shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गरीबी, प्रतिकुलता व यश यांचे आयपीएलमध्ये समिकरण जुळविणारे क्रिकेटपटू..!


          क्रिकेटला धर्म मानणाऱ्यांसाठी कुठलाही त्रास व प्रतिकुलकता याचं कुठलंच भान नसतं. त्यांचं उद्दीष्ट असतं फक्त क्रिकेटमध्ये नाव कमावणे. यासाठी ते येईल त्या संकटांचा सामना करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत की, त्यांनी घरची आर्थिक परिस्थिती, जातियवाद, रंगभेद या सर्वांवर मात करून आपल्या शानदार कामगिरीने स्वतःची कारकिर्द घडविलीच पण इतरांपुढेही एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.

           नुकतीच पंधरावी आयपीएल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेतही काही तरूण तडफदार खेळाडूंनी आपल्या जोरदार खेळाने प्रत्येकालाच प्रभावित केले. त्यातील काही जण देशाच्या ग्रामिण, दुर्गम भागातून आले होते. त्यांची कौंटुबिक हालात गरीबीची तर आर्थिक परिस्थिती बिकट होती. काही जणाचे वडिल केशकर्तनाचा ( सलून ), इलेक्ट्रीशियन, बिगारी काम करायचे तर काही स्वतः कामधंदा करून स्वतःच्या कमाईवर उदरनिर्वाह करून क्रिकेटच्या आयपीएल सारख्या जगविख्यात व्यासपिठावर पहिल्याच प्रयत्नात प्रकाश झोतात आले. या आयपीएल सत्रातील त्यांच्या आश्वासक कामगिरीने त्यांचे भविष्यात यशस्वी होण्याचे संकेत मिळाले आहेत.

