण, पिंपारकणे पुल, पिंपळगाव खांड धरण, अनेक केटीवेअर मुळा बारमाही अशी अनेक स्पप्न पुर्ण झाले. त्यासाठी मला शरदचंद्र पवार साहेब, अजित दादा यांच्यासह अनेकांची फार मदत झाली. आता हे सर्व उभे करण्याचे काम मी केले आहे. ते संभाळण्याचे काम तुम्हाला करायचे आहे.मी आता सुखाने मरणार आहे , मी जे जे इच्छित ले ते मी पूर्ण करू शकलो मी समाधानी आहे. ना.गडकरी यांनी तोलारखिंड फोडू द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो असे पिचड साहेब म्हणाले.
स्वागत व प्रास्तविक करतांना माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तालुक्यातील विविध रस्त्यांची मागणी केली.तसेच इथेनॉल प्रकल्प क्षमता वाढीसाठी सहकार्य रावे असे सांगत अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातुन जावा,त्यासाठी केंद्रीय पातळीवर सहकार्य करावे.अशी मागणी केली.यावेळी सिताराम देशमुख, गिरजाजी जाधव,इंजि. हरिष चकोर,सौ रेश्मा गोडसे आदींसह अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर आभार जि. प.गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी मानले.
राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही तांत्रिक कारणास्तव या कार्यक्रमाला येता आले नाही ,त्यांनी व्हिडीओ क्लिप द्वारे पाठविलेल्या शुभेच्छा संदेशा मध्ये म्हटले की, माजी मंत्री मधुकरराव पिचड हे आदिवासी बांधवांचे भक्कम आधारस्तंभ आहेत. एक व्यक्ती अगणित लोकांचे आयुष्य उजळून टाकू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मधुकरराव पिचड होय. त्यांनी जीव ओवाळून टाकणारे अनेक कार्यकर्ते उभे केले. त्यांचे सिंचन, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे परंपरा वैभव पिचड पुढे नेत असल्याचेही ते म्हणाले.
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना राज्यपाल करावे..!
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी
आपले आयुष्य अकोले तालुक्याच्या व राज्यातील आदिवासी समाजासाठी खर्ची घातले असून त्यांनी सभापती, आमदार, राज्यमंत्री, आदिवासी मंत्री,विरोधी पक्ष नेते, प्रदेशाध्यक्ष व त्यानी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष अशा पदावर काम करून त्यांचा उपयोग समाजासाठी केला आहे.अशा अनुभवी मा.पिचड साहेब यांना एखाद्या राज्याचे राज्यपाल करून त्यांचा सन्मान करावा अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ यांनी केली.

