shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएलचे भारतीय शेर ढेर ; रिषभ पंतच्या नेतृत्वाचे लक्तरे वेशीवर !

      टि ट्वेंटी क्रिकेटच्या पंधरा वर्षांच्या इतिहासात प्रथमच मायदेशात खेळताना टिम इंडियाला सलग दोन सामन्यात पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. द. आफ्रिकेविरूध्द दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीवर गोलंदाजांनी नांगर फिरविला व भारत सलग तेरा विजय मिळवून विश्वविक्रम करण्यापासून वंचित राहिला. त्यानंतर रविवारी रात्री कटकच्या बाराबती स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात ना फलंदाज चालले ना गोलंदाज. यावर कहर केला तो हंगामी कर्णधार रिषभ पंतच्या नेभळट नेतृत्वाने. भारताचा भविष्यातला कर्णधार म्हणून रिषभ पंतकडे मोठया आशेने बघितले जाते. 


मात्र बेजबाबदार फलंदाजीबरोबरच नेतृत्वाचे मोठे धडे रिषभला घ्यावे लागतील. अन्यथा अशा कमकुवत व्यक्तीच्या हातात भारतीय क्रिकेट देणं धोक्याचं ठरू शकते.
          सलग दुसऱ्या सामन्यात रिषभ पंतने नाणेफेक गमावली त्याचा दुष्परिणाम न कळत संघाच्या मानसिकतेवर झाला. आयपीएलमध्ये धावांची रास ओतणारे फलंदाज अपयशी ठरत आहेत तर बळींचे इमले बांधणारे गोलंदाज हतबल दिसत आहेत. एकटा भुवनेश्वर कुमार सोडला तर इतर गोलंदाजांचे हाल अगदी बेहाल झाल्याचे चित्र दिसत होते. आयपीएलमध्ये
झंझावाती खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या बॅटवर गंज चढल्यासारखे दिसत असून फिरकी गोलंदाज तर चेंडू वळविणेच विसरून गेले आहेत.

            फलंदाज व गोलंदाजां इतकेच रिषभ पंतचे अर्थहिन नेतृत्व या पराभवांचे कारण आहेत. मागच्या सामन्यात पंतने युजवेंद्र चहल व हार्दिक पांड्याचा गोलंदाज म्हणून योग्य उपयोग केला नाही तर या सामन्यात खास फलंदाज म्हणून संघात घेतलेल्या फिनिशर दिनेश कार्तिकच्या बाबतही तोच घोळ घातला. भारताच्या डावाचे १२.४ षटके झाली असता चौथा गडी बाद झाल्यावर रिषभने कार्तिक ऐवजी गोलंदाज अक्षर पटेलला फलंदाजीस पाठवून स्वतःच्याच अकलेचे दिवाळेच काढले. अक्षर ऐवजी जर कार्तिक फलंदाजीस आला असता तर मैदानात जम बसलेला श्रेयस अय्यर खुल्या मनाने खेळला असता परंतु पंतच्या चुकीच्या निर्णयाचा फटका श्रेयसवर दबाव वाढून बाद होण्यात झाला. रिषभच्या या छोटया छोटया चुका भारताला भारी पडत आहेत. असेच गैरजरूरी प्रयोग त्याने आयपीएलमध्ये केल्याने दिल्ली कॅपिटल्सची नौका मध्येच डुबली होती.
           नाणेफेक जिंकून द.आफ्रिकी कर्णधार टेंबा बवुमाने भारताला फलंदाजीस पाचारण केले. मात्र . भारताला पहिल्याच षटकात ऋतूराज गायकवाडच्या रूपात झटका बसला. त्यानंतर श्रेयस अय्यर ४०, ईशान किशन ३४ व शेवटच्या काही काही षटकात दिनेश कार्तिकच्या २१ चेंडूतील ३० धावांमुळे भारताने कशाबशा १४८ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात द.आफ्रिकेची भुवनेश्वरच्या धारदार गोलंदाजीसमोर ३ बाद २९ अशी अवस्था झाल्यानंतर कर्णधार बवुमा ३५ व हेन्रीक क्लासेन ८१ धावा यांच्या बळावर द. आफ्रिकेने दहा चेंडू व चार गडी राखून विजय मिळवित मालिकेत बरोबरी साधण्याचे भारताचे मनसुबे उधळून लावले.
          भारताच्या पराभवाच्या दोन प्रमुख कारणांपैकी पहिले कारण म्हणजे खराब सुरुवातीनंतर ईशान किशन व श्रेयस अय्यरने डाव सावरला असे वाटत असताना पंत, हार्दिक व श्रेयस २८ चेंडूंच्या अंतराने बाद झाले व धावगतीला आळा बसला. तर दुसरे कारण म्हणजे रिषभ व हार्दिकने संघाची गरज न ओळखता खेळलेले बेजबाबदार फटके.
          दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या कामगिरीची तुलना केली तर रिषभ पंत गोलंदाजीत योग्य ते बदल करण्यात अपयशी ठरला. तर फलंदाजी करताना ७१.४३ च्या स्ट्राईक रेटने ७ चेंडूत केवळ पाच धावा काढून बाद झाला. तर त्या उलट टेंबा बवुमाने आपल्या गोलंदाजांचा खुबीने उपयोग केला व फलंदाजीत संघाची पडझड रोखताना ३० चेंडूत ३५ धावा बनवून आपली जबाबदारी योग्यरित्या निभावली.
          भुवनेश्वर कुमारने चार षटकात तेरा धावा देत चार बळी मिळविले. मात्र त्याच्या कष्टाचे चीज झाले नाही. उलट एका  गोलंदाजाने सामन्यात चार बळी मिळवूनही संघ पराभूत होण्याची ही भारतीय टि-२० क्रिकेट इतिहासातील हि पहिलीच घटना घडली.
            पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन -शुन्य असे मागे पडले असल्याने पुढचे तीन सामने जिंकण्याचे कठीण काम टिम इंडिया समोर आहे. मात्र योग्य समन्वय साधत संघात सक्षम गोलंदाज व फलंदाजांचा योग्य क्रम लावल्यास तेही शक्य आहे. मात्र त्यासाठी रिषभ पंतने गल्लीबोळातल्या कर्णधारासारखे बालिशपणे वागणे सोडून देऊन रोहित शर्मासारखे नेतृत्व करावे लागेल. जर असे झाले नाही तर रिषभच्या नावाचा भविष्यात कर्णधार म्हणून विचार व्हायला मोठे मंथन करावे लागेल.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close