           प्रस्तुत लेखात आपण अशाच काही परिस्थितीशी झुंजून यशाला आपल्या पायाशी लोटांगण घालणाऱ्या क्रिकेटपटूंची माहिती जाणून घेऊया.
          नुकताच्य संपलेल्या आयपीएलच्या सत्रात उपविजेत्या राजस्थान रॉयल्सचा ताडमाड उंची लाभलेला डावखुरा वेगवान गोलंदाज कुलदिप सेनची कहाणी याच प्रकारात मोडणारी आहे. मुळचा मध्यप्रदेशमधील रीवा येथील रहिवाशी असलेल्या कुलदिपने
आपल्या पहिल्याच सत्रात सर्वांनाच प्रभावित केले. डेथ ओव्हर्स मधील त्याची गोलंदाजी धारदार व धावा रोखणारी होतीच शिवाय महत्वाच्या क्षणी बळी घेऊन त्याने आपले कर्तव्य ईमाने इतबारे बजावले. बलाढय लखनौ सुपर जायंटस विरूद्धच्या एका सामन्यात लखनौला शेवटच्या षटकात विजयासाठी चौदा धावांची गरज होती आणि समोर होता मार्कस स्टोइनिस हा फटकेबाज ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि गोलंदाज होता आपला पहिलाच आयपीएल सामना खेळणारा कुलदिप सेन. या पठ्ठ्याने अतिशय चिवट मारा करून स्टोइनिस सारख्या फलंदाजाला जखडून ठेवत व अकरा धावा खर्च केल्या व राजस्थानला तीन धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला.
            कुलदिपचा जन्म मध्यप्रदेशातील रीवा जिल्हयातील एका छोट्या गावात झाला. त्याच्या वडिलांचा व्यवसाय सलून (केशकर्तनाचा) होता. घरातील सर्वात लहान असलेल्या कुलदिपला क्रिकेटचे अतिशय आकर्षण होते. त्याने आठव्या वर्षीच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला फलंदाज व्हायचे होते. मात्र त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला गोलंदाजीकडे वळविले व त्याची परिस्थिती बघून त्याची सर्व फी माफ करून मोफत प्रशिक्षण दिले.
         कुलदिप सन २०१८ मध्ये मध्य प्रदेश रणजी संघात निवडला गेला. आपल्या पहिल्याच रणजी सत्रात त्याने २५ बळी घेऊन लक्षवेधक कामगिरी केली. त्यानंतर त्याला टि२० मध्येही संधी मिळाली. आता तर त्याने आयपीएलमध्येही चमक दाखवून स्वतःची ओळख निर्माण केली.
           आयपीएलचे विक्रमी विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सची कामगिरी या सत्रात अगदी रसातळाला गेली. परंतु या साऱ्या पडझडीत मुंबई इंडियन्सची बाजू एका नवख्या एकोणावीस वर्षाच्या शिडाशिडीत बांध्याच्या उभरत्या फलंदाजांने सावरली. तसेच मुंबई कडून या सत्रात सर्वाधिक धावाही बनविल्या. होय तुम्ही बरोबर ओळखलंत, मी बोलतोय त्याच तिलक वर्मा बाबत !
          मेगा ऑक्शनमध्ये १.७ कोटी रूपये किंमत मिळालेल्या तिलकने सर्वांनाच मोहीत करताना भविष्य उज्ज्वल असल्याची पावती थेट मुंबई इंडियन्सचाच नव्हे तर भारताचा राष्ट्रीय कर्णधार रोहित शर्माकडून मिळविली. परंतु या पूर्वीच्या तिलकच्या प्रवासाकडे बघितले तर तो थक्क करायला लावणारा प्रवास आहे.
एकेकाळी तिलककडे दोन वेळचं जेवण करण्याइतकेही पैसे नसायचे. परंतु क्रिकेट विषयीचे निस्सीम प्रेम व मेहनत त्याचे स्वप्न सत्यात उतरवणारी ठरली. हैद्राबादच्या चंद्रयानगुट्टा येथील या मुलाची वयाच्या नवव्या वर्षीच फलंदाजीला उभी राहाण्याची पद्धत ( स्टान्स ) व पुलचे फटके मारण्याची स्टाईल जरा वेगळीच होती. वडिल इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करायचे. यातून ते छोटया तिलकच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हते.
          तिलक वर्मा आज जो काही आहे ते केवळ त्याचे प्रशिक्षक सलाम बाशय व त्यांच्या सहकार्यामुळेच आहे. तिलकचे वडिल नम्बूरी नागराजू यांच्याकडे त्याला क्रिकेट अकॅडमीत पाठविण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी प्रशिक्षक सलाम यांनी त्याला क्रिकेट किट स्वतःच्या खर्चाने दिले, कोणतीही फी घेतली नाही. अगदी त्याच्या खाण्या पिण्याचा खर्चही तेच करायचे. यामुळे तिलक आज क्रिकेटच्या नकाशावर अनंत काळासाठी चमकणारा तारा बनू पहात आहे.
           केकेआर कडून खेळणारा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगची कहाणीही कष्टप्रद राहीली आहे. आपल्या तडाखेबाज खेळाने त्याने या सत्रात छाप सोडली असून गुजरात विरूध्द ४३ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केल्यानंतर शेवटच्या साखळी सामन्यात सर्व काही संपल्यात जमा झाले असताना अवघ्या पंधरा चेंडूत वादळी ४० धावांची खेळी करताना त्याने लखनौच्या गोलंदाजांच्या तोंडाला फेस आणला होता.  परंतु त्याचे व केकेआरचे 
दुर्देव की रिंकूने मारलेला जोरदार फटका एर्विन लुईसने अफलातून प्रयत्न करत झेलला व केकेआरचे प्ले ऑफ मध्ये जाण्याचे स्वप्न भंगवले. लुईसचा हाच झेल स्पर्धेतला सर्वोत्तम झेल ठरला. 
          उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे राहणारा रिंकू आर्थिक परिस्थिती अतिशय खराब असलेल्या घरात जन्माला आला. पाच भावंडातील तो तिसरा होता. वडिल गॅस टाकी पोहचविण्याचे काम करायचे तर भाऊ रिक्षा चालवायचा. इतकेच नाही तर स्वतः रिंकू शिक्षण, क्रिकेट प्रशिक्षण या बरोबर झाडू पोछा ( साफसफाईचे ) काम करायचा. यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःच्या गरजा भागवायचा. सारखा क्रिकेट खेळतो म्हणून वडिल त्याला मारायचे. पण एकदा दिल्ली येथील एका क्रिकेट स्पर्धेत त्याला नवी कोरी मोटारसायकल बक्षिस मिळाली आणि त्यानंतर त्याला मिळणारा मार बंद झाला व क्रिकेट जोमाने सुरू झाले.
          सन २०१४ पासून त्याचे नशिब उजळले. उत्तर प्रदेश रणजी, आयपीएलमध्ये सन २०१७ ला पंजाब किंग्ज, त्यानंतर सन २०१८ पासून केकेआर मध्ये तो सामील झाला. यंदा तर त्याला खेळायला मिळालेच पण त्याचा भावही दहा लाखांहून ५५ लाख झाला व त्याचा खेळही जगप्रसिद्ध झाला.
         शेवटच्या काही सामन्यात मुंबई इंडियन्सने यश मिळविले.  त्यामध्ये चमकलेला कुमार कार्तिकेय हा फिरकीपटू देखील असेच कठीण दिवस जगून येथपर्यंत पोहोचल आहे. क्रिकेटपटू बनण्यासाठी त्याने सन २०१३ मध्ये घर सोडले. या दरम्यान आपल्या गरजा भागविण्यासाठी त्याने मजूरीही केली. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलेच. जखमी टायमल मिल्सच्या जागेवर त्याची वर्णी लागली. या संधीचा त्याने पुरेपुर फायदा उठवत आपले भविष्य उज्ज्वल असल्याचे संकेत देत मुंबईच्या आशाही वाढविल्या.
           आर्थिक हलाखी असली म्हणजे काय झालं ?  इच्छाशक्की मोठी पाहीजे हेच या खेळाडूंनी दाखवून देत अश्याच परिस्थितीतून जात असलेल्या क्रिकेटपटू बनू पहाणाऱ्यांसाठी आदर्श उभा करून दिला आहे. सलाम त्यांच्या क्रिकेटप्रेमाला !
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